"पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत; तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका... हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत... (किंवा आले तरी ते तुम्हाला अनुभवता आले नाहीत...)"
समुद्रकिनारी भटकत असताना अचानक एखद्या शिंपल्यात मोती सापडावा तसेच अगदी सहजच आंतरजालावर सफर करताना काही शब्द, वाक्य, कविता, गझला, गाणी, लेख अशी सापडतात जी झटक्यात मनाची पकड घेतात आणि त्यांचा ठसा सोडून जातात. मिपावर (मिसळपाव.कॉम) हे वाक्य एका सदस्याने टाकले होते. लई भावलं आपल्याला. नक्की लेखक कोण ते माहीत नाही. (कंसातला भाग सोडून... ते वाक्य मी घुसडवलय.)
आपल्या आयुष्यात असे ओलावा देणारे असंख्य क्षण येत असतात. का कोण जाणो आपण एवढे रुक्ष असतो की ते आपल्याला टिपता येत नाहीत. एवढे कोरडे नका राहू. दुभंगाल. प्रत्येक क्षण जगा. (चांगला/वाईट कसाही असला तरी) अनुभवा. भावनेचा ओलावा असू द्या. सुखासमाधानाची हिरवळ पसरु द्या. प्रेमाचा मृद्गंध दरवळू द्या. आनंदाचे इंद्रधनुष्य उमटू द्या... :)
आपला,
(भिजलेला) सौरभ