इरसाल

29 July 2010 वेळ: Thursday, July 29, 2010
गेल्या दोन तीन दिवसांमध्ये बरेच विषय मनात घिरट्या मारून गेले. कुठल्याही विषयाचा संबंध एक-मेकांशी नसल्याने, प्रत्येक लाट एका स्वतंत्र पोस्ट मध्ये उतरवून काढीन.

मलाच नेहमी असे इरसाल लोकं का भेटतात? हा प्रश्न नेमही इतरांना पाडतो, मग मी पण विचार करायला बसलो.

पहिला जरा प्रवासात भेटणाऱ्या लोकांचे किस्से पडतो. ज्या ठिकाणी उघड उघड कानाखाली ओढता येत नाही, अशा ठिकाणी शाल जोडी मारावी!
परवाचाच किस्सा, गाडीत बसलो होतो. साधारण माझ्याच वयाचा पठ्ठ्या आला. खिडकी साठी request  करून बसला. दिसायला बिलकुल मिशी वाला मिस्टर बीन. आपल्याला काय फरक पडतो. बाहेरचं सौंदर्य नाही तर नाही, पुस्तक वाचायला काढलं. गाडी सुरु झाली. तसं शेजारच्या मिस्टर bean नी लई खट-पट्ट करून कुठून तरी earphones पैदा केले. मग फोनला त्या earphones च्या दुसऱ्या टोकाचं टोचन दिलं. मिस्टर बीन तसे जास्ती शहरी बाबू न्हवते. पण "एड्ड्या आपण फुल्टू myatro - स्याक्शुअल. (मेट्रो-सेक्शुअल)"  ; असल्या वर्गात पडत होते. थोड्यावेळाने बीन रावांचं अवडत गाणं वाजू लागलं. कारण त्यांची मान अंगात आल्यासारखी गोल गोल फिरू लागली. असेल म्हंटल head banging चा एक प्रकार. बीन रावांना रॉक गाण्यांची आवड असेल. विचार संपत नाही, तो बीन राव, " ओ रे कांची, काच कि गुडिया. होटो पे बांधी प्रेम कि पुडिया" अशी आरोळी ठोकली. च्या मारी, हे काय होतं? नंतर नंतर त्याच्या वर राग येऊ लागला. स्वतः सुरेल गाणे ऐकत बसलाय, आन आम्हाला बेसुर गाणं सहन करावं लागतंय.


सवारी गाडी मध्ये वेगळाच दुःख असतं. सवारी म्हणजे काय, तर तो चालक एक-एक करून सीट भरेल. लोकांचं म्हणणं असतं, कि लवकर गाडीत ते २०-२५ माणसं भर आन मग सुसाट गाडी सोड. पण असल्या घायीच्या तोंडी बळी जाऊ नका. एखादा तुमच्या शेजारी बसलेला, लसणाचा ठेच्चा किव्वा चण्याची उस्सळ वर ताव मारून आला असला......तर मात्र काही खरं नाही.



मागच्या वेळी प्रवासात ग्रेगरी रोबर्ट्स च शांताराम वाचायला घेतलं होतं. शेजारचे गृहस्थ साठी ओलांडलेले असावे. अधून मधून हळूच वाकून माझ्या पुस्तकातले काही वाक्यांची झलक घ्यायचे, अन मग पुन्हा खिडकी बाहेर काही तरी शोधायचे. थोड्या वेळाने मी पुस्तक मिटलं आणि डोळे मिटणार, इतक्यात शेजारच्या गृहस्थाने - " हे जे पुस्तक तुम्ही वाचताय, ते कशावर आधारित आहे?"
"अजून मी मूळ कथे पर्यंत पोहचलो नाहीये, पण मला वाटतं एका माफिया बद्दल आहे. नंतर तो ते सगळं सोडून...."

"वाह, वाह.....शेवटी एखाद्या गोष्टीतून बाहेर निघणे हीच खरी गोष्ट आहे. आजकाल मी बघतो, लोकं एकाच गोष्टीत गुंतलेले असतात. काम करणारा कामा शिवाय काही बघतच नाही, आणि ऐयाश माणूस ऐश शिवाय काही बघत नाही. माणसाने कसं आयुष्यात balanced असावं. आमचा तसा व्यापार आहे. बेकरी आणि गोळ्या ठेवतो. गोळ्यांचा आमचा कारखाना होता. तो आता भावाला देऊन टाकला. त्याने त्याचा वेगळा हिस्सा मागितला. आपण कशाला कोणाची अडवणूक करून बसा? त्याला कारखाना वेगळा करून दिला. तुमचा नाव काय म्हंटलात ?"
"व्यापाराच्या निम्मिताने खूप लोकांना भेटलो, नवीन काही बघायला मिळालं, पण माणसा जोडायची राहून गेली........... तुम्ही पुण्यात काय करता? वाह छान. तुमचा पायगुण आमच्या घराला लाभू देत एखादवेळी. मी राहायला स्वारगेट पासून १० मिनटाच्या अंतरावर आहे. घरी आपली माणसं आहेतच. तुम्हाला भेटून त्यांना पण आनंद होईल."
- जर तुम्ही अशा एखाद्या गृहस्थाच्या पानात पडलात, तर मात्र धडगत नाही. तुमचा प्रवास संपत का नाही हा राहून राहून प्रश्न पडेल.



एक पठ्ठ्या माझ्याच वयाचा भेटला. चांगला शांत बसलो होतो. सहजच विचारलं "पुण्यात शिकता का?" त्यांने आधी ओळख करून दिली. दिली ते दिली, पण मग अशी काही पिन बसली त्याला. त्याने त्याची कवितांची वही बाहेर काढली. मग फर्रर्र फर्रर्र पानं उलटून एखादी कविता काढायचा, आणि वाचायला द्यायचा. मग अचानक एखादं पान असं असायचं ज्यावर एक व्यंगचित्र, त्याखाली एक स्वाक्षरी आणि एक वाक्य. "अमुक अमुक व्यांग्चीत्राकारांना माझ्या कविता एकदा ऐकवल्या होत्या, तेव्हा त्यांनी माझं एक व्यंगचित्र काढलं. त्यांनी मला कवी म्हणायच्या ऐवजी वी.क म्हणायचं ठरवलं." "त्यानंतर आम्ही त्या श्रीरामपूरच्या कवी संमेलनात परत भेटलो. तेव्हा त्यांनी पुन्हा आठवण दिली - 'काय वी.क कविता काय म्हणते?' " कवितांबरोबर ह्या आठवणी तोंडी लावायला देत होता. मग उतरतांना माझा नंबर मागून घेतला. मला वाटलं कसला फोन करतो हा पठ्ठ्या......पण हा तर missed -call बादशाह निघाला. कधी पण साला एक missed - call मारायचा.



दर वेळी असला नग भेटला कि उगाच मीच तो सर्वाय्वर मँन आहे असा भास होऊ लागतो.

5 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    हा हा... नगाला नग भेटतातच :P पण ह्यो कवी उर्फ वी.क. तिऱ्हाईतच म्हणायचा. तसेपण कवी कविता ऐकवायला गिऱ्हाईक शोधतच असतात. तु त्याला तुझ्या दोन-चार कविता ऐकव. गपगार होईल तो.

  2. sanket Says:

    Mr. beans ची संख्या हल्ली खूप वाढत चालली आहे..आठवड्याला एक तरी भेटतोच...

  3. Aakash Says:

    आज काल अशा गीत-रसिकांना ढील देतो. उगाच त्यांना सुचवायचं "तुम्ही ते झी-मराठी च्या गाण्याच्या कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे!" मग तो समोरूनच म्हणतो "नाय नाय, तेवढा पण भारी आवाज नाही माझा." असं उत्तर आलं तर तुमचा नशीब म्हणा ह्याला आपली मर्यादा माहिती आहे म्हणून! नाही तर एखादा रफी असतो, जो पिंपरी-चिंचवड आयडॉल च्या क्वार्टर फायनल मध्ये वशिला नाही लागला म्हणून बाहेर पडलेला असतो. अशा रफी-किशोर पासून पीछा सोडवणं लई टफ!

  4. Deepti Says:

    Don't worry... असे अनेक नग मलाही प्रवासात भेटले आहेत....आणि specially "वयोवृद्ध लोक"!! तेव्हा तर SURVIVER MAN म्हणजे काय असता ते समजत!! ;)

  5. तो वही दाखवणारा "भेजा फ्राय" स्टाईल आहे एकदम ;)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates