Showing posts with label जुळलेली यमकं. Show all posts
Showing posts with label जुळलेली यमकं. Show all posts

Recalling - Her Lacuna

12 June 2011 वेळ: Sunday, June 12, 2011

"कोल्हाट्याचं पोर" वाचून मेघचा Her Lacuna ब्लॉगपोस्ट आठवला... आणि त्यावर केलेली एक कविता...

गावतल्या एका बदनाम गल्लीत, नार उभी करुनी नखरा हो,
वाट पहातसे कोणाची, देहाचा मांडुनि पसारा हो...

भडक तिचे हे रूप असे, जरी ना सुंदर ना मादक हो,
तरी लक्ष घेती वेधुनि, पुरुष पाहती विस्फारुन हो...

लज्जा इच्छा स्वप्न अपेक्षा, मृत झाल्या सर्व संवेदना हो,
जाणिवा करुनि बधीर ती, तृप्त करितसे वासना हो...

शरीरपिपासु जनावरांची, नजर शोधतसे सदा शिकार हो,
नसती का जर ती, तर काय उडाला असता हाहाकार हो...

बलात्कारापासून वाचवतसे, सुसंस्कृत घरचि ललना हो,
विकुनी सत्व तिने स्वत:चे, अब्रु दुसरिची रक्षिली हो...

लाथाडून समाजातून जगाने, तिजवर जरी टाकला बहिष्कार हो,
ओसाड पडतील गावे, परि कधी रिक्त न तिचा बाजार हो...

शमवूनी भोग अनेक जिवांचे, वैरागी ती राहीली हो,
धिक्कारणाऱ्या समाजानेच तिला, शैय्यासोबत केली हो...

भंगलेल्या ह्या अस्तित्वाची तमा कधी ना कुणा हो,
अश्वत्थाम्याच्या जखमेपरि, कधी ना भरेल HER LACUNA हो...

आपला,
(चांगल्या घरचं पोर) सौरभ

पाऊस

02 June 2011 वेळ: Thursday, June 02, 2011

(जुने ठेवणीतले काही...)
ग्रीष्माच्या काहिलीने अवघी सृष्टी होरपळली,
फुंकत प्राण त्यांमधे शितल हवा हळूच झुळकली,
वाहती इकडे तिकडे वारे गार कोणाचे बरे दूत बनून,
काळे मेघ पडघम बडवित नभी अचानक आले दाटून,
दवंडी पिटलि अस्मनि ह्या वीज जेव्हा ती कडाडली,
अगणित सरींची सेना निमिषार्धात ह्या धरतीवर अवतरली,
रिपरिप, रिमझिम, धो-धो करीत पाऊस असा हा बरसला,
कोंदटलेल्या श्वासा-श्वासात मृदगंध सुवासिक दरवळला...

आपला,
(भिजलेला) सौरभ

विडंबन

06 March 2011 वेळ: Sunday, March 06, 2011
मेघच्या ब्लॉगवर एकदा एक विडंबन केलेलं. आज उगीच आळवतोय...

मूळ गाणं: भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

अन् हे ते विडंबन:

तिष्ठणे इथले संपत नाही, मी अजूनी बेरोजगार पडूनी आहे,
दिवस रात्र मी केलेली, ऍप्लिकेशन्स तशीच पेंडिंग आहे...
मी करे अर्ज नोकऱ्यांचा, अन ह्यांतच वेळ जातो वाया,
नाहीच कसला प्रतिसाद, जराशीही उमेद जागवाया...
ह्या रिसेशनच्या नाजूक वेळी, नोकऱ्या गमावून बसती,
हाती घेऊन रिझ्यूमे, दारोदारी कंपन्यांच्या फिरती...
हा झोल नियतीचा सगळा, आयुष्य रखडवूनी गेला,
आर्थिक मंदीच्या दुष्काळात जणू, तेरावा महिना आला...
जाऊनी पलिकडे सगळ्याच्या, मी म्हणे स्वतःला जरा थांब,
कोरड पडली घशास माझ्या, मी इतकी मारली बोंब...
बिगारी कामातील मजूरासम, मी झटलो हो नेटाने,
डोक्यात घालती गोंधळ, विचारांचे अगणित भुंगे...
बधिर इंद्रिये अवघी, हरपुन भान जाणिवांचे,
हे सरता संपत नाही, ग्रहण माझ्या दुर्दैवाचे...
हे सगळे अवेळी होते, फास्यांनी चुकविली खेळी,
मेंदुत राहीली माझ्या, विणलेली कोळ्यांची जाळी...


आपला,
(लय बेक्कार) सौरभ

मी...

18 December 2010 वेळ: Saturday, December 18, 2010
Okay, खालच्या ओळी मला कशामुळे सुचल्या ते आधी सांगतो. अनघा मॅमच्या ब्लॉगवरची "दुभंगलेली" हि पोस्ट वाचली. मेंदु घुसळला गेला, विचारांच वादळ सुटलं आणि मी भरकटलो. आता त्या पोस्टचा आणि खालच्या ओळींचा नक्की काय कसा संबंध ते विचारु नका. बस्स... वाटलं काय तरी... सुचलं... लिहलं. (खर्र सांगू काय... मला उगीच लय भारी काहितरी लिहल्यासारखं वाटतय. ;-) माहित नाही का. पर आज अपन अपनपेईच खुष है!!! हिहॉहॉहॉ... चला... भगव्या रंगाचं धोतर शिवायला टाकलं पाहिजे. :-P)

सूर्य मी, चंद्र मी, दिवस जसा तशी रात्र मी...
हस्तक्षेप ना कुणात माझा, नं माझ्यात कधी आले कोणी...
मी उगवतो, मी रहातो, मी पहातो, मी मावळतो...
पृथ्वीवरच्या सर्व बदलांस तरी का सर्वथा जबाबदार मी...
भंगते ती, भिजते ती, उजाडते ती, सजते ती...
फेर धरुनी फिरते ती, स्वतःच सर्वाचे कारण ती....
भविष्य घडवण्या तुच समर्थ, तुजमध्ये ना कधी लुडबुडलो मी...
तुझ्या नशिबाच्या कुंडलीपंचांगांमधे तरी कसा बरे फसलो मी...

आपला,
(अगम्य) सौरभ

कवितेची कत्तल

27 November 2010 वेळ: Saturday, November 27, 2010
मला बनवायचीये एक दुःखीकष्टी क्लिष्ट कविता.
म्हणुन मी आणलेत काही हुंदके आणि उसासे.
प्रेमात विव्हळणारी आणि दुःख कुरवाळणारी माणसे.
पोळणारा पाऊस, बोचणाऱ्या आठवणी.
उडालेले रंग, अर्धवट राहिलेली कहाणी.
पाहिलेली स्वप्न ज्यांच्या ठिकऱ्या उडाल्या.
नात्यांची बंधन ज्याच्या चिंधड्या झाल्या.
आणला एकटेपणा तो जो आयुष्यभर पुरला.
सोबत अपयशाचा करंडक ज्याला डोईवर मिरवला.
जितक्या होत्या यातना वेदना त्या सगळ्या मिळवल्या.
एकमेकांत मिसळुन कालव कालव कालवल्या.
एकजिनसी मिश्रण ते भोवताली वाटले.
आसवं डोळ्यात आणत त्यांनी चवीनं चाखले.
प्रेमळ माणसं ती, मनभरुन वाटून खाल्लं.
माझंच दुःख माझ्यासाठीच नाही उरलं.
भरलेलं पातेलं चाटूनपुसुन लख्ख केलं.
परतफेड म्हणुन, प्रेमानं पुन्हा भरुन दिलं.
मला आश्चर्य वाटलं, ते कोणीच गंभीर नव्हते.
तृप्त समाधानी असल्यासारखे सगळेच हसत होते.
आयला हे तर मॅटरच उलटं झालं.
मला अपेक्षित होतं एक आणि भलतच काही घडलं.
म्हटलं अरे हसताय काय? तुम्ही रडावं म्हणुन मी दुःखी कविता केली.
त्यावर अजुनच हसत ते म्हणाले, "अरे त्या कवितेची आम्ही कधीच कत्तल केली."
दुःखी होणं आमच्या स्वभावात बसत नाही.
कोणी झालेलं आपल्याला बघवत नाही.
दुःखपण सालं दुःखी, सगळेच त्याची हेटाळणी करतात.
दुःखालापण आम्ही गोंजारतो, मग तीपण खुदकन हसतात.
आता दुःखच जर हसलं, तर आम्ही का बरं रडावं???
हसावं आणि हसवावं, असंच आपण जगावं...


आपला,
(कातिल) सौरभ

हिशोब... काहीच्या काही...

24 December 2009 वेळ: Thursday, December 24, 2009
बसलेलो मी एकदा असाच, एका निवांत क्षणी
जमवून आठवणी, मनात काही अन् डोळ्यात काही...

मांडला हिशोब सगळा, जगलेल्या पुर्ण आयुष्याचा
प्रत्येक त्या क्षणाचा, हसलेलो काही अन् रडलेलो काही...

जमाबाकीच्या ताळेबंदात, स्तंभ दोन पडले
क्षण मी विभागले, सुखांचे काही अन् दुःखांचे काही...

झाली गणिते सगळी, मोजणीस ना काही उरले अन्य
शेवटी बाकी शुन्य, ना गमावले काही ना कमावले काही...

आपला,
(रिक्त) सौरभ

दिनचर्या

16 December 2009 वेळ: Wednesday, December 16, 2009
पहाटेचा रामप्रहर, वाजे घड्याळी गजर| झोपेचं खोबरं, होतसे||
पेंगुळलेले डोळे, जड त्या पापण्या| स्वप्नांचा चक्काचूर, पहातसे||
दमदार जांभई, अन् आळस घेऊन| गजराचे घड्याळ, पुन्हा स्नूझमधे||
उषःकाल सरुन, मध्यान्ह जाहली| निद्राभंग झाला, गरमीने||
आढेवेढे घेत, पांघरुण सारले| उठावे लागले, नाईलाजे||
प्रातःर्विधी कारणे, न्हाणीघराकडे कूच| नेमक्यावेळी ते, व्यस्त असे||
तोवरी आदण चहाचे, ठेवावे गॅसवर| दिवसाची सुरुवात, अमृताने||
दंतमंजन लेप, घ्यावा ब्रशवरी| लेपून तोंडभरी, मौजे घासावे||
खळाखळ भरुन चूळ, मुखमार्जन पात्री| चेहरा धुवावा, साबणाने||
शुचिर्भुत होवून, प्रसन्न व्हावे| दिनक्रम आपुला, आरंभावा||
चहा वाफाळता, घ्यावा गाळून| सोबती रवंथ, बिस्किटांचे||
बैठक घ्यावी, लॅपटॉपसमोर| साईट विहार, प्रारंभावा||
ना स्क्रॅप कोणाचे, ना एकही ईमेल| तरी पेज रिफ्रेश, करित रहावे||
घटीका सरतील, निष्क्रिय अश्याच| गर्भी उद्रेक, वायुचे||
सारुन बैठक, घ्यावी विश्रांती| निमित्त करावे, न्याहारीचे||
शमवूनी भुक, वामकुक्षी घ्यावी| बागडावे आनंदे, संध्याकाळी||
रात्र होता परतावे, आपुल्या घरी| व्यवस्था करावी, भोजनाची||
आपलेच हात, अन् आपलेच पोट| जाणोनी करावा, स्वयंपाक||
चलचित्र पहाता, उदरभरण करावे| तृप्त व्हावे करुन, हे यज्ञकर्म||
पांघरुण पसरुन, द्यावी ताणून| निद्रिस्त व्हावे, शांतचित्ते||
स्वप्नांचा खेळ, खेळत झोपावे| असा न्यावा दिवस, पुर्णत्वे||
दिनचर्या अशीच, थोड्याफार फरकाने| होतसे रोज त्यात, नाविन्य नसे||
सौरभ म्हणे ज्याने, कंठीले आयुष्य ऐसे| आदर्श बेरोजगार म्हणूनी, गौरवावे||


आपला,
(संत) सौरभ

SDLC (सॉफ्टवेअर डेव्हलोपर्स लाईफ साईकल)

17 November 2009 वेळ: Tuesday, November 17, 2009
कोण म्हणूनी पुसता मजसी, मी एक इंजिनिअर आहे,
मनुष्यांपेक्षा ज्याचे जिवन, यंत्रसानिध्यात गेले आहे...

कोडिंग करण्यात घालवले मी, तास अनेक अनेक,
दिवस रात्रीचे घड्याळ माझे, कधिच बिघडून गेले आहे...

दिवस अन् रात्रीतला फरक, वेळेला माझ्या कधी गमला नाही,
डेडलाईनचे घड्याळ मात्र, काटेकोरपणे अगदी पाळले आहे...

प्रोग्रॅम माझा प्रगत, करे वेळेची बचत,
बचत करण्यात ही, सारे आयुष्य खर्चिले आहे...

सगळेच कसे सोपे केले, बटण दाबताच कामे होती,
बटण दाबण्यासही कष्ट व्हावे, मनुष्य इतका आळशी आहे...

सोशल साईट्सच्या माध्यमातून, जगास मी जवळ आणतो,
पण स्वतःच्या नातेबंधांचा, विसर मज आज पडला आहे...

मोठ्या कंपनीत उच्च पदावर, लठ्ठ पगार कमावितो मी,
पैसा खर्च करण्यासाठी, बाजार सुखांचा शोधतो आहे...

आपला,
(काव्यवेअर इंजिनिअर) सौरभ

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates