१२ ऑक्टोबर:
अगदी कंटाळा आलाय.
नित्यक्रमाचा कंटाळा आलाय.
ह्या गडबड गोंधळाचा कांटाळ आलाय.
रोज दिसणाऱ्या चेहऱ्यांचा कांटाळ आलाय.
माझ्या मोबाईलचा कांटाळ आलाय.
माझ्या कपड्यांचा कांटाळ आलाय.
अण्णाच्या चहाचा पण कांटाळ आलाय.
आज पासून पुढील ७-८ दिवस मला वेळ आहे. गेल्या २-३ वर्षांपासून मनात एक "फ्रिक ट्रीप" मारायची इच्छा होती, आणि अश्या योजना वरच्यावर हवेत विरून गेल्या. गंगोत्री, pondicherry चा एकच निकाल लागला.
काही दिवसांपूर्वी एका मित्राशी कथकलीचा विषय निघाला होता. केरळ बघावं. ठरलं तर, एक केरळ ची अतरंगी ट्रीप! तशी तयारी काही करायची नव्हती. २ जोडी कपडे, कॅमेरा (बंड्याच्या भाषेत - तिसरा डोळा), १०-२० कोरे कागद, पेन आणि डायरी. केरळची माहिती गुगल करण्याऐवजी वाटेत मिळवण्याचा पर्याय निवडला मी. अजून एक गंमत म्हणून हि ट्रिप १००० रुपयांमध्ये उरकायची ठरवलं. (मध्ये एक कार्यक्रम बघितला होता - बेग, बॉरो ऑर स्टील. तसाच काही करायची इच्छा होती.) हे काही जमेल कि नाही, ह्याची खात्री नव्हती. पुणे स्टेशन वरून १९:०० ला कुठलीशी केरळला जाणारी ट्रेन आहे, हि माहिती मिळवली. तासभर आधीच स्टेशनवर पोहचून जनरल डब्याचं त्रिचूर पर्यंतच तिकीट काढलं. त्रिचूरपासून कलामंडलम जवळ असल्याची माहिती, एकदा कथकलीबद्दल वाचतांना मिळाली होती. तसंही कथकलीबद्दल बरंच कुतूहल होतं. तिकीट साधारण २३२ झालं. पहिलाच इतका मोठा बांबू. या हिशोबा प्रमाणे आपण तर कंगाल होऊ - वेग पकडणाऱ्या डब्याच्या दारात उभा असतांना हा विचार चाटून गेला. पैसे कमवायचा मार्ग शोधला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी कर्जत स्टेशनला वडापाव हातोहात विकले होते. असंच काही करावं. वडापाव मागे फार कमी पैसे येतील. पुस्तकं विकण्यात जास्ती मार्जिन काढता येईल.
पुढचं स्टेशन दौंड. जनरलचा डब्बा सोलापूरला उतणाऱ्यांनी खच्चून भरला होता. पुस्तकं विकण्यासाठी हा डबा काही योग्य नाही. स्लीपर डब्यांमध्ये आणि ए/सी डबे आपल्या कामी पडतील. दौंड स्टेशन येताच पुस्तकाच्या दुकानावर धावत जाऊन २ सुधा मूर्तींची पुस्तकं 3०० रुपय देऊन घेतले. या पुस्तकांवर जितकी जास्ती मार्जिन काढीन तितकं बरं. चढतांना स्लीपर डब्यात चढलो. उगाच टी.सी ने पकडून दंड लावण्यापेक्षा, आधी टी.सी ला पटवलं पाहिजे. टी.सी ला शोधून त्याला थोडा अंदाज दिला, टी.सी पण पोरगासा होता. ठीक आहे म्हणे. पाठीवर सामानाची sac, गळ्यात कॅमेरा, आणि हातात २ पुस्तकं. पहिल्या एक-दोन डब्यात जास्ती गर्दी न्हवती. लोक फक्त प्रश्नार्थी नजरेने बघत. शेवटी एकदाचा एक जण भेटला, त्याला डील सांगितली. २००च्या पुस्तकावर मी १०% कमावण्याचा माझा विचार त्याच्या समोर मांडला. त्याने विचारल्यावर त्याला पुस्तकं विकण्याच्या मागचा हेतू सांगितला. थोडी ओळख झाली. टेक-महेंद्र मध्ये कामाला आहे. माझ्या ट्रीप साठी शुभेच्छा दिल्या. आता थोडा आत्मविश्वास पण वाढला होता. दुसरा पुस्तक पण सहज विकलं. दोन्ही पुस्तकं वाचलेली असल्यामुळे, त्यांचं समालोचन देखील पुरवत होतो. टी.सी ने नोंद घेतली होतीच. आता पुस्तकं विकून झाली होती, पुढच्या स्टेशनला जनरलचा डब्बा झिंदाबाद. टी.सी ला सहज विचारलं, "आज काफी सीट्स खाली हैं, कोई जुगाड हो साकेगा क्या?" आणि माझं नशीब फळला! टी.सी ने तिरुपती पर्यंत मला एक बर्थ दिला. अजुबाजुच्या २ काकांशी ओळख करून घेतली. सगळेच झोपायच्या तयारीला लागले होते, मी पण आपली बॅग उशाशी घेऊन ताणून दिली.
आपला,
(भरकटलेला) माचाफुको