शलौम शाब - ३

02 December 2011 वेळ: Friday, December 02, 2011
गोरखपूर स्टेशन बाहेरून सोनौलीसाठी बस मिळतात. दोन तासांचा तर प्रवास आहे.
रस्ता तसा ठीक ठाक होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूर दूर पर्यंत सपाट जमीन होती. काझीरंगाला जातांना पण असेच रस्त्याच्या कडेला दूर दूर पर्यंत मोहरीचे शेत होते, बस आता त्याच रस्त्याची आठवण आली. कधीतरी ह्या सगळ्या रस्त्यांवरून स्वतः होऊन ड्राईव्ह करत जायचं आहे.

साउथ आफ्रिकेच्या Dalmaine ची कंपनी होती. गोरखपूर साठी निघतांना वाराणसी स्टेशनवर आमची ओळख झाली. Dalmaine त्याच्या मित्रांना भेटायला काठमांडूला जात होता. मला, आधी पोखरा पहायचं होतं. सोनौली वरून, चालत बॉर्डर ओलांडता येते.बॉर्डर ओलांडायच्या आधी, तुमच्यकडे असेल नसेल त्या गोष्टींचे declaration करायला विसरू नका. असं नको व्हायला, की परत येतांना तुमच्या ४ वर्ष जुन्या कॅमेर्यासाठी तुम्हाला कस्टमवाले उगाच चिरीमिरी मागतील. कस्टम ऑफिसरने जुन्या कॅमेऱ्याला declarationची गरज नाही सांगितलं, तरी declare करा.

तुम्ही जर स्टेट बँकचे खातेदार असाल, तर करंसी एक्स्चेंजची काळजी नसावी. बॉर्डर क्रॉस केल्यावर जवळच एक नेपाळ एस.बी.आय चं ATM आहे. इकडे बिना कमीशन तुम्हाला नेपाळी रुपये मिळतील. खात्यातली रक्कम आता नेपाळी रुपयाय्त दिसत असल्या मुळे, तुमच्या खाते आता १.६० पट जास्ती दिसेल. नेपाळ मध्ये येताच आयुष्यात किती चांगल्या गोष्टी होऊ शकतात बघा.

सोनौली वरून भैरवा बस पार्क तसं फार लांब नाही, पण सवारी गाड्या १० नेपाळी रुपयात चालतात. भैरवा बस पार्क होऊन पोखरा जाण्यासाठी बस मिळतात. सोनौली, भैरवा मध्ये भारतीय रुपये पण घेतल्या जातात. अजून नेपाळी रुपयांची सवय झाली न्हवती,  अजून नोट देतांना एकदा ती नीट बघून देत होतो. पोखरा इथून ५ ते ६ तासांच्या अंतरावर आहे. पोखरा येई पर्यंत अंधार पडला असेल. राहण्यासाठी काही सोय बघावी तर लागेलच. ह्या इलाक्यात साडे चार - पाच वाजता अंधार पडतो, अन् ७-८ वाजता बऱ्यापैकी रस्ते रिकामे असतात. जो होगा सो देखा जायेगा, म्हणून खिडकी बाहेरचा नजाराचा आस्वाद घेणं पसंद केलं.

 भरतपूरच्या पुढे गेल्यावर रस्ता तृशिली नदीच्या कडेने जातो. स्वच्छ वाहणाऱ्या ह्या glacial water ची काय स्तुती सांगावी....जिथे पाण्याचा प्रवाह संथ होत, तिथे पोहणारे मासे पण दिसतात. कुठे अचानक रुद्र अवतार घेऊन खळ-खळत वाहणारी, कुठे अगदी शांत. जसा घाट सुरु झाला, हवेतली थंडी वाढू लागली. एकतर वाराणसी मध्ये नुकतीच बघितलेली (गटार) गंगा, आणि आता ही इतकी स्वच्छ नदी. बघतच राहावं. घाटातल्या वळणावर ४-५ घरं असलेलं गाव. त्याच्यातच उपहार गृह. सळीवर मसाला लावून तळलेले, नदीतले मासे लावलेले असत. बेसन लावून अख्ख्या उकडलेल्या अंड्याचे पकोडे मिळत होते. बाकी सर्व आपल्याकडे दिसणाऱ्या गोष्टी. कुरकुरे, लेज, पार्ले, फ्रुटी... वेगळ्या देशात आल्यासारखं वाटतच न्हवत. इकडे फक्त भाषा वेगळी आहे, नाहीतर परकेपण जाणवलं नसतं. जर रस्त्यात एखाद दुसरं मोठं गाव आलं, की तिकडून नदी ओलांडायला एक केबलचा पूल असायचा. झुलता पूलच म्हणा की.

इथे नदी मध्ये राफ्टिंग, कयाकिंग - कनोइंग करण्यासाठी बरेच धाडसी येत असतात. मी इथवर ऐकलं आहे की, राफ्टिंग, कयाकिंग मधून मिळणाऱ्या नफ्यातून ह्या टूर कंपन्यांना राहण्याच्या किंमतीत वाढीव सवलती देणं परवडते. थोड्याच वेळात, एकी कडे नदी आणि हिमालय ह्यांना एकाच फ्रेम मध्ये बसवण्याची खटपट डोळ्यांनी सुरु केली. अंधार पडल्यावर हिमालय चमकदार दिसत होता.

बस ड्रायव्हर जसं उशीर होतोय वाटलं, की गाडी सुसाट पळवत होता. बसला एक स्पेशल हॉर्न होता. ओवरटेक करायला जागा पुरात नसली की हा हॉर्न वाजवून समोरच्याची गाडी कंट्रोल करायची. पोखरा मध्ये पोहचे पर्यंत रात्रीचे आठ वाजले. ह्या बस पार्क मध्ये तर कधीचाच pack up झाला होता. इथून Dam Side जाण्यासाठी Taxi वाले १००० च्या खाली घेत न्हवते. बस सेवा तर ७ च्या पुढे बंद होते. अन् आता इतके तास बस मधून खिळखिळा झाल्यावर, मला ताणून झोपायचं होतं. मी एखादी स्वस्त सुंदर टिकाऊ जागा शोधायच्या कामाला लागलो. हॉटेल मध्ये पाठीवर मोठाली बाग बघितली की किती पण फडतूस हॉटेल असलं तरी भाव औकातीच्या बाहेरचे सांगतात. कपडे, मोजे आणि रुमाल धून वाळत टाकायला एक हवेशीर रूम हवी होती. मला हॉटेलची चांगल्यात चांगली डील मिळवून द्यायला दोन जळवा माझ्या मानगुटीवर येऊन बसल्या. त्यांनी दाखवलेले हॉटेल बघून माझं डोकं भण-भणु लागलं होतं. त्याने चांगली जागा म्हणून जेंव्हा मला एका कुंटणखाना दाखवला, त्यातल्या एकाची कॉलर धरून समज देऊन हुसकावून लावलं.

नकळत  मी केरळचा अनुभव आणि इथे येणाऱ्या अनुभवत तोल-मोल करत होतो. कदाचीत म्हणूनच मला  सगळेच गंडवताय्त असं वाटत असावं. एकदाच्या ह्या जळवा दूर हाकलल्यावर, इतक्या उशिरा कुठल्या हॉस्टेल मध्ये जागा मिळते का बघत होतो. हॉस्टेल मध्ये हॉटेल पेक्षा कमी किमतीत काम होतं. बऱ्याचदा कॉमन बाथरूम्स असतात. पण नेमकं सिंगल रूम कुठेच उपलब्ध न्हवती. शेवटी, त्यातल्या त्यात स्वस्त पण २ बेडची रूम मिळाली. तरी मी तिकडे रात्री पुरता राहणार म्हणून घासाघीशी केली. येतानाच्या रस्त्याचं वर्णन करण्याचा मूड पार उतरून गेला होता. थंडगार पाण्याने कपडे धून वाळत टाकले. आता जेवायला काय मिळेल म्हणून खाली गेलो. तर किचन बंद झाल्याची माहिती मिळाली. आता जवळ असलेल्या बिस्किटांवर रात्र ढकलावी लागेल.

अजून नेपाळ मध्ये २४ तास पण झाले नसतील, पण पहिला धडा शिकलो होतो. जोवर आपल्या खिश्यात पैसा असतो तो पर्यंत आपण cautious होऊन फिरतो.

0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates