द्रविडी प्राणायाम - दिवस पाचवा

02 November 2010 वेळ: Tuesday, November 02, 2010
१६ ऑक्टोबर:

सकाळी उठलो, तेव्हा फक्त कोची आणि तिथल्या चायनीज फिशिंग नेट्स बघणे हा प्लान होता. ह्या पुढे काहीच अपेक्षित नव्हतं. कधी कधी unplanned ट्रीप मध्ये कायच्या काय मजा येते! त्यातलाच हा एक दिवस. A day full of surprises!

Shornur(शोर्नुर)च्या बसची वाट पाहत असतांना बिडी मारायची तलफ आली. शेजारी उभ्या म्हाताऱ्याला एक बिडी मागितली. (मी किती निर्लज्ज झालोय आता!!) बिडी शिलगावून, पावसाने ओल्या परिसरात हलकेच पसरणाऱ्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत झुरके घेत होतो. बिडी संपत आली, तोच त्रिचूरला जाणारी बस आली. पुन्हा एकदा त्रिचूर स्टेशन, तोच फलाट. एर्नाकुलमचं तिकीट काढून फलाटावर म्हाताऱ्या बाबाला शोधू लागलो. आज कुठे दिसला नाही. ट्रेन आली, पुन्हा एकदा जनरल डबा झिंदाबाद!

ट्रेन मध्ये, चायनीज फिशिंग नेट्स कुठे बघायला मिळतील हि माहिती मिळवली. फोटोज काढायला संध्याकाळची वेळ चांगली असेल, म्हणून मग दिवसभर बघण्यासारख्या गोष्टींची थोडी माहिती मिळवली. मग ठरवलं आधी खादाडी, त्यानंतर मग broadway (हो इकडे पण एक broadway आहे!) फिरायचा, जवळपास असलेली मसाल्यांची दुकानं बघावी आणि मग मरीन ड्राईव (हो, ते हि आहे कोचीमध्ये). तिथून मग पुढे फोर्ट कोचीला जाऊन चायनीज फिशिंग नेट्स बघू, वास्को द गामाचं घर पाहून मग रात्री त्रिवेंद्रमला निघू. म्हणजे आज रात्री राहण्याचा खर्च वाचेल. रात्री ट्रेन मधेच झोपता येईल. एर्नाकुलम (कोची) स्टेशनवरून बाहेर पडलो. इकडे मात्र सडकांवर पुन्हा एकदा गर्दी, गोंधळ, आणि अस्वच्छतेचा प्रत्यय आला. वाटेत, एक नेट-कॅफे दिसलं. त्याच्याकडून फोटोजचा back-up घेतला. DVD write करायच्या किमतीवर घसाघीशी केली. मला DVD च्या किमतीत, DVD writeपण करून मिळाली! (आयुष्यात कधी मी नेट-कॅफे वर तोलमोल करीन हे वाटलं नाही.)

इकडे मलबारी बिर्याणी चांगली मिळते म्हणून ऐकिवात आलं. मग एक बिर्याणी हाणून, पुढे 'मेनका'ला जाणारी बस पकडली. आज इथल्या Jawaharlal Nehru Stadiumवर इंडिया-ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना आहे! गर्दीचं हे हि एक कारण असावं. Broadway म्हणजे पुण्याचा लक्ष्मी रोड म्हणता येईल. वेगवेगळ्या गोष्टी विकणारी दुकानं होती. मसाल्यांचे डोंगर रचून ठेवले होते. एका दोघांनी मला पत्रकार समजून आपल्या दुकानात असलेल्या प्रत्येक मसाल्याची ओळख दिली!

आज हवेत उकाडा जाणवत होता. थोड्या वेळात मरीन ड्राईववर एक चक्कर मारली. आतापर्यंत गर्दीमुळे फोटो काढण्यात ती मजा येत नव्हती. मग जास्ती वेळ खर्च न करता फोर्ट कोचीला जायचं ठरवलं. फोर्टवर जाण्यासाठी मरीन ड्राईव वरून एक जेट्टी जाते. फोर्ट कोचीला पोहचण्याचा हा सर्वात स्वस्त आणि कमी वेळ घेणारा रस्ता आहे. अडीच रुपयांचं तिकीट काढून जेट्टी कुठल्या दिशेला जाईल ह्याचा अंदाज घेतला. म्हणजे मी डाव्या बाजूला थांबलो, तर सूर्यप्रकाशामुळे फोटो ओव्हरएक्स्पोज नाही होणार. जेट्टीतून जातांना पूर्वेकडचे shipyards बघत, पुढे सरकत होतो. आकाशात ढगांचे पुंजके तरंगत होते. पुढे चायनीज फिशिंग नेट्सचे मनसोक्त फोटो काढून, तिरुअनंतपुरामला जाण्याची आकडेमोड करू लागलो. तिथून पुढे कन्याकुमारीला जाईन म्हणतो. "Kanyakumari shall be the last destination on this trip!"



Vasco da Gama चं घर


फोर्ट कोचीमधील रस्ते
इकडून कोची स्कायलाईन फार सुरेख दिसत होती! फोर्ट कोचीने पुन्हा एकदा गोव्याची आठवण करून दिली! स्ट्रीट फोटोग्राफी करतांना, मागून एकाने मला थोडं बाजू व्हायला सांगितलं. कदाचित मी त्याच्या फ्रेममध्ये येत होतो. मग आमचं बोलणं सुरु झालं. त्याचं नाव राजर्षी आहे. तो एक बंगाली वृत्तपत्राचा पत्रकार होता. इंडिया-ऑस्ट्रेलिया सामना कव्हर करायला आला होता. मला आता फोटो काढायला company मिळाली होती. राजर्षीने आदल्या दिवशी हा इलाका बघून ठेवला होता. गप्पा मारत मारत फोटो काढणं सुरु होतंच. भरपूर फोटो काढले. सूर्यास्ताचे फोटो काढून आम्ही Vasco da Gamaच्या घराचे फोटो काढायला गेलो. हवेत गर्मी वाढली होती. घामाने शर्ट ओला झाला होता. राजर्षीने एकएक बियरची ऑफर दिली. त्याचा एक मित्र पुढे एका restaurant मध्ये बसला होता. वाटेत, आम्हाला एका मल्लू सिनेमाचं शूटिंग बघायला मिळालं. राजर्षी थेट शूटिंगच्या सेटवर जाऊन फोटो काढू लागला! त्याच्या गळ्यात लटकणाऱ्या त्याचा आय-डी बघून कोणी अडवलं नाही. मी पण त्यात हात साफ करून घेतला! ऍन्जेलिका नावाची कोणी नवीन हेरोईन होती. Restaurant मधे राजर्षीचा मित्र त्याची वाट बघत होता.

राजर्षी
आमची दोघांची ओळख झाली. तो मुंबईच्या DNA साठी काम करतो. १५-२० मिनटात दोघांनी पण आपली कामं उरकली. उद्याच्या पेपर मधे छापून येणारी बातमी, आज मी एक दिवस आधीच वाचली होती! मग गप्पांचा विषय माझ्या ट्रीपकडे वळला. त्यांना ह्या अनोख्या ट्रीपबद्दल सांगितल्यावर, दोघांना पण मजा आली. राजर्षीने आज रात्रीचं जेवण आणि स्टे स्पोन्सर केला! अन दुसऱ्या दिवशी असलेल्या क्रिकेट सामन्याचे फोटो काढायला यायची ऑफर!! रात्री जेवणात बढीया ब्रोस्टेड चिकन हाणलं. हॉटेल कडे जातांना Box Topsचं Letter शिट्टीवर सूर धरू लागलं. मनात "Give me a ticket for an aeroplane....", हे शब्द शिट्टीच्या सुरावर थिरकत होते!

आजची संध्याकाळ कायच्या काय होती राव. ह्या ट्रीपवर मी मल्लू शूटिंग बघायचं स्वप्नं पण बघितलं नव्हतं, ना हि राजर्षीसारख्या उदार माणसाची भेट, ना हि एक बियर, ना ब्रोस्टेड चिकन, ना क्रिकेट सामन्याचे फोटो....

आयुष्यात काहीही घडू शकतं! आपलं नेहमीचं कवच सोडून थोडं बाहेर पडलो काय आणि काय काय भारी अनुभव आलेत! वेड रे वेड.... असो मी जरा hyper excite झालोय!

आपला,
(लहरी) माचाफुको

Click here to see more images

7 प्रतिक्रिया

  1. अनघा Says:

    सौरभ, hehe!!! मला असं का वाटतंय कि आपण २००७ मध्ये आहोत??? सांग पाहू?? :) :) सांग सांग?? :D

  2. rajiv Says:

    You both must be in KOCHI in 2007, one as MALLU HEORINE AND another as photographer HA..HA...HA..

    SAURABH Its not only Travel & Living, but must be Self story of Travelling and Living. of ur near & dear one.

    very expressive and charming .

  3. हे भलताच भारी होतंय राव... :) अजून किती दिवस उनाडक्या करणार आहेस??? संपव लवकर... उत्सुकता अशी ताणू नये... :D

  4. फोटो पाहून माझी मलाच लाज वाटायला लागली आहे. फिशिंग नेट्स पाहून तर कॅमेरा फेकून देऊ की काय अशी अवस्था झाली आहे.

  5. माच्या, तू तर फुल सुटलाय भाऊ.. मजा येतेय.. सहीच !!

  6. Chalu de!!! mast ahe...photo jabardast!!!

  7. Machafuko Says:

    >>रोहन उस्ताद!! तुमची प्रतिक्रिया बघून आनंद झाला!!

    >>पंकज कॅमेरा असाच फेकू नकोस, तो माझ्या झोळीत फेक! :D

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates