गग्या

04 April 2011 वेळ: Monday, April 04, 2011
गग्या हे नाव प्रोफ. (प्रोफ. म्हणजे प्रोफेसरच, पण हे आमच्या एका मित्राचं टोपण नाव आहे! वास्तवात तो सी.ए करतोये, आणि आकडे-मोड त्याला चांगली जमते. मटका सेंटर वर आकडे-मोड मध्ये जो तरबेज असतो, त्याला प्रोफेसर म्हणतात! तर आशी आहे आमच्या प्रोफेसर ची कहाणी!) ने ठेवलाय. एखाद्या भजीवाल्याने बेसन कालवून, मग गरम तेलाच्या कढईमध्ये भजी तळायला टाकावीत, असा देवाने आमच्या गाग्याला टाकलाय. गग्या म्हणजे कोकणातल्या गावातून, पुण्यात शिकायला आलेला गोल गप्पा. (माझं असं मत आहे कि गाग्याच वर्णन करणाऱ्या विशेषणात "ड, ठ, ट, ढ, र" ह्यांचा वापर होऊ नये. गोल - मटोल गग्याला ते शोभत नाहीत.)

गग्याला खाण्या पिण्याची हौस फार. पण नेमकी त्याची ऑर्डर चुकते. आता बघा, मागच्या वेळी गग्याने कॅफे गुड लकला जाऊन बटर चिकन मागवलं. इराण्याच्या उपहार गृहात पंजाबी मागवण्याची हिंमत त्याचीच! तरी नशीब वडा सांबर नाही मागवला. मग गगोबा रूम वर येऊन आम्हाला म्हणे, "असला भंगार चिकन होता गुड लकला.....", "मी पैशे मोजतोये म्हंटल्यावर त्याने बरोबर नको का बनवायला?" एखाद दिवशी मी गग्याला उडप्याकडे दाल-बाटी खायला पाठवणार आहे!! 

"साम्ब्या" आहे एकदम. पण आता त्याने असं काय केलं जेणे करून त्याच्या नावाने एक पोष्ट तयार करतोय, तर झालं असं कि आमच्यात पैश्यांचा व्यवहार नेहमीच होत असतो. तर त्याला त्या दिवशी ५० देऊन २० रुपये परत येणे, म्हणून थांबलो. तर हा भाऊ नोटेकडे टक लाऊन बघत होता. मग त्याला काय झालं विचारलं, "काय नाय रे, फोटो पाहतोये." मी पण मस्करीत विचारलं,"काय रे गांधीचं पूर्ण नाव काय होतं?" २० सेकंदानंतर उत्तर आलं, "महात्मा गांधी!" प्रोफ. ने कान टवकारले. मग आम्ही पंक्चर वाल्याने जशी ट्यूब फिरवून फिरवून पंक्चर शोधावं, तसं आम्ही त्याच्या 'cerebrum' मधलं पंक्चर काढू लागलो. आम्हाला कुठे माहिती कि ह्या ट्यूब मध्ये multiple पंक्चर आहेत. आधी नेहरू परिवाराचा उद्धार झाला. "इंदिरा गांधीचे वडील कोण?" उत्तर:"महात्मा गांधी" थोडक्यात इतिहासाचा बाजार उठलाय. "मला संग, झाशीच्या राणीचा प्रांत कुठला?" उत्तर: ४० सेकंदांनी आलं > "माहित नाही" "अरे आठवून तर बघ...." "झारखंड?" आता पर्यंत हसू आलं होतं, आता मात्र आमच्या कपाळाला चांगलेच टेंगुळ आलं होतं. मग आठवून आठवून आम्ही प्रश्न विचारायचे, आणि गाग्याने त्यांची उत्तरं द्यायची. भन्नाट उत्तरं मिळवण्याचं ठिकाण गावलं. "भारताच्या पश्चिम किनार पट्टीवर कोणता समुद्र येतो?" गग्या:"म्हणजे? गणपती पुळ्याचा!!" प्रश्नाच्या अश्या ठिकऱ्या कोणी उडवलेल्या का? आमचा ताज महाल मुंबईतून दिल्ली आणि तिथून पुढे आग्राला गेला. सुभाष बाबूंना नोबेल पुरस्कार मिळाला, सरस्वती नावाची नदी नसते, विजय तेंडूलकर आणि सचिन तेंडूलकरच नातं संपन्न केलं, सोनिया गांधी देशाच्या पहिल्या महिला president झाल्या. ओबामा अमेरिकेचा पंतप्रधान झालं, financial year १ जानेवारी ते ३१ मार्च मध्ये असतो. चिंध्या झाल्या. मग Einstein ने "बल्प" (बल्ब) चा शोध लावला. कौस्त्या समोर तर भारत १९४९ मध्ये स्वतंत्र झाला. फलाना फलाना......

आता जमलेल्यांना त्याचं हसू येत न्हवता, सगळेच सुन्न. "गग्या लेका तुझा अभ्यास झालाय का?" "नाही अजून, सुरवात केली नाही." अरे काय हा प्राणी....
एक महिन्यावर university ची परीक्षा आलीये आणि आमचा गग्या चिल्ल मारतोये! हा आयुष्यात काय करणार आहे ह्याचा गहन प्रश्न आता आमच्या समोर आला. गाग्याला काय आवडतं ह्याच्या नोंद आम्ही आता करतो. "गग्या तो ढाबा किंव्वा हॉटेल सुरु कर." "कोणी सांगितले नसते धंदे? त्यात लई कटकट असते." संध्याकाळी सगळे रूम वर जमले कि गप्पा ऐकायला मात्र गग्या हजर. गग्या नेहमी आपला मांडी घालून, कुबड काढून ऐकत असतो. मग विषय कितीही हलका फुलका असो, किंव्वा गहन असो. एखाद वेळी बोलायची इच्छा झालीच तर एखादा त्यातल्या त्यात चालू विषयाशी ताळ-मेळ नसलेला विषय चीवडतो. कधी कधी एखाद्याचं अनुकरण करतो. पण ते फक्त hair style, आणि appearance पर्यंत मर्यादित. 

परीक्षेत मार्क कमी पडले तरी चालतील, पण कन्सेप्ट समजून घे. पण इकडे साहेब, दणादण चिठ्या बनवतात. आयुष्यात कागदोपत्री आपण सुशिक्षित झाल्याशी मतलब. आता रोज गाग्याला अवांतर वाचन करण्यासाठी आम्ही त्याला डिवचतो, पण त्यांच्या वाचनात मराठी मासिक "बया" सोडलं तर आणखीन काही येतच नाही. 

आता मात्र मला गग्याचा हेवा वाटतो. आम्ही नसत्या उचापत्या करायला जातो, आणि मग मरत मरत जगतो. गग्या पहा, रोज सकाळी उठतो नाश्ता करतो, रूमवर परत झोपतो, मग मेसला जातो, थोडा बोलतो, अन झोपतो, संध्याकाळ झाली कि फिरून येतो, जेवतो, गप्पा मारतो, झोपतो! वाह कसलं सरळ आयुष्य! कदाचित मी माझ्या Neanderthal Man च्या जन्मात असाच असेन! तेंव्हा आणि आज मध्ये  हा सगळा बदलाव आल्या मुळे आमचा गग्या मात्र संथ जीव म्हणून ओळखल्या जातो. 

2 प्रतिक्रिया

  1. Kp Says:

    Gagya, Balya ani Leo madhe mi sagalyat jast mark konala dein ???? tar uttar aahe "Mahit nahi...." :P

    ashakya bhari blog......

    superlike...

  2. Aakash Says:

    Phadnis tumcha hya blog war swagat aahe!!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates