Incomplete सायकलिंग थ्रिल

31 July 2010 वेळ: Saturday, July 31, 2010

 एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सायकल पदरी पडली. सायकल फिरवण्या बरोबरच तिला "खोलून" (सायकलवाल्यांच्या भाषेत सायकल नेहमी खोलल्या जाते!) साफ करणं पण येऊ लागलं. उन्हाळ्यात पहाटे उठून कोल्हापूरच्या आस पासचा परिसर explore करायचो. सर्किट हॉउस कडून भगव्या चौकातून खाली बावड्याचा रस्ता धरायचा, थोडं पुढे गेलं कि शेतं लागतात. आता इकडून कुठूनही उजवीकडे वळा, शेतातून रस्ता जातो तो सरळ पंचगंगेच्या तीरावर. कधी कधी पन्हाळा रस्त्यावर सोनतळीच्या परिसरात भटकायचो. पुण्यात आल्यावर मग सिंहगडला सायकलने जायचं. पुण्याच्या ट्राफिक मध्ये दुचाकीला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ सायकलला लागायचा. फक्त थोडी पळवावी लागायची. क्वचित कधीतरी सायकलने पोहचायला उशीर व्हायचा. पण कालांतराने सायकलिंग बंद पडलं. सायकलचा उपयोग मग चौकात जाऊन दूध,ब्रेड आणायला होऊ लागला.    

मागच्या एका पोस्ट " rolling back rusty pedals " मध्ये सायकलिंग सुरु केल्याचा उल्लेख केलाच होता. पण मग सराव परत बंद पडला. 

काही दिवसांपूर्वी प्रोफ. ने आमच्या सायकलिंग ट्रिपचा किस्सा ब्लॉगवर पोस्ट करण्यास फर्मावलं.

संध्याकाळी प्रोफ. चा फोन आला. "डूड,उद्या गुढी पाडव्याची सुट्टी आहे. सायकलिंग ट्रिप मारायची का?"
"कधी पण. फक्त माझ्या सायकलच तेल-पाणी करावं लागेल."
"चिंता नाही, तू ते बघून ठेव. मी संध्याकाळी रूम वर येतो."

सायकल तेल-पाणी देऊन सज्ज केली. सायकलला रिफ्लेक्टर नाही. मग ते वाटेत फिट करायचं ठरलं. प्रोफ. ने त्याच्या भावाची AXN DX २४" घेतली. मी अजून हि माझी Hercules MTB 9000 वापरतो. थोडे बहुत फेर-फार केले आहेत. आता रूट ठरवला. सिंहगड रोड > पुणे-सातारा हायवे > खेड-शिवापूर > नसरापूर फाटा > वाई फाटा > नीरा नदी वर मासे मारी आणि मग परत यायचं. 
निघायला संध्याकाळचे ८ वाजले. गुढी पाडव्याच्या आस पास थंडी कुठे असते? बऱ्यापैकी उकाडा सुरु झालेला असतो. ह्या हिशोबाने आम्ही टी-शर्ट आणि शॅार्ट चढवले होते. 
हायवेला लागलो, सुरवातीचे फ्लाय-ओवर पार करायला काही अवघड नाही गेलं.  जवळ जवळ २ महिन्यांनी सायकलिंग करत होतो. नेहमीच्या हिशोबाने आम्ही बऱ्यापैकी हळू जात होतो. बरेच दिवस काही प्रक्टिस केली नाही म्हणून मुद्दाम हळू सुरवात केली. पण पुढे जसा कात्रज तलाव जवळ येऊ लागला, चढाव हळुवार वाढत गेला. वेग पण कमी होता आणि वरून लोड वाढू लागला होता. एक - एक पेडल टाकत, अधून मधून रेंगाळत जाणाऱ्या ट्रक च्या मागची साखळी धरून कात्रज बोगदा गाठला. बोगदा संपला कि पहिला हाल्ट घ्यायचं ठरलं. सव्वा किलोमीटर पण लई जीवावर येत होते. अखेरीस ते पार केलंच. आता प्रक्टिस नसलेल्या पायांमध्ये गोळे आल्याचे चित्र मला स्पष्ट दिसत होत.
बोगदा पार करून विश्रांती घेऊन पुढे निघालो तर उतार लागले. उतार उतरल्यावर potential मुळे पुढचा चढाव निम्मा पार व्हायचा. आता खेड शिवापूर पर्यंत पोहचलो होतो आम्ही. रात्रीचे १०:०० - १०:३० वाजत असतील, हवा अचानक थंड वाटू लागली. अजून भूक लागली न्हवती. भूक लागली तेव्हा ११:३० होत होते. ढाबे बंद व्हायची वेळ झाली होती. शेवटी एका ठिकाणी घाई गडबडीत बनवलेली कोंबडी खाल्ली. जेवण झाल्यावर सायकल मारायचा कांटाळ आला होता. थोड्या वेळ निवांत बसून राहावं वाटत होतं. पण ह्या ढाबेवाल्याने  काही त्याच्या अंगणात बसू दिलं नाही. मग समोरच्या एका ढाब्यावर आम्हाला आसरा मिळाला. वेळेचं काही बंधन नसल्यामुळे आम्ही मग एक मोठी विश्रांती घेतली. आता पोट पण रिकामं करून झालं होतं. पुढे रस्ता काही कठीण न्हवता. पण थंडी मुळे आमच्या बत्त्या गुल होत्या. शेजारून एखादा ट्रक गेला कि ट्रकची उब बरी वाटायची. 

रात्रीचे ०३:०० वाजत होते. मध्ये आम्ही एका टायर वाल्याकडे आसरा घेतला. पण तिकडून निघाल्यावर प्रॉब्लेम सुरु झाले. आता हायवेवर उजेड फक्त मागून येणाऱ्या गाड्यांचा होता. एखादा पेट्रोल पंप आला तर थोडा फार तो उजेड. कधी अंधारात रस्त्याच्या खूपच कडेला यायचो, तर कधी रस्त्याच्या मधून जात असल्याचे समजायचे. मध्ये एक-दोन वेळा माझं फ्री व्हील जॅम होऊन माझा तोल गेला.  तरी थोडं अंतर कापलं. नसरापूर फाटा मागे सोडला. आता मात्र फ्री-व्हील वारंवार जॅम होत होतं. शेवटी एक रेणुका ढाबा-कम-उपहारगृह होतं. तिकडे आम्ही फ्री-व्हील तपासायला थांबलो. तिथल्या उजेडात फ्री-व्हीलचा हाल तपासला, बदली करण्या पलीकडे काही गत्यंतर दिसलं नाही.

आता सकाळ होईपर्यंत तिकडेच थांबावं लागणार होतं. थंडी बोचकारत होती. आजू-बाजूला लाकडं मिळतात का शोध घेतला. पण पोकळ बांबू व्यतिरिक्त काहीच नाही मिळालं. बाजूला ओली झुडपं होती, पण एक धड सर्पणाचा तुकडा निशिबात न्हवता. आता थोडं उबदार वाटू लागलं. बाहेर मांडलेल्या खुर्च्यांचा आधार घेऊन पाय पसरवून डुलकी घेतली. थोडं उजाडल्यावर परत जाण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला, हात दाखवून लिफ्ट मागणं सुरु केलं. एका वाळूच्या ट्रक मध्ये, मागे सायकल चढवल्या आणि आम्ही ट्रक च्या cockpit मध्ये बसलो. दीड-दोन तासात आम्ही सिंहगड रोडच्या उड्डाणपुलाच्या खाली बसून चहाचे घोट घश्या खाली सोडत होतो. तिकडून सायकल प्रोफ. च्या घरी सोडली. रूम वर आलो. देह पलंगावर झोकून दिला. हात पाय दुखायला लागले होते. आयुष्याचा येशू झाला होता. दुपारी खानावळीत काय मिळेल माहित न्हवता. गुढी पाडव्याची फीस्ट होती. दबाके गुलाबजाम हाणले! 

संध्याकाळी प्रोफ. चहा साठी भेटला, एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आला होता. थंडी मुळे इतकी फाटली, कि आमची फाटून दरवाजा होण्या ऐवजी आमची फाटून कमान झाली होती. नसरापूर फाट्या जवळून जातांना आमच्या कमांनी धड-धाकट आहेत हा निरोप आम्ही एक-मेकांना झारूर कळवतो!    

6 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    हाहाहा... ह्यो किस्सा सांगितलेलास तु. पण आत्ता वाचून जास्त मजा आली. :D

  2. sahi vatal ...

    prof mhanaje professor ? maja aahe bua ... aamacha prof ek tar pay nenaar nahitar car ne :)

    chaan lihitos ... keep it up

  3. Aakash Says:

    धन्यवाद विजय!
    प्रोफ. म्हणजे प्रोफेसरच, पण हे आमच्या एका मित्राचं टोपण नाव आहे!
    वास्तवात तो सी.ए करतोये, आणि आकडे-मोड त्याला चांगली जमते.
    मटका सेंटर वर आकडे-मोड मध्ये जो तरबेज असतो, त्याला प्रोफेसर म्हणतात!
    तर आशी आहे आमच्या प्रोफेसर ची कहाणी!

  4. अनघा Says:

    हा तुझा सायकलवरचा प्रवास एकदम मस्तच आहे!
    मी जेंव्हा शिकले तेव्हा बाबांना फसवून गल्लीत सायकलवर फिरत असे आणि सगळी लोकं बाबांकडे तक्रार करायचे!! तुमची लेक भर रस्त्यावर सायकल चालवत असते म्हणून!!
    :)

  5. Aakash Says:

    अनघा > ब्लॉग वर स्वागत आहे :)
    तुझ्या सायकल-स्वारी मुळे तक्रार येण्याचे कारण कदाचित वेगळा असू शकतं.
    तक्रार करणार्यांना, रस्त्यांनी भीत भीत गाडी चालवायला शिकवणार कोण?
    वाह, अशी दहशत पाहिजे बुवा! :P

  6. अरेच्च्या बर्‍यापैकी थ्रिलींग झाली ना ;)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates