राजेश खन्ना

20 July 2012 वेळ: Friday, July 20, 2012

आयच्या गावात!!! १७/३ नंतर डायरेक्ट ४ महिन्यांनी पोस्ट पडत्ये. आणि ती पण राजेश खन्नाच्या नावाने. भेंडी गवार ललिता पवार...  राजेश खन्ना off झाल्याची न्यूज ऐकुन मझ्या थोबाडावर पण :O ची स्मायली प्रकटली. संबंध काय??? राजेश खन्ना माझ्या generationचा हिरो नाही. मी त्याच्या खुप काही मुव्ही पाहिल्या नाहीत. आनंद पाहिलाय, बावर्ची पाहिलाय... आणि.... जोर देऊन आठवावं लागेल... लेऽऽऽ... पण तरीसुद्धा आठवत नाही. म्हणजे २ मुव्ही सोडल्या तर मी तुला ओळखत नाही.???!!! त्याची स्टाईल.... मला अज्जिबात आवडत नाही. तो "अरे ओ पुस्पा" डायलॉग तर डोक्यात जातो. Honestly दिसायला धर्मेंद्रसारखा रुबाबदारपण नाही. Okkay... तरी राजेश खन्नाचं जाणं माझ्यासाठी एक मोठी न्यूज होती. का??? कदाचित त्याच्या Stardomचं जे मोठं वजन इतरांमुळे तयार झालय ते असावं.

(Dood... chill... come to the point...)

ह्हा... तर न्यूज चॅनलच्या चक्क्यांना दळण्यासाठी किमान दोन दिवस पुरेल एवढं "सकस" धान्यं मिळालय. मुव्ही चॅनलवाल्यांना ये हफ्ता राजेश खन्ना के नाम म्हणुन त्याच्या काही मुव्हीज लूपमधे टाकून आठवड्याभराची सुटी घेता येईल. म्युझिक चॅनलवरपण त्याचीच गाणी (नविन मुव्हीचे म्युझिक प्रोमोज बोंबल्ले). फेसबुक/ट्विटरवर तर राजेश खन्ना नावाची त्सुनामी आली. कित्येकांच्या पोस्टमधेच काय तर प्रोफाईल पिक्चरमधेपण तो घुसला.

(तुजे आवशीचो घोव... तुजा प्रोब्लेम काय असा? Why u complain???)

Nonsense m not complanin. Okay... तर मुद्दा असाय की राजेश खन्नाबद्दल किंवा त्याच्या पहिला बॉलिवुड सुपरस्टार असण्याबद्दल काहिही attachment नसतानासुद्धा एक गोष्ट अशी झाली की ज्याबद्दल मी त्याला प्रचंड मान देतो. गुरु झाला तो माझा.

न्यूज चॅनलवर २४ तास राजेश खन्नाच्या निधनाची बातमी... मला कशाचं काही सोयर-सुतक नाही (हलकट आहे मी)... आणि अचानक एका न्यूज चॅनलवर "आनंद"मधला तो सीन दाखवला.. तो जेव्हा मरतो... अमिताभ बच्चन "मुझसे बात करो" म्हणुन ओरडुन त्याच्या छाताडावर कोसळतो... आणि मागुन एक आवाज येतो... बाबुमोशाय... GOD LIKE scene!!! काय नाहीये त्या सीनमधे? एक माणुस आपल्या आयुष्यातुन कायमचं निघुन गेल्याचं सत्य... ते मान्य करण्याची आपली हतबलता... तरी तो परत येईल ह्या आशेने केलेला आक्रोश... आणि एक क्षण का होईना पण तो परत आला आहे असा आनंद देणारा फसवा भास... कलेजा खल्लास... खून के आसू रोता दिल.

Shoot man!!! साला खराखुरा हाडामांसाचा माणुस मेल्याचं काही वाटत नाही. पण त्याच्या मरणाचा अभिनय तोडफोड करुन जातो! Larger than life. ये होता है काम. जीव लाऊन कि जीव टाकुन केलेलं काम. खर्रा सोना!!!

राजेश खन्नाजी... (जी??? च्यायला आत्तापर्यंत चड्डी-buddy सारखा एकेरी उल्लेख आणि आता जी!!!... हा जी...) You taught me one thing, that moment - how your work should be. I shall try my best and wish I could do it someday. One should always be remembered for his/her work, just like you.

काकाजी... RIP... prayers.. wishes.. and RESPECT to you...


आपला,
(नम्र आणि प्रेरित) सौरभ


ती

17 March 2012 वेळ: Saturday, March 17, 2012

कशी गोरीप्पान काया असलेली ती

मादकतेने  ठासून  भरलेली

हलकेच जवळ घ्यावी

नाजूक देहाची

ओठांचा स्पर्श

आणि मग एक ठिणगी पेटते

झप्पकन ज्वाला उठते

ती पेट घेते

एक दीर्घ  श्वास

नशाऽऽऽऽऽ

गरम शरीर

थंड मेंदू

भरलेली फुफ्फुस

रिकामे विचार

श्वास बाहेर पडतो

तिने पेट घेतलेला असतो

जळत असते ती

उंगलीयोपे नचाता उसको मै

ती नाचते

मला बघायला आवडतं

राक्षसी काहीच वाटत नाही

तिला पण माझी किळस येत नाही

मला आवडते ती... जळताना ...

तिचा पूर्ण देह जळेस्तोवर तिला उपभोगतो मी

ती मला शांत करत असते

तिने घड्याळाचे काटे थांबवलेले असतात

मी अनंतात विलीन झालेलो असतो

तिच्यामुळे मी फक्त मी असतो

जग शून्य झालेल असतं

बोटांना तिच्या पूर्ण होणाऱ्या अस्तित्वाची धग जाणवते

तिने मला आकंठ सुख दिलेलं असतं

ती अगदी निर्मोही

पूर्ण गुंगवून स्वतःला वेगळं ठेवलेलं

सुरेश भटांच्या ओळी तिला चपखल बसतात

रंगूनी रंगात साऱ्या... रंग माझा वेगळा

ती देहात उतरून पण नसतेच

मी तिला विझवतो

वाईट नाही वाटत

तिच्या जाण्याचं दुःख नसतं

तिने घातलेली भूल मी अजून अनुभवतोय

विझताना पण ती तिच्यातली धग दाखवत होती

एक धुराची रेषा  हवेत सरळ गेली... नाहीशी झाली

मी पुन्हा माणसात आलोय...

तिने मला माणूस म्हणून जाणवून घेता येणारे सगळे अनुभव दिले

पण तिच्याशी संगत केलेली पाहून अनेक माणसांनी मला परक केलं...


लीनाशी गप्पा मारता-मारता अचानक तंद्री लागली आणि हलकेच समाधित घुसलो... समाधिवस्थेत पाजळलेलं तत्वज्ञान आज मेलबॉक्समधे टंकून आलेलं. बहुत मजा आया... Thanks Leena...

आपला,
(धुंद) सौरभ

तार

12 March 2012 वेळ: Monday, March 12, 2012

मध्यरात्र - अंधार्या आकाशात मोठा हसरा चंद्र. गाडीचा दिवा बंद!
चेहऱ्यावर भर्रराट्याचा वारा. रस्त्यावरच्या धूळ मातीला आपल्या केसात जागा करून देत.
थंडीने कुडकुडत, एखाद्या गावातल्या शेकोटीची उब घेऊन गाडी रेम्टाव.
समुद्राची ओढ. सूर्योदयाच्या आधीच समुद्राच्या गार वाळूत येऊन पडावं.
लाटांची गाज कानावर पडत राहावी, अन गार वाळूत झोप लागावी. दिवस असाच निघून जावा.
Infinity चा शोध कधी लागेल?

कट्टा-सोंड्या

01 March 2012 वेळ: Thursday, March 01, 2012

सोंड्या हा तसा अभ्यासाचा खूप मोठा विषय होऊ शकतो. त्याच्या स्वभावाच्या प्रत्येक धाग्याला धरून पीएचडी होऊ शकते.
पुढे सरळ रस्ता दिसला म्हणून, गाडी (होंडा Activa - चं विमान) चालवतांना एखादी डुलकी मारणारा शोधून कुठे सापडणार नाही. दुनियेत सोंड्याला कोण किती पीळेल ह्याचं प्रमाण इनफिनिटी मध्ये सांगणे म्हणजे सोंड्याचा अपमान आहे. कट्ट्यावर वर्षानु वर्षे सोंड्या वर नित्य-नेमाने रोज एक तरी गेम पडतो.

सोंड्याचे तसे छंद पण काही कमी नाहीत. कॅरम वर पैज लावणे, फो-रेक्स मध्ये पैसे गुंतवणे. हे सगळं तो पैसा गमावण्यासाठीच करतो जणू. कडकीमध्ये मी पण सोंड्याशी पैज लाऊन माझ्या चहाची बिलं भरली आहे.


हिशोबाचा पक्का, पण इतर सगळ्या गोष्टींमध्ये धांदरट. स्वभावाने थोडे राजे आहेत. झीप्पो त्यांनी अश्या शाही थाटात घेतला खरा, पण त्याचे तुकडे कसे पडले हे तुम्हाला कोणी पण सांगेल. त्याच्या प्रत्येक वाक्यात काही तरी वेगळेपण असतं. तो "Happy New Year" ला "Many happy returns of the New Year" म्हणून शुभेच्छा देईल.


आधी दोस्ती तपासण्यासाठी एकदा विचारून घेतो, माझ्या कडे पैसे नाहीत माझे चहाचे पैसे भरशील का? अन मग आम्हा दोघांच्या चहाचे पैसे तोच भरेल. अजून लहान पोर आहे ते. त्याला कितीही रागवा, शिव्या द्या अन्न ती चूक पुन्हा होऊ नये ह्याचे फंडे द्या. शेवटी महराज पुन्हा तेच करून येतील आणि मग हसतील. ह्यासाठी उदाहरण देणं गरजेचं आहे. आम्हाला एका रविवारी बाईक घेऊन ताम्हिणी घाटात फिरून यायची इच्छा झाली. सगळे मित्र ३-४ बाईक वरून निघालो. पौड रस्त्यावर वाय.डी ची गाडी पंक्चर झाली. तिकडेच एका टायरवाल्याकडून पंक्चर काढून घेतलं. पुढे पुन्हा चांदणी चौकात वाय.डीची गाडी पंक्चर. आम्ही चाक काढून पंक्चर काढून आणायचा विचार केला. पण नेमकं हवे ते पाने त्या टूल-कीट मध्ये न्हवते. मग सोंड्याला सांगितला कि तू तुझ्या गाडी वरून जाऊन पंक्चरवाला घेऊन ये. एक तास झाला अजून पंक्चरवाला नाही म्हंटल्यावर सोंड्याला फोन करून विचारलं काय रे बाबा, तू कुठे अडलास? तर म्हणे आलो ५ मिनटात. ५ मिनटा सांगून हा २० मिनटानंतर आला. सोबत पंक्चरवाला पण वेगळाच होता. मगाशचा न्हवता. त्याला विचारल्यावर म्हणे, टिळक रस्त्यावर माझ्या ओळखीचा एक पंक्चरवाला आहे. त्यालाच घेऊन आलो बघ. आता काही प्रोब्लेम नाही. अशे चालतात आमच्या सोंड्याच्या अकलेचे घोडे. २ कि.मी. वरच्या पंक्चरवाल्याला आणायच्या ऐवजी त्याने डायरेक्ट ८ किलोमीटर वरून त्याचा पंक्चरवाला आणला! आता काय म्हणायचं ह्याला? पंक्चरवाला पण एका अटीवर तयार झाला होता. त्याला न्यायचा आणि आणायची अट होती. ती ताम्हिणी घाटाची ट्रीप सोंड्याकडून चांगलीच वसूल केली.



आमच्या ह्या मित्राला मिळेल ते गाणं मराठी मध्ये अनुवाद करून बेसुर्या आवाजात गायची फार हौस.
"जबसे तेरे नैना, मेरे नैनोसे लागे रे"
ह्याचा अनुवाद, "जेव्हा माझे डोळे, तुझ्या डोळ्यांशी जुळले रे" असा करून आम्ही त्याला गाण्यात साथ द्यावी म्हणून मग "आहा" म्हणत. त्याच्या गाण्याच्या प्रत्येक ओळी नंतर एक समूहदायिक  "आहा" येत.

सोंड्याचे तसे रंग चिकार! लिहावा ते थोडं. त्याने आमच्या विनोदी गोष्टींना पुरवलेलं भांडवल, हे जन्मात कोणाला जमणार नाही असं.
अजून त्याच्या शिक्षणातून गणित नावाचा भूत उतरत नसल्याने, डिग्री अडली आहे. आता मात्र स्वतःच्याच वडलांच्या कामात हातभर लावतो आहे.

कट्टा - तानसेन

26 February 2012 वेळ: Sunday, February 26, 2012

मुंबईत जसे सगळे मित्र नाक्यावर भेटतात, तसं पुण्यात कट्ट्यावर. एकंदर माहोल तुमच्या लक्षात आलाच असेल. इकडे सगळ्यांची एक खास ओळख असते. संध्याकाळची सहा ते दहा ह्या वेळी एखाद्या हॉस्टेलवर राहणाऱ्यासाठी आयुष्यातली अत्यंत भकास वेळ. मग तिला थोडं रंगीन करायला सगळे कुठेतरी एकत्र जमून "ignorance is bliss" मधे वेळ काटून नेणार. दररोज संध्याकाळी प्रत्येकाचा नवीन विषय असतो. कोणाची लफडी, कोणाचा वचपा, कोणाच्या फोका....आमच्या कट्ट्यावर पण असे बहाद्दर असणारच. (आता सगळे मार्गी लागलेत.)

सुरवात तानसेन पासून करावी म्हणतो. आमचा तानसेन हा कट्ट्यावरचा राज-गायक होता. (ह्याचा अर्थ असा नाही की तो सगळ्यांपेक्षा चांगलं गायचा.) कही वर्षांपूर्वी विजय मल्ल्याला competition द्यायला मीच एक आमची कंपनी काढली होती. आमच्या कंपनीचं पण नाव "यु.बी" होतं. फरक इतकाच की इथे यु.बी चा अर्थ "उदास बंधू" असा होत. तानसेन आमच्या कंपनीचा "brand ambassador" होता. त्या मागे कारणही तितकंच तगडं होतं. त्याला नेहमी होलसेल मधे टेंशन असायचं. पैसे, धंदा, गायन, घर हे सगळे टेंशन हह्याला स्वस्तात मिळायचे. इतक्या टेन्शन्स पोसणाऱ्याला मग गाणे पण दुखी सुचायचे.

तसं पाहता तानसेन जिद्दी होता. शहरात आलेल्या प्रत्येक audition मधे हजेरी लावायचा. ३-४ round पार करायचा अन् मग सायेब अडकायचे. अगदी पिंपरी-चिंचवड आयडॉल मधे पण आजकाल वशिलेबाजी चालते. तिकडे तर आमचा दोस्त उपांत्य फेरीत जाऊन आला. पण हा साला कधी खच्ची नाही झाला. त्याच्याकडे एक डायरी असायची, त्यात तो आवडलेले गाणे-कविता लिहून ठेवत. कुठे जरा मोकळी हवा आणि परिसर दिसला की तानसेन रियाज करे. "मैने तेरे लिये ही जग छोडा, तू मुझको छोड चली....." ह्यात बीट सुटला म्हणून काय झालं, ह्याचा सूर मात्र जाम उंच लागायचा. दिल चाहता है - मधलं तन्हाई गाणं तर तो जे रंगवून गायचा, एकदम दिल खुष व्हायचं. पण आमच्या तानसेनचा ज्यूक-बॉक्स थोडा लिमिटेड होता. मग आपलं रोज cassette ची आधी A-side वाजायची, अन् मग B-side.

एकदा आम्ही सगळे निलकंठेश्वरला जायचं ठरवलं. पावसाळी हवा होती, त्यात तानसेन ची यारी. थोडं वर गेलो नाहीतर तानसेनला गाणं गायचा मूड आला. आम्ही सगळे आजू-बाजूच्या दगडांवर टेकलो. तानसेन मात्र उभा राहून perform करत होता. आता एका पाठोपाठ ४ गाणे आले होते. आम्हाला वर पोह्चायची घाई लागली होती, पण रियाजमधे टांग अडवणार कोण? तोच खाली शेतातून एक हाक आली..."ओ, बास करा आता!" तानसेनचा लगेच pack-up झाला. हा खरं तर अपमान होता आमच्या तानसेनचा, पण सध्या तो आमच्या पथ्यी पडला होता.

मग एक दिवस  चर्चा खूप रंगली, आजकाल गाण्यांच्या चालीला महत्व आहे की बोल? त्या वेळी हिमेश रेशमियाचे गाणे मोकाट सुटलेले. सगळ्यांचे म्हणणे पडले, की आजकाल गाण्यांमध्ये बोल नसले, अन् रापचिक चाल असली तरी गाणे चालतील. विषय खूप टोका पर्यंत गेला. तानसेनने २-४ दिवसात लगेच एक स्वतःचं गाणं पेश केलं मग!

"पैसा तेरी जेब में कम है तो क्या हुआ?
लेले मेरी जान तू एक.... वडा-पाव" 

त्याला एकदम बँजो स्टायल संगीत पण वाजवलं आम्ही. गाणं लगेच डोक्यात बसलं. तानसेनही खुष!
सुरवातीला खूप उत्साह दाखवला, पण सालं नंतर सगळं ढेपाळलं. आता तानसेन आपली नौकरी करतो, घरच्यांनी लग्न लावून दिलं. गेल्या वर्षी एक मुलगा पण झाला. अजून देखील तानसेनचा अधून मधून फोन येतो. सगळ्यांची आठवण काढतो. गाण्याची आठवण मात्र दोघांपैकी कोणीच काढत नाही. 

मोकळे "आकाश"

25 February 2012 वेळ: Saturday, February 25, 2012
आज मी इथं उभी आहे .. ह्या बुडणाऱ्या सूर्याच्या संगतीन समुद्राच पाणी असं पायावर अनुभवतं...
आकाशी रंग असा हळू हळू लाल मग गडद होईपर्यंत आपण बसलोय इथं .. किती वेळ .. बरेच तास .. काळ गोठलाय जणू ....
आपणही आज आपल्या आवडीचा नितळ आकाशी रंग घातलाय ...
आपलं नेमक उलट झालय नाही का ?....
गडद ,चमचमणाऱ्या रंगातून उठून आपण असे मनासारखे शांत, हलके रंग लेवून बसलोय ...
मागल्या वर्षापर्यंत असलं काही स्वप्नातही पाहायचही आपली हिम्मत नव्हती ...
काय करत होतो आपण ह्यावेळी...... मागच्या वर्षी ..

मागच्या वर्षी पर्यंत मन आणि शरीर एका जागी ठेवायच्या गोष्टी नव्हत्या ...मन खुंटीवर ठेवून काम करायचो आपण ..धंदा करायचो आपण........ तेव्हा हळुवार ,नाजूक काही अस्तित्वात असतं हेच माहिती नव्हंत.. आपली मावशी इतर माड्यानवरल्या मावशांपेक्षा बरी हा एकमेव सुखाचा धागा होता आपल्यासाठी ..बाकी रोजच्या रोज ओरबाडण सहन करत होतो आपण ...

साला तिथं झोपडपट्टीत कसलं गटारात जन्माला आलो .. बाप टाकून गेला आई खंगून मेली.. मामानं इथं आणून विकल आपल्याला.. सहा का काय ते वर्षाच असताना ...आपल्याला थोडफार वाचता येतं म्हणून मावशीने भडव्याला चार पैसे जास्तच दिले..... आणि मग पुढे ह्या धंद्यात घुसडलो गेलो.. आधी बिचकत,घाबरत मग निर्ढावत गेंड्याच्या कातडीने रोजचा खेळ मांडत राहिलो ... आपल्या नशिबात सगळे गिर्हाईक पण गांडूच आले...चांगला प्रेमळ गिर्हाईक हे असलं काही सीनेमातच होत असावं असं म्हणत,कण्हत दिवस काढत राहिलो ... शरीराच लोढण पोटासाठी ओढत राहिलो ..
आणि आयुष्य पलटी खावून असं आपल्या मर्जीने जगू शकू असं कधीच वाटलं नव्हतं... त्या बाईंनी येवून आपल्याला बाहेर काढलं दलदलीतून.. काहीजणींना तरी ह्यातून बाहेर पडू देत म्हणून मावशीला खूप समजावलं . इतर मावाश्यांसारखी आपली जनीआक्का हटून नाही राहिली .. तिनं पोरींवर सोपवला निर्णय .. हा... पण म्हणाली गेलात तर ह्या वस्तीच्या आसपास पुन्हा येत येणार नाही तुम्हाला .. मग मी मेले समजायचं ..

शे पाचशे जणींतून आंपण आणि सरू ,दोघीच बाहेर पडलो बाईंसोबत... आणि शिकत सावरत आता इथे येवून मानान चार पैशे कमावतोय ....
किती वेळ झाला बसलोय नाही .. किती गर्दी कोणी कोणाला ओळखत नाही कोणी कोणाला टोकत नाही ..
अरे हा तोच पोरगा का ... पाहिलं त्यांनपण मला...... ओळखलं वाटत ..
"पूनम इथे कशी ..." त्यानं सवाल टाकलाच
"........................."
"ओळखल नाहीस मला पुण्यात यायचो मित्रांबरोबर तुमच्या इलाक्यात गप्पा मारायला" तो
"अरे तो होय तू .. तरीच म्हणत होते तुला कुठतरी पाहिलंय म्हणून ..." उगाच खोट
"तू एकटीच जिनं नाव सांगितलं होत आम्हाला म्हणून लक्षात राहिलीस बघ , पण इकडे एवढ्या लांब कशी.. आणि किती वेगळी दिसतेयस तू ...." त्याच्या चेहर्यावरच आश्चर्य मला स्पष्ट दिसतंय, कळतंय
"धंदा सुटला माझा ..आता एका स्टोरमध्ये काम करते मी ...." आणि मग त्याला सगळी हकीकत सांगितली... चेहरा उजळत गेला त्याचा ...
एकदम तसाच आहे हा आधीसारखा ..
"काय सांगतेस काय ..मस्तच ग .. खर सांगू पहिल्यांदा तुला आज असं एवढ खुश पाहतोय मी ..."

किती मनापासून बोलतोय हा .. तेव्हाही असाच बोलायचा नाही का .. आणि आपल्याविषयी वाटणारी काळजी,दुखः ह्याच्या चेहऱ्यावर उमटायचं .. आपल्याला ह्याच्या गोर्या, बोलक्या चेहऱ्याच, पाणीदार डोळ्याचं कौतुक वाटायचं .. खूप काही बोलायचं आहे पण हा थोपवून धरतोय असं वाटायचं .. पुरुषाशी गप्पा हा चैनीचा विषय होता आणि मावशी बारीक डोळा करून पाहत रहायची म्हणून काहीच करू शकायचो नाही .. ह्याच अस्वस्थपणं जाणवतं राहायचं ....
आणि आता मनापासून हसत उभा आहे आपल्यासमोर ..जसं काही मोठ गवसलय ह्याला ... आणि अचानक हनुवटी पकडून चेहरा हलवलाय आपला ... किती निरागस,प्रेमळ स्पर्श हा ... एवढ्या वर्षातून पहिल्यांदा अनुभवत आहोत असा स्पर्श ...

तेव्हाही वाटायचं नाही का आपल्याला कोणीतरी हलकेच आपली पाठ थोपटावी, हात पकडून धीर द्यावा .. आणि तेव्हाही ह्याचाच चेहेरा यायचा डोळ्यासमोर .. आपल्यासारख्या बाईकडूनही 'तसली' अपेक्षा न करणारा .. डोळ्यातून धीर देणारा ..
आणि आता अनपेक्षितपणे उभा आहे आपल्यासमोर आपल्या सुखाच्या क्षणी आपण वर्षानुवर्ष वाट पाहिलेला.. स्पर्श देत ...

तेव्हा वाटायचं ह्यालाही आपल्याला असा धीर द्यायचा आहे ... पण त्याला कसलीशी भीती वाटत असावी ..मी काय विचार करेन ह्याचा कदाचित .. मला हे उमजूनही सांगता नाही आल तेव्हा तुला कि, माणसा एवढी वर्ष असले किळसवाणे,ओंगळवाणे स्पर्श अनुभवते आहे मी .. तुझ्या स्पर्शाचा चुकीचा अर्थ मी स्वप्नातही काढू शकले नसते .. पण तू इतका निरागस की मला स्पर्शाचं वाईट वाटू नये म्हणून दूर राहिलास ..मला धीर देता नाही येत म्हंणून स्वतःशी झुंजत राहिलास ...मला तुझी तगमग कळली नाही अस नाही पण माझ्या हातात काहीही नव्हत

आणि इथे तू असा मला धीर देतो आहेस ....

अचानक तुझा चेहरा बदललाय... कसलच अपराधीपण उमटलय तुझ्या ह्या बोलक्या चेहऱ्यावर... मला स्पर्श केलेल्या हाताकडे तू विचित्रपणे पाहत आहेस ..
मी न राहवून विच्रातेय.. "काय झाल रे ........"
तू उत्तर देवू नको देवूच्या द्विधा मनस्तिथीत .." काही नाही "
" बोल रे आज तरी बोल " मी पटकन बोलून गेलेय आणि तू चमकून वर पाहिलयस ..मला तू दडपलेले अनेक शब्द दिसत आहेत हे जाणवून तू चमकला आहेस ...
"खूप बोलावं वाटायचं तेव्हा ...पण नाही जमल .. आणि आज इथे तूला असं हात लावताना अपराधी वाटतंय .. मी भेदभाव केला असं वाटतंय...."
"तसाच हळवा आहेस तू अजून.. तेव्हा नाहीस केलास स्पर्श हे बरचं केलसं तू .. "
"................"
"असला जिव्हाळ्याचा स्पर्श तेव्हा केला असतास तर फक्त अजून दुखं झाल असतं ..कारण काही गोष्टी अनुभवल्या नसल्या की त्या मिळाल्या नाहीत तर आपण कशाला मुकलो आहोत हे माहित नसतं ... कोणीतरी धीराचा स्पर्श करावा असं नेहमी वाटायचं पण त्यात एवढी जादू आहे हे माहित नव्हंतं... आता जाणवतंय तू दूर राहिलास हे चांगलच केलस ... नाहीतर ती नरक यातना अजूनच असह्य झाली असती..

आता तुझा स्पर्श मला धीर देतोय पण दुखः नाही.... वाईट वाटून घेवू नकोस ... शरीरापेक्षा मनाचे हाल किती वाईट हे माझ्यापेक्षा अजून कोण चांगल सांगू शकेल ... मनाला नसत्या शिक्षा देवू नकोस .. तूला माहित नाही तू किती धीर देवू शकतोस,आणि मला भेटलास माझ्या दोन्ही आयुष्यात हे खरच सुखकारी आहे ..हा क्षण दिलास मला ह्याबद्दल मनापासून धन्यवाद ..पण आता जाते.. तू मला दिलेला हा आनंदाचा क्षण तू काहीतरी बोलून हिरावून घेशील की काय ह्याची भीती वाटतेय ..म्हणून मी जाते.. काळजी घे ..."

त्याच्या त्या निरागस,पाणी भरल्या डोळ्याकडे पाहत मी निघालेय ... काळोखी वाळू तुडवत ....एक सोनेरी क्षण घेवून .. जगण्यासाठी..................... मी निघालेय .......

- मातुमैनी.

मच्छी बाजार

12 February 2012 वेळ: Sunday, February 12, 2012



एक संध्याकाळ. वर्सोवा कोळीवाड्याच्या कडेला नुकत्याच बोटीतून ताजे मासे भरून आलेत.

फोटो निकालने आए थे, हलवा लेकर जा रहे हैं|




 
 

शलौम शाब - ११

10 February 2012 वेळ: Friday, February 10, 2012
आता पर्यंत:
भाग  १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
भाग  ६ | भाग ७ | भाग ८ | भाग ९ | भाग १०

 

तृशिली नदी, हिमालय आता लांब मागे सुटले होते. वेळ हा कधीच पुरा नाही पडत. काही गोष्टी सूक्ष्म असतात म्हणून दिसत नाहीत, अन् काही प्रचंड मोठ्या असतात म्हणून दिसत नाहीत. भेटलेल्या लोकांचे स्वभाव तर कमाल होते. एका परक्या देशात, ओळख ना पाळख तरी आपल्यातला म्हणून घेणारे भेटले की कसलं भारी वाटतं. (वरून तुम्ही ह्या पोस्ट अशुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करत वाचलंत....) सगळेच अनुभव इथे मोजत बसणे रटाळ वाटेल. बरेच अनुभव स्वतःपुरताच असलेले बरे असतात, योग्य वेळी ते प्रत्येकाच्या पुढ्यात येऊन पडतात. वेळेचं महत्व म्हणतात ते हे असावं. ना की तीन तासात १०० मार्कांचा पेपर सोडवणे. आयुष्यात काही गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे म्हणून दहावी - बारावीमधे योग्य वेळात पास व्हावं, पण खरंच किती मुलांना इतिहास, गणित, विज्ञान, नागरिक शास्त्रचा मनापासून आभ्यास करावसा वाटतो? (माझ्या मराठी मधे डझनभर चुका आहेत, मी पण शेवटी पास होण्यासाठी केलेला तो आभ्यास.) वेळेच्या महत्वा पोटी जर सगळे गग्या बनू लागले, तर  Human Evolution मधे ही सगळ्यात मोठी चूक ठरेल. हजारो वर्षांनी जर माणसाचे परत माकड झाले तर? Evolution Cycle complete होईल! इकडे हिमालय बघितल्यापासून नझारीयाच बदलून गेलाय.

कधी वेळ  काढावा लागतो, तर कधी वाचवावा लागतो. विज्ञानाच्या मदतीने आता हे सोप्पं होतांना दिसतंय, इतकं सगळं करून पण अनुभव हा वेळेच्या डबीत बसवता आला नाही. अनुभवाने कसलेल्या हातून होणारे ते काम, कला म्हणून ओळखल्या गेलं पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कलाकार असतोच.


सकाळी उठल्या बरोबर बर्फाने झाकलेला हिमालय आता दिसत नसला, तरी हरकत नाही. तो इथेच असेल हे निश्चित. पुन्हा एकदा जनरलच्या डब्यात, वर तापलेला सूर्य. गाडीची सावली पण गाडी बरोबर पळतेय. दिवस सरकतो तसं गाडीच्या नवीन सावल्या दिसतात. मग एक धासू वाक्य जुळलं - "माणसाची पारख त्याच्याकडे बघून नाही, तर त्याच्या सावली कडे बघून करावी. तो उजेडाच्या कुठल्या दिशेला उभा आहे ओळखणं सोपं जातं." वाह मग स्वतःवर खुष होऊन आळस देत जनरल डब्याच्या सह-प्रवाश्यांच्या गप्पांमध्ये रंगलो.

आता परवाची गोष्ट, मित्रांबरोबर चायनीज खायला गेलो होतो. तिथल्या नेपाळी वेटरला "दाई" म्हणून हाक मारली. त्याने एकदम हसून बघितलं. कदाचीत त्याला कोणी त्याच्या भाषेत "दादा" म्हणणारा आज भेटेल वाटलं नसेल.

तुम्ही  कधी निघताय मग?
The only rules that really matter are these: what a man can do and what a man can't do.







शलौम शाब - १०

02 February 2012 वेळ: Thursday, February 02, 2012
काठमांडू आणि पाटण मधून बागमती नदी वाहते. पाटण देखील भारतापुरसारखेच एक इतिहासिक मोल असलेली जागा. सकाळची एक पटकन चक्कर मारून परत फिरलो. मामाचे एक मित्र काठमांडूत असतात. त्यांची पण भेट घ्यावी, म्हणून त्यांना फोन केला. सकाळ संध्याकाळचे जेवण त्यांच्या बरोबर घेण्याचा आग्रह केला. संध्याकाळी तारांकित हॉटेल मधे जेवण, तर सकाळी  नाश्त्यासाठी गुरवार असून सुद्धा माझ्या करता ऑम्लेट. त्यांना एकच हळहळ होती, "आधी फोन का नाही केला. आता सगळं बघून झाल्यावर भेटलास आम्हाला." राजभंडारी परिवार सोबत गप्पा आणि जेवणाचे वेग-वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन नेपाळ होऊन परतायचे विचार येऊ लागले.

कुठे तरी दिलेल्या वेळेत पोहचण्यात ती मजा नाही, जी मनात येईल तेंव्हा प्रवास करण्यात आहे. नवीन लोक, स्वभावांची ओळख वाढवत. कदाचीत ही लोक मला पुन्हा कधी भेटणार देखील नाही, पण कुठेतरी ह्यांच्या स्वभावाची/विचारांची नोंद घेतल्या गेली होती. कधी एखाद्या बाबतीत आत्मविश्वास असल्यास, आपण त्याची चिंता करत नाही. ती गोष्ट नेमकी कशी होणार, हे आतून बाहेरून माहिती असतं. तिच्यात ना आपण सौंदर्य बघतो, न तिच्यातल्या खुबी बघून भारावून जातो. म्हणूनच मी इथले रस्ते फिरतांना त्यांच्या प्रेमात पडायचो. हेच ते रस्ते होते, जे मला माझ्या मनात येईल त्या ठिकाणी पोहचवत. त्यांनी मला कधी कमीपण नाही दिला. तुम्ही कधी अश्या माणसाला भेटला आहात का, जो शुक्रवार पेठेचे कौतुक करतोये. स्वारगेट बस स्थानकाचे भव्य रूपाचे वर्णन करतो आहे. एकदा काय सगळं घिसा-पिटा वाटू लागलं की मग नवीन जागेचा शोध घ्यावा. कोण जाणे तिथले माणसं आणि त्यांचे राहणीमान बघून आपल्याला स्वतःमधे काही नवीन बदल घडवण्याची प्रेरणा मिळेल. नुसता प्रवास करून, तिथले पर्यटन स्थळे पाहून फिरून येण्यात काय ठेवलंय? अश्या फिरण्यात जर तुम्ही तिथली गर्दी आणि मुंबईच्या लोकल मधल्या गर्दीची तुलना करत राहिलात, तर तुम्ही किती वेळ फिरलात?


अजून आपण एवोल्युशनच्या एका transit stage मधे आहोत. माणूस स्थायिक झाला हे निश्चित, पण ह्यात त्याची mobility hamper झाली आहे. माणसाने आता फक्त कामा पुरताच फिरावे? स्वतःच्या भौतिक previlages चे गुलाम बनून राहावे? Needs आणि previlages मधे फरक आहे. नेमकं साला रोटी कपडा आणि मकान मधे आय-फोन घुसला आणि आम्ही सगळे चक्रावून गेलो! ह्यातून बाहेर पडायचा रस्ता आपण सर्व आप-आपल्या परीने शोधू पाहतो आहोत. 

आयुष्य म्हणजे नुसतेच गाठीशी चार पैसे जमवणे. आपल्या अडचणीच्या वेळी खर्च करायचे हे नक्कीच नसावे. ह्या पेक्षा मोठा हेतू क्वचितच कुठे दिसतो. शेवटी सगळ्यांचा एकच शोध चालू आहे, आनंद प्राप्तीचा.

उद्या इथून गोरखपूर गाठायचे.
तिथून पुढे कुठे जायचे ते मला ठाऊक नाही.




  

शलौम शाब - ९

वेळ: Thursday, February 02, 2012
थल्या थंडीची सवय पडली होती. तापमान ४ डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊन आलं, तरी ही थंडी बोचरी वाटत नाही. इथे इतक्या दूर बसून सगळं काही ओळखीचं वाटू लागलं आहे. प्रत्येक जागेची एक खुबी असते. एकदा काय तुम्ही नव्या ठिकाणी आलात, की इथली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नवीन. कुठलीही वस्तू पहिल्यांदा बघतांना मजाच वाटते. नजर इकडे तिकडे पडत असते, येईल त्या बऱ्या-वाईट अनुभवाची परवा न करता ते सगळे गाठीशी ठेवतो. काही दिवसांनी मी पुन्हा मुंबईत असीन, तिकडे अगदी सराईत मुंबईकर असल्या सारखा फिरीन. इराण्याच्या दुकानातल्या त्या सुंदर जुन्या खुर्च्याचं नवल नसेल मला, ना स्टेशनवर तुंबलेल्या गर्दीची भीती. आज काठमांडू पण मला ओळखीचे वाटू लागलंय. ह्या शहराची जादू आता माझ्यावरून उतरते आहे. आपण कितीही दूर गेलो तरी आपल्या विचारांची आणि स्वभावाची वाही नेहमी आपल्या सोबत असते. हेच विचार आणि हाच स्वभाव आपल्याला तिथे पण दिसून येतो. का नाही मग सगळं ओळखीचं वाटणार? मग ह्या वहीचे नवीन पान उघडणे नवीन विचारांची नोंद करून बघितले पाहिजे.

आज एखादा नेपाळी सिनेमा बघावा म्हंटलं, पण इथे नेपाळी सिनेमा पेक्षा शाहरुखच्या रा-वन ची चलती होती. विषय मिटवून भारतापुर शहर बघायला निघालो. इथून एक तासाचं अंतर आहे. ह्या शहराला खूप इतिहास आहे. वास्तुकला बघण्यासारखी आहे. इथले रस्ते बघून मला शाळेत एका धड्यातल्या चित्रातले stone cobbled road आठवले. सकाळची कामं उरकून बायका स्वेटर विणत होत्या, काही धान्य निवडत. पुरुष मात्र कॅरम खेळण्यात रमले होते. एका ठिकाणी थांका पेन्टिंग स्कूल होती. काही लहान मुलं एका घोळक्यात त्यांच्या मास्तरांचे निरीक्षण करत होते. काही मोठी मंडळी मात्र स्वतः होऊन चित्र घडवत होते. त्यात एक सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव असलेला विद्यार्थी एक अत्यंत कोरीव थांका रंगवत होता. तो इतरांसारखे कागदावर रंगवत न्हवता. ह्या चित्रांमध्ये symmetry खूप ठिकाणी दिसून येत होती.  तिथल्या एका मास्तरने मला माहिती सांगितली. ह्या चित्रांचा वापर गौतम बुद्धांची शिकवण येत्या पिढी-दार पिढीला शिकवण्यासाठी केल्या जातो. जसे आपल्या शाळेत विज्ञान शिकवणाऱ्या बाई periodic table चा हे मोठा चार्ट घेऊन येत, तसं असावं हे. शिकवणीचे चित्रिकरण करण्याची हे सगळ्यात सुलभ आणि सरल पद्धत. हे सुती कापडावर अथवा सिल्कवर रंगवल्या जातं. ह्यात वापरलेले रंग पाल्या पासून किंवा रंगीत दगडांची भुकटी करून त्यात गोंद मिसळून बनवल्या जातात. इथे एक मुलगा सोन्याच्या छोट्याशा तुकड्याला उगाळून बनवलेल्या सोनेरी रंगाने त्याच्या चित्र रंगवत होता. आज ह्या चित्रांना commercial scale वर पण मागणी आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी ६ ते ७ वर्ष ह्या मुलं नेमाने येऊन इथे शिकतात. तुम्हाला जर काही थांका चित्र बघायची असतील तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयला जरूर भेट द्या.



दरबार चौकात पर्यटकांची प्रचंड गर्दी लोटली होती. तिथल्याच एका छोट्याशा घर वजा उपहारगृहात जेवण मागवलं. हे एक तिबेटी उपहारगृह होतं. फ्राईड मोमो मागवले. समोर पाटी "टोंगबा - हॉट बिअर" ची पाटी वाचली. ठरलं तर मग, हॉट बियर हा काय प्रकार आहे तपासून बघायचा. थोड्यावेळात माझ्यासमोर एका मोठ्या अल्युमिनियमच्या पेल्यात अल्युमिनियमचा straw टाकला होता. वरून झाकणी. त्याने एक मोठा थर्मास भरून गरम पाणी आणले. पेल्याची झाकणी उघडली, त्यात आंबवलेली नाचणी होती. त्यात गरम पाणी ओतलं. अल्युमिनियमची नळी खालून चपटी केली होती, त्या मुळे नाचणी वर येत नसे. चवीला तुरट अशी टोंगबा  त्या उपहारगृहाच्या मालकाला कडून मग हिला बनवण्याची पद्धत माहिती करून घेतली. आधी नाचणी आणि "मार्छा" (हा काय प्रकार असतो मला माहिती नाही, पण हा तितकाच जरुरी घटक आहे.) आधी शिजवून एका भांड्यात हवा बंद करून ठेवल्या जाते. ६ महिने आंबवलेल्या ह्या नाचणी मधे गरम पाणी मिळवून टोंगबा पेश केली जाते. टोंगबा मधे ६-७ % अल्कोहोल असते. एकदा चवीची सवय पडली, की रुचकर लागते. राक्षी बनवण्याची पण पद्धत सारखीच आहे, फक्त राक्षी बनवतांना तांदूळ देखील वापरता येतात. तांदळाची राक्षी एक महिन्यात आंबते, नाचणीची सहा महिन्यात. थर्मास मधे ५-६ वेळा ग्लास भरता येईल इतके पाणी होतं. इथल्या थंडी करता ही बियर खरंच एक उत्तम पेय आहे. सोबत फ्राईड मोमो होतेच. बढिया वाफाळलेल्या मोमो बरोबर टोंगबाने मजा आणली.


इकडे तिकडे फिरून भटकून आलो. मला इथून लगेच निघायची इच्छा न्हवती. एका ठिकाणी एक toy-maker दिसला. तो काही घोडे बनवत होता. मी सहज त्याला विचारलं, की मी त्याला मदत करू शकतो का म्हणून. त्याने सगळ्यात सोप्पं काम मला दिलं, खिळे ठोकून सगळे तुकडे एकत्र जोडायचे. बसल्या बसल्या सगळ्या घोड्यांचे अव्यय जोडून झाले. घोड्यांची फौज उभी झाली होती. गप्पा मारता मारता सगळे घोडे उभे झाले. घराच्या व्हरांड्यात बसून खेळणी बनवणाऱ्या ह्या toy-maker चा आणि त्याच्या बायकोचा फोटो काढून तिथून निघालो.


परत येतांना सहज मनात विचार आला, ह्या सर्व ठिकाणी हिंडून फिरून अनुभव घेतांना मला स्वतःला अनेक तडजोडी करायला लागायच्या. इथल्या प्रत्येक अनुभवाचा आस्वाद घेण्याकरता आधी आजू-बाजूच्या परिसरात मिसळून जाणे महत्वाचे वाटते. पण कदाचीत असं तर नाही, की ह्या adjusting स्वभावामुळे मी आपला स्वतः भोवती स्वतःच्या कम्फर्ट झोन बनवून त्यातच संपूर्ण नेपाळ बघ्तोये. हे काहीतरी वेगळं होतं. असं तर नाही म्हणून आज सकाळ पासून मला ह्या इलाक्याच्या अनोळखीपणा ओसरून गेल्या सारखा वाटत होता. कदाचीत हे एका विशष्ट साचेबद्ध विचारसरणी मुळे असावे. खरंतर विचारांच्या तारेला वाटेल तो आकार देता येऊ शकतो, नाही का? आपलं उगाच हिच ती पूर्व दिशा समजून आपण आपल्याच वर्तुळातल्या पूर्व दिशे कडून सूर्य उगवायची वाट बघतोये असं वाटतं.









 

 



शलौम शाब - ८

22 January 2012 वेळ: Sunday, January 22, 2012
आज काठमांडू मधल्या लहान - मोठ्या गल्ल्या फिरून यायचं ठरवलं. थामेल मधली रौनक संध्याकाळी बघण्यासारखी असते. सुरवात परत एकदा गौशाला कडून करायची होती. पशुपतीनाथचं मंदिर बाय-पास करून सरळ घाटावर जाऊन सकाळचा वेळ काढावा म्हंटलं. पशुपतीनाथ मंदिर हे बागमती नदी किनाऱ्यावर आहे. मंदिराच्या मागे घाट आहे. मंदिरात शिव लिंगावर होणाऱ्या अभिषेकचा तीर्थ एका गोमुखातून बागमती नदीत वाहत जातं. हिमालयातून वाहत येणाऱ्या ह्या नदीत आता दुनियाभरच्या गोष्टी निर्माल्यच्या नावाखाली येऊन पडतील. नदीचा आणि प्रदूषणाचा ही पहिली भेट. एका बाजूने एक प्रेत आले. जमलेल्या गोऱ्यांना "हिंदू क्रिमेशन" म्हणून त्यांच्या गाईडने सांगितलं. थंडीमधे सकाळी सकाळी वैतागून गाईडला पैसे दिले आहेत म्हणून निघालेली युरोपीयन म्हातारी पण थोडा रस घेऊन "हिंदू क्रिमेशन" पाहू लागली. बऱ्याच जणांना त्याचा विडियो रेकॉर्ड करावसा वाटला. त्यात एकाच्या गळ्यात २ भारीतले SLR दिसले. 70-200 mm एल सिरीजचा वापर एका अंतिम क्रियेचे फोटो काढण्यासाठी उपयोगी पडतांना बघून मला पण हसू आलं. घाटाच्या ह्या बाजूला कुज-बुज वाढू लागली. कोणाला कशाचं कुतूहल वाटेल हे सांगणं खरंच मुश्कील आहे. हा माणूस, ह्या "हिंदू क्रीमेशन" चे फोटो काय म्हणून दाखवणार आहे कोण जाणे. तरी नशीब इथे प्रेत नदीत सोडून द्यायची पद्धत बंद केलीये.

समोर मंदिरात आरती संपत आली,  मी तिथल्या ढोंगी साधूचे फोटो घेतले. एका परदेशी पर्यटकाने २-३ साधू गोळा केले होते. त्यांना पैसे देऊन, फोटोसाठी पोज द्यायला लावत होता. त्याचा गाईड - हूडचं काम करत होता. मी मनात ठरवून ठेवलं, ह्या साधूने आपल्याला पैसे मागितले तर त्याला पैश्यांच्या मायेत अडकू नाही द्यायचं. त्यातल्या एकाने मला विचारलं "which country?" आणि मला globalization ची जाणीव झाली! स्वतः ला नागा साधू म्हणवणारा इंग्रजाळलेला होता. मी त्याच्याशी गप्पा मारत त्याचे फोटो काढत बसलो.

परत जातांना वाटेत एक नागा साधू भेटला. त्याच्याशी बऱ्याच गप्पा रंगल्या. त्याची तपस्या अजून सुरु झाली नव्हती. त्याचे भ्रमण अजूनही सुरु होते. त्याने तपस्या करण्यासाठी एक जागा पण बघून ठेवली होती. "मै पढा-लिखा नही, मगर आंखो से देखकर सब समझ लिया |" त्याच्या कडून बरंच काही समजलं. म्हणे बनारस (वाराणसी) मधे गंगा पोहत पार केली तर स्वर्ग दिसतो. सगळे देव एकत्र बसलेले दिसतात. हा काय नवीन किस्सा आहे? कदाचीत तो रुपकात्मक अलंकार वापरात आहे. खरोखर स्वर्ग नसून, त्यात काही वेगळं कारण असेल. मी माझ्या सोईचा अर्थ लावला. मोघलांच्या हल्ल्या पासून मूर्त्या वाचवण्यासाठी, त्यांचं विसर्जन गंगेत केलं असावं. सगळे देव-देवता जिथे एकत्र येतील तिथे स्वर्ग उभं करणारा हा साधू मनोवेधक वाटला. मी मुक्तीनाथ होऊन आल्याचं कळताच, मुक्तीनाथ बाबाला शालीग्राम देण्याचा विषय काढला. शालीग्राम कधी विकत घ्यायचा अथवा द्यायचा नसतो. तो स्वतः जाऊन वेचावा लागतो. तो त्याच्या प्रवाहात बोलत होता. जे समजलं ते लक्षात ठेवलं. नर्मदेचा विषय निघताच, त्याच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितला. नर्मदेच दर्शन करून आलेल्याचा आशीर्वाद घ्यावा म्हणे. मी पण संकोचत त्याच्या जटाधारी डोक्यावर हात ठेवला. त्याने त्याच्या पिशवीतून कसलीशी पांढरी भुकटी काढली, अन् कपाळाला लावली. मग मी पण त्याचे काही फोटोज घेतले. गप्पांमध्ये बराच वेळ पळाला होता, खैर मला इथे कसलंच वेळापत्रक नसल्याने फरक पडत नाही.

आज भक्तापूर ऐवजी स्वयाम्भुनाथला जाऊन यायचं मनाशी ठरवलं. माय्क्रो पकडली. स्वयाम्भुनाथ हे सगळ्यात जुनं स्तूप आहे. वर पर्यंत रस्ता जातो, पण त्यासाठी वर जाणाऱ्या बसची वाट बघत बसावं लागलं असतं. त्यापेक्षा पायऱ्या चढून लवकर पोहचलो. इथे बरेच चित्रकार होते. बऱ्याच जणांचे स्टुडियो होते. तिथे बसल्या बसल्या हिमालयाचे नजरे त्यांच्या कॅन्वासवर उमटत असतांना बघून मजा वाटली. काठमांडू शहराचा पसारा इथून दिसतो. इथे सोलापूर होऊन आलेले कित्तूर भेटले. ते साठ माणसांच्या गटात, कुठल्याशा travel agency बरोबर आले होते. ते कुठल्याशा travel agency बरोबर आले होते. त्यांनी आपल्या इतर साथीदारांशी ओळख करून दिली. सगळ्यांनी मला रात्री महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण जेवायचं आमंत्रण दिलं. रात्रीचे परतीचे वांदे नको म्हणून मी नेपाळी जेवणात सुख मानलं. बाग बाजार पासून चालत थामेलला आलो. चालत जायला वेळ लागतो, मात्र इतकं सगळं बघितल्यानंतर पचवतापण आलं पाहिजे. आपलं चालतांना हे सगळं रवंथ करायला बराच वेळ मिळतो. आता इथले रस्ते नीट समजले आहेत. नकाश्याची गरज पडत नाही. थामेलच्या गल्ल्या तसे फार confusing, पण हळू हळू सवय पडते. चे-गुवेरा, बॉब मार्ली, गन्स अन् रोसेस, लेड - झेप्प्लीन ची चित्रं असलेले ध्वज विकायला ठेवले होते. इथे पण बाजारात फिरतांना खोटं-खोटं हसून "हेलो, कम इन प्लीज" म्हणणारे दुकानदार चुकवत फिरावं.


आज नेपाळी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. डोळ्यावर झोप आली अन् रूम कडे पाउलांनी रूमची वाट धरली. रूम मधल्या भूताची मात्र आता भीती निघून गेली होती. पडल्या पडल्या झोप लागली.

रूम मधल्या भूताची मात्र आता भीती निघून गेली होती. पडल्या पडल्या झोप लागते.

 


शलौम शाब - ७

04 January 2012 वेळ: Wednesday, January 04, 2012
खोली तशी लहान एक पलंग, कोपऱ्यात टी.व्ही, एक छोटा स्टडी टेबल आणि खुर्ची. एक साधारण हॉटेलची खोली असावी तशी खोली. आडवा पडलो, आणि बघतो तर वर पंखा नाही. फक्त पंखा लावायला एक bracket दिसत होती, आणि insulating टेपने वायर झाकली होती. धोबी घाट सिनेमा मधला पंखा डोळ्यासमोर आला, सब-कोन्शियास मधून वाराणसी मधली गोष्ट आठवली. आता मी दिवा विझवला, की दिवा आपोआप चालू होईल का? उगाच प्रश्न भंडावू लागले. आता नवीन रूम शोधायची इच्छा नव्हती, आज दिवे चालूच ठेऊन झोपायचं ठरवलं. बघु काय होईल ते. झोप लागे पर्यंत असंख्य विचार डोक्यात नाचून गेले. शेवटी एकदाची झोप लागली, जाग आली ती थेट पहाटे सहा वाजता. सकाळी उठून इथल्या थंड पाण्याचे शिप्के चेहऱ्यावर घेतले की झोप कुठल्याकुठे पळून जाते. चहा पितांना आदल्या रात्री मनात चालेल्या चकमकीची आठवण झाली. मला तर काही विचित्र अनुभव नाही आला. नेहमी सारखी छान झोप लागली.

शेवटी भूत म्हणजे काय? जे आपल्या माहितीत नाही, ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही अश्याच गोष्टी भूत म्हणून भंडावून सोडतात. लहानपणी गणिताचं भूत देखील असंच मानगुटीवर बसायचं. फक्त ते भूत पुस्तक मिटताच नाहीसं होत असे. अजून बरेच प्रश्न आहेत जे आपल्याला सुटले नाहीत. कदाचीत सुटले तर आणखीन नवीन कोडी आपली वाट बघत असतील. आपणच एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा, आणि मग आपणच त्याला छानसं नावं द्यायचं. आता न्युटनने सफरचंद पडतांना पाहिलं, आणि त्याने त्याचा आभ्यास करून गुरुतात्वाकर्षणचा शोध लावला. ह्याचा अर्थ असा नाही की न्युटनने शोध लावायच्या आधी gravity अस्तित्वात न्हवती. ह्या निसर्गात सगळं आहे, सर्व शक्ती आहेत, आपण फक्त त्या वेवलेंथ वर ट्यून व्हायचे बाकी आहोत. सालं डोकं पण जाम वांड प्रकार असतो. काही कळायच्या आत, धोबी-घाटचा पंखा, वाराणसी मधला आणि काठमांडू मधल्या खोलीतला नसलेला पंख्याची एकत्र  कडी जोडून मोकळा झाला.

आज काठमांडूच्या गल्ली बोळ फिरायचे आहेत. सुरवात पशुपतीनाथच्या मंदिरापासून करावी म्हंटलं. दार्जलिंगमधे प्रती पशुपतीनाथ मंदिर पाहिलं होतं. मी ज्या इलाक्यात राहात होतो, त्याला थामेल म्हणत. इथून आता रत्नापार्क आणि रत्नापार्क होऊन पुढे गौशालाकडे जाणाऱ्या माय्क्रो पकडायची होती. किती काय, भाडे होईल ती चौकशी करून बसणे कधी पण चांगलं. गौशालेला जातांना एक ओळख झाली, त्यांनी संपूर्ण पशुपतीनाथ मंदिर दाखवलं. प्रत्येक मूर्तीची खासियत सांगितली. मंदिरात प्रचंड गर्दी होती, पण तरी आत पटकन घेतलं. ह्या मंदिरचं कौतुक करावं तितकं कमी. सुंदर बांधकाम शैली, त्यात एक-एक पौराणिक कथा रोवल्या होत्या. एका ४ फुटी कमानीमधे मोठा घंटा बांधला होता. वर मंदिराच्या छतावर माकडांची चढा-ओढ लागली होती. मग माकडं भांडू लागली, घंट्या बांधलेल्या साखळी वरून दुसऱ्या साखळीवर आणि मग तोल जाऊन धप्प-कन्न खाली माणसांच्या गर्दीत. एक क्षण, पुजाऱ्या पासून ते बाहेरच्या द्वारपाल - सगळ्यांचे लक्ष ह्या माकडांचे चाळे बघण्यात गुंतले होते. एक क्षण सगळं काही फ्रीझ झाल्यागत.

आपल्याकडे, मंदिरांच्या बाहेर दारापाशी यक्ष - यक्षिणीच्या मुर्त्या असतात तसंच इकडे भैरव नेपाळ मध्ये यक्ष मानल्या जातो. बाजारात याक्षांचे मुखवटे देखील विक्री साठी असतात. मुखवटे हे पारंपरिकरीत्या काही जमातींमध्ये सणानिमित्त नृत्याच्यावेळी घातल्या जातात. इथे बऱ्याच प्रथा भारतातल्या सारख्या आहेत. अगदी बारीक फरक असतील तेवढेच. आत प्रकाशचित्र काढण्यासाठी मनाई होती. आसपासचा परिसर फिरून, तिथून पुढे बौद्धनाथला जायचं ठरवलं. चालत जाण्यासारखं अंतर, आणि काठमांडू मधल्या रस्त्यांवर फिरता बऱ्याच गोष्टी आढळतात. हिंदू राष्ट्रात, काही मंदिरात फक्त हिंदू धर्माच्या लोकांना प्रवेश मिळेल. इतर लोकांनी बाहेरून मंदिर बघून समाधानी व्हावं. काठमांडू म्हणजे देव-देवालयाचे शहर म्हणता येईल. थोड्या-थोड्या अंतरावर सुंदर, मंदिर बांधले आहेत. त्यांच्या प्रत्येक भागात कलात्मकता दिसते. लाकडी चौकटीवरचे कोरीव कामात अचूकता. ज्यांनी हे कोरीव काम केलं असेल, त्याने अगदी मान मोडून काम केलंय. प्रत्येक प्रांताच्या बांधकामाची एक वेगळी शैली असते. मराठ्यांची बांधकामं भक्कम असत. फार कोरीवपण दिसत नाही. तोच पेशवाईमधे कोरीव काम दिसून येतं. मोगल साम्राज्यात, कलात्मक दृष्टीकोनाने वास्तू निर्मिती दिसून येते. ह्यावर इतिहासाची एक छाप राहून जाते. प्रत्येक राजकर्त्याच्या विचार सारणीचा अंदाज येतो. असेच architectural सौंदर्य बघण्यासाठी उद्या भक्तपुर बघायचं ठरवलं.

पशुपतीनाथ मंदिरापासून दोन-तीन किलोमीटर वर बौद्धनाथ आहे. हे नेपाळ मधले सगळ्यात मोठे स्तूप मानल्या जातं. इथे, हवेत थंडी असल्यामुळे चालत फिरतांना थकवा येत नाही. (पैसे पण वाचतात, ते वेगळं.) बौद्धनाथला पोहचलो. ओम माणि पद्मे हुम - तिबेटीयन chant ने एक माहोल बनवून ठेवला होता. (सालं, आपल्याला तर एखाद्या गोष्टीपेक्षा माहोल जास्ती लागतो. आभ्यास कमी केला असेल, पण अभ्यासाला लागणारा complete माहोल कसा बनवावा हे मला विचारा!) काही महिन्यांपूर्वी दातारने हा तिबेटी chant ऐकवला होता. मग रात्री आभ्यास करत असतांना व्हाईट नॉइझ म्हणून हा chant लावायचो. हळू हळू हा chant डोक्यात बसला. आता हे chanting काही नवीन नाही. इथे बऱ्याच ठिकाणी तिबेटी लिपीमधे "ओम माणि पद्मे हुम" लिहलेले दिसून येतं. इथे एका तिबेटी चित्रकाराने मला ह्या मंत्राचा अर्थ सांगितला. माणसाच्या आयुष्यात चालू असलेले पाप-पुण्याचे चक्र एकदाचे थांबावे. मानवाला मोक्ष प्राप्ती व्हावी. असा काहीसा अर्थ त्याने समजावून सांगितला. इथे छोट्या भांड्यांमधे पाण्यात झेंडूची फुलं ठेवलेली दिसतात. त्या पाण्यात फुलाचा थोडा रंग उतरला आहे. हेच पाणी वर स्तुपावर सडा टाकायला वापरत असावेत.

पायतोड करून मग राज दरबार बघायचं ठरवलं. इथे आता वस्तू संग्राहलय बनवले आहे. इथे प्रत्येक वस्तू वर सुयोग्य प्रकाश योजना केली आहे. खाली टिपणी देखील सुटसुटीत आहे. आज दुपारच्या जेवणाला लटकी बसली. आता पोटात आग पडली होती. पुन्हा एकदा थामेलमधे येऊन पोहचलो. थामेल - हा इलाका tourist ने भरलेला असतो. म्हणून इथे थोडी उशीर पर्यंत चेहेल पेहेल असते. इतर भाग मात्र साम-सूम असतात. रस्त्याने फिरत, बाजार बघत थामेलच्या गल्ल्या पार पडत होत्या. एका ठिकाणी, एक छोटंसं चायनीज उपहार गृह दिसलं. ह्या रोड साईड उपहार गृहत निवांत शांत बसून आज काढलेले फोटो परत एकदा नीट बघत खायचं होतं. आज म्हशीचे मांस खाऊन बघितले. इथे थूकपा नावाचा एक पदार्थ मिळतो. त्याला आपण सुपी-नूडल्स म्हणू. ह्यात म्हशीचे मांस थोडं रबरी लागत होते. जबड्याचे व्यायाम करण्यासाठी मी नक्की हे खाईन.

परतीच्या वाटेवर जरा भटकलो, पण आता हा इलाका कोळून पाठ झाल्यागत आहे.आज मात्र मेल्यासारखा गाढ झोपलो.

                                                                                                 


 




AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates