पात्रांनी मच्छी - R&D

02 October 2011 वेळ: Sunday, October 02, 2011
 पात्रांनी मच्छी खाण्यासाठी एकतर तुमचा कोणी खास पारसी मित्र असला पाहिजे, नाहीतर तुम्हाला चांगली पात्रांनी मच्छी कुठे मिळेल हे तरी माहिती असलं पाहिजे. परवा (३० जुलै) राजीव काका, अनघा ताई आणि सौरभ  बरोबर पात्रांनी मच्छी खाल्ली. सध्या घरचं किचन माझ्या हातात असल्याने, पात्रांनी मच्छीवर प्रयोग सुरु झाले.

प्रत्येक्षात, पात्रांनी मच्छीसाठी पापलेट वापरला जातो. पापलेटला काप देऊन, लिंबू मीठ लावून मुरत ठेवतात.

ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, धणे, जिरे आणि थोड्या मिरच्या टाकून चटणी बनवल्या जाते.

मास्याला ही चटणी नीट लावून, केळीच्या पानात बांधून वाफेवर शिजवतात.
वरून चमचाभर तूप सोडून, लिंबाच्या फोडी बरोबर पेश करतात.

वाफेवर शिजवण्यासाठी तुमच्याकडे स्टीम कुकर नसल्यास,
एका मोठ्या पातेल्यात पाणी भरून, मग त्या मध्ये स्टीलची चाळणी फसवून, वरून झाकण लावलं तरी फर्स्ट क्लास स्टीम कुक होतं.



Experiment 1:
बोंबील:
बोंबील, केळीचं पान, हळदीची पानं, आणि बाकी सगळं नेहमीच्या पद्धती सारखं.
बोंबील लिंबू-मीठ लावून मुरत ठेवले. खोबरं,कोथिंबीर, धणे, जिरे, २ मिरच्या टाकून चटणी बनवली.
चटणी बोंबील ला व्यवस्थित लावून, एक बोंबील केळीच्या पानात बांधला, दुसरा हळदीच्या. २० मिनिटं वाफेवर शिजवल्यावर, वरून चमचाभर तूप आणि ४-५ थेंब लिंबाचा रस.

निष्कर्ष:
१. केळीच्या पानातल्या पात्रांनी मच्छी पेक्षा, हळदीच्या पानातल्या माछीला जास्ती चांगली चव होती. हलकी हळदीच्या पानाची चव होती.
२. घरात पात्रांनी मच्छी बनवणे, अवघड काम नाही.
३. बोंबील नाजूक असल्याने, बोम्बिलचे तुकडे पडण्याची शक्यता असते.

Experiment 2:
रावस:
रावसच्या नेहमी पेक्षा जाड तुकडे कापून घेतले. खोबऱ्याच्या चटणी मध्ये कोथिंबीरचं प्रमाण कमी करून, पुधीना टाकला. हळदीच्या पानात वाफेवर शिजवले.

निष्कर्ष:
१.रावसची पात्रांनी > +१
२. पुधीनाची चव आणि nascent हळदीच्या पानाची चव चांगली ब्लेंड होते.

Experiment 3:
बांगडा:
बांगड्याला दोन्ही बाजूने काप देऊन, मुरत ठेवलं. तुपाच्या ऐवजी ऑलीव्ह ओईल वापरलं.

निष्कर्ष:
१. बांगडा प्रेमी ह्याला कधी वाईट नाही म्हणणार. तुम्हाला काटे काढायचा कंटाळा असेल, तर तुम्ही सुरमई/रावस मध्ये पत्रानीचा आस्वाद घेऊ शकाल.
२. पात्रांनी मध्ये ऑलीव्ह ओईलची चव नापसंत.
३. बांगडा जितका जास्ती मोठा मिळेल, तितका चांगला.

टिपणी: लिंबू-मीठ मध्ये भरपूर वेळ मुरलेला बांगडा, हळदीच्या पानात लपेटून घ्यावा. एका घमेल्यात कोळसा फुलवून त्यावर शिजवा. सोबत लसणाच्या पातीची चटणी घ्या. मात्र जोडीला थंडी आणि भरपूर वेळ असणं गरजेचं.

Experiment 4:
रावस V1.0:
बाजारात असलेल्या सगळ्यात मोठ्या रावस च्या पोटाचे तुकडे घेऊन या.
नेहमी सारखं लिंबू मीठ लावून मुरत ठेवा.
आज Microwave oven ला सहभागी करून घेतलं.

कृती १:
नेहमी सारखं वाफेवर शिजत ठेवायच्या आधी, चटणी आणि चीज स्प्रेड लावलं.
वाफेवर १५-२० मिनिटं शिजत ठेवलं.

चीजची एक विशेष चव आली.
रावस पात्रांनी विथ चीज > +१

कृती २:
मुरू दिलेला रावस मायक्रोवेव ओवन मध्ये ९०० डिग्री सेल्सियस वर ४ मिनिटं  शिजवला.
मग २-२ मिनिटं हाय ग्रील केलं.
आणि खोबरं-पुधीना-धणे-जिरे-मिरची-आलं-लसूण च्या चटणी बरोबर पेश केलं.
सोबतीला लिंबाची फोड!

निष्कर्ष:
१. मायक्रोवेव मध्ये नेहमीपेक्षा अर्ध्या वेळात पात्रांनी मच्छी तयार होते.
२. चीजची चव ज्याला आवडत नाही, त्याला सलग दोन दिवस मुळा खायला घालणे. तिसऱ्या दिवशी चीजचे गुणगान गातांना  दिसेल!



पात्रांनी मच्छी < ही पद्धत त्यातल्या त्यात कमी कॅलरी वाली आहे.
आता लवकर बनवा, आणि आम्हाला जेवायला बोलवा!

2 प्रतिक्रिया

  1. rajiv Says:

    तुझ्या कारागिरीची व संशोधनाची स्तुती करावी तेव्हढी थोडीच ...!!

  2. Aakash Says:

    हाहा! एखाद दिवशी पात्रांनी मच्छीचा बेत करू!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates