लावण्य रेखा

16 March 2010 वेळ: Tuesday, March 16, 2010
कविवर्य बा. भ. बोरकर ह्यांनी रेखाटलेली लावण्य रेखा :-

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे।
गोरटे की सावळे या मोल नाही फारसे॥

तेच डोळे देखणे जे कोंडीती सार्‍या नभा।
वोळिती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा॥

देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे।
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे॥

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे॥

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती।
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती॥

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया।
लाभला आदेश प्राणां निश्चये पाळावया॥

देखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके।
चांदणे ज्यातुन वाहे शुभ्र पार्‍यासारखे॥

देखणा देहान्त तो जो सागरी सुर्यास्तसा।
अग्निचा पेरुन जातो रात्रगर्भी वारसा॥


आपला,
(लावण्यमुग्ध) सौरभ

0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates