अतिप्रसंग

30 January 2010 वेळ: Saturday, January 30, 2010
खाडखाड... खाडखाड... खाडखाड... खाडखाड... रात्री १:३० वाजताच्या काळोखात निव्वळ लॅपटॉप स्क्रिनच्या अंधुकश्या उजेडातसुद्धा बंड्याची बोटं किबोर्डवरुन सफाईने फिरत होती. किबोर्डकडे बघायची त्याला तशी गरजच नव्हती. बंड्या, बबडी, गुंड्या, गुड्डी, पप्या, पपली सगळे आज बऱ्याच दिवसांनी एकत्र ऑनलाईन येऊन कॉन्फरन्स करुन बोलत होते. बाहेर बर्फ पडायचा थांबलेला. पण थोडा पाऊस पडून गेल्याने हवेत ओलावा आलेला आणि त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच थंडी वाटत होती. रजई घेऊन अघळपघळ अंथरुणावर पसरलेल्या बंड्याला उठून हिटर चालू करुन येणं जिवावर येत होतं. थोडं इकडे तिकडे होउन बाजुलाच बिछान्यावर पडलेलं जॅकेट चढवुन बंड्याने पुन्हा अंगाभोवती रजईचा कोष केला. आजचं जेवण नेहमीप्रमाणेच उशिरा झालेलं. सगळ्या मित्रमंडळींशी ऑनलाईन गप्पा चाल्ल्याने झोप पण येत नव्हती. कदाचित आजची रात्र नेहमीसारखिच जागुन काढायचा बंड्याचा बेत होता. कॉन्फरन्समधे गप्पांना अगदी बहर आलेला. 
खुप दिवसांनी अशी मैफिल रंगली होती आणि अचानक... बंड्याच्या पोटात एक कळ उठली. वीज जशी क्षणभर चमकुन जावी तशी ती कळ नाकपुड्या आणि भुवया आकसलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटली. पोटावर घेतलेल्या लॅपटॉपला लावलेल्या हेडफोनचा ऑडिओजॅक रुतल्याने दुखलं असेल असा साधा विचार करुन बंड्यानं हेडफोन काढून ठेवले आणि पुन्हा चॅटींगमधे मश्गुल झाला. थोडावेळ असाच गेला. आणि बंड्याच्या पोटात अजून एक जोरदार कळ आली. मात्र ह्यावेळी आधिपेक्षा जास्त तीव्रतेने. बंड्या थोडा अस्वस्थ झाला. लॅपटॉप बाजूला ठेऊन उठुन बसला. अश्या कळा का येतायत विचार करता करता अजून एक जोरदार कळ आली. वाटलं कोणीतरी आतडं पिळतय. फुगा फुगवावा तसं कोणी पोटात ठासून हवा भरलीये आणि तट्ट भरलेलं पोट कधीही फुटेल असा भास बंड्याला झाला. दोनचार ढेकरा मारुन तो ताण कमी करण्याचा निष्फळ प्रयत्न करता करता उलट पुन्हा जी कळ आली त्याने तर बंड्या टुण्णकन उडी मारुन बेडवरच उभा राहिला. स्प्रिंगच्या त्या बेडवर तोल नं राहिल्याने धड उभं रहायलादेखिल जमत नव्हतं. एकाच जागी दाबल्या गेलेल्या त्या बेडच्या खड्ड्यात एखाद्या कृष्णविवरामधे अंतराळातले घटक आकर्षित होऊन सामावून जावेत तसे बेडवर असलेला लॅपटॉप, सेलफोन, हेडफोन, माऊस, हार्डडिस्क खेचले गेले. वायरिंच्या गुंत्यांच्या विळख्यात बंड्याचा एक पाय अडकला. पांघरुण विस्कटलं. अंगावरची चादर नीट बाजुला झाली नव्हती. त्यात नेहमीप्रमाणे बेडवरच वाळत टाकलेला टॉवेल ह्या सगळ्यांच्या सरमिसळीत सामिल झाला. बंड्याचा दुसरा पाय त्यात फसला. आणि उठता उठता केलेल्या उठाठेवीत बेडवरच उताणा झाला. पोटातला कल्लोळ वाढत चाल्लेला. बंड्या वैतागला. च्यायला, नेमक्या वेळी सगळं कसं काय अधेमधे तडमडतं माहित नाही, चिडचिड करत बंड्या पुटपुटला. तसाच हात लांब करुन बाजुच्या टेबलवरचा टचलॅम्प लावायचा प्रयत्न केला. पण तोदेखिल त्याच्या कक्षेत नव्हता. नेमका तो सोडुन टेबलावर असलेल्या बाकीच्या वस्तु पेला, पुस्तकं, कॉफीचा कप, सीडीज, चाव्या, वॉलेट हाताशी लागल्या आणि त्याच्या चाचपडण्याने इकडे तिकडे पडल्या. बंड्या धुसफुसला. बेडवरच्या पसाऱ्याशी चाल्लेल्या झटापटीत अंग तापलं. चेहरा घामेटला. सगळ्या गोष्टी तश्याच उडवून लावत कसाबसा उभा राहिला आणि बेडवरुन सरळ उडीच मारली. अंधारात मारलेली उडी डायरेक्ट समोरच्या भिंतीवर पडली. भिंतीने बंड्याच्या थोबाडाचा चांगलाच मुका घेतला. त्यात पायाखाली स्पाईक गार्ड, स्पिकर, बॅग आल्याने बंडुरंग पुनःश्च कोलमडले. त्यात पुन्हा चपला शोधायची गडबड. मिळाल्या तर त्या उलट्या चढवल्या. बंड्याची तगमग वाढत चाल्लेली. कश्याबश्या चपला चढवून बाथरुमकडे धूम ठोकली. 
धापा टाकत बंड्यानं बाथरूमच्या नॉबला हात टाकला. पण दरवाजा उघडेना. कोणीतरी आधीच तिकडे मुक्काम लावलेला. पायाखालची जमिन सरकत चाल्ल्याचे भास बंड्याला होऊ लागले. आपले अवयव शिथिल पडतायत, त्यांचं नियंत्रण सुटतय असं वाटायला लागलं. शरीर आकसलं गेलं. एक पाय आपोआप दुमडला गेला. एखाद्या बगळ्यासारखा बंड्या एका पायावर बाथरुमच्या बाहेर उभा होता. एका हाताने पोट गच्चं आवळत दुसऱ्या हाताने दरवाजा बदडला. कोणी नरडं दाबाव तसं झालेलं. बंड्यचा आवाज फुटेना. "आब्बे... कौन गया है??? कितना टाईम लगेगा???" ओरडण्याचा जोर नको तिकडून निघायचा म्हणून सावकाशीनं विचारणा केली. खोल कुठुन तरी आवाज आला "हा, एक मिनिट,  आया रुक..." एक मिनिट म्हटल्याने बंड्याच्या जिवात जीव आला. पण तो एक मिनिटसुद्धा बंड्यासाठी मोठा काळ होता. प्रत्येक सेकंद येवढा मोठा असतो की आपण त्यात एक अख्खं आयुष्य जगु शकतो असले भलतेसलते विचार डोक्यात थैमान घालू लागले. "जल्दी आ..." बंड्याची विनवणी कम आज्ञा होती. मिनिटाभरात दरवाजा उघडला गेला आणि चिंटू महोदय बाहेर आले. "हम्म्म... जा... क्या..." चिंट्याचं बोलून होत नाही तोवत त्याला धक्का देऊन बाजूला करुन बंड्या बाथरूममधे घुसला. दरवाजा धाडकन चिंट्याच्या तोंडावर मारुन आत बैठक घेतली. बंड्याचा जीव बराच गडगडाट करत भांड्यात पडला. चिंट्या काय ते समजला आणि निमुटपणे त्याच्या खोलीकडे रवाना झाला. एक दिर्घ निश्वास सोडत बंड्याने कधीपासून अडकलेला श्वास मोकळा केला. (चिंट्या अजून काही वेळ तिकडे असता तर घुसमटून तडफडत मेला असता.) बंड्या निवांत झालेला. आणि अजुन एका विचाराने त्याच्या काळजात धडकी भरली. टॉयलेट पेपर...???!!! मागच्या टायमाला तर रोल संपलेला... बंड्याची मुंडी गर्रकन मागे वळाली. मागे ठेवलेले कापसाच्या बोंड्यासारखे दिसणारे पुर्ण रोल पाहून बंड्याला भरुन आलं. उगीचच डोळे भरुन आल्यासारखे वाटले. 
तब्बल १५-२० मिनिटं चाल्लेला हा कार्यक्रम संपवून, तजेलदार होऊन बंड्या बाहेर आला. त्याच्यावर गुदरलेला अतिप्रसंग आता टळला होता. त्यातुन निभावून गेल्याचं प्रचंड समाधान बंड्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होतं. पिसासारखं हलकं झालेल्या शरीराने हलत-डुलत तरंगत बंड्या किचनमधे आला. आणि रिकामं झालेलं पोट भरण्यासाठी पुन्हा कपाटं धुंडाळू लागला.

(कृपया नोंद घ्यावी: हा लेख वाचल्यानंतर, वरील (अति)प्रसंग हा लेखकावर गुदरला असेल आणि तो बंड्याच्या नावावर बिल फाडून खपवला गेला आहे असा वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तर तसे काही नाहीये. शिवाय वरील प्रसंगाशी साधर्म्य असलेले अनेक प्रसंग आपल्या ऐकिवात/अनुभवात आले असतिल. त्यामुळे ते काल्पनिक असे नाहीत. कल्पनाशक्ती आणि अतिशयोक्ती ह्यांची सरमिसळ आणि लेखकाकडे मुबलक प्रमाणात असलेला मोकळा वेळ ह्यांतुन वरील प्रसंगनिर्मिती केली गेली आहे. तसंपण लेखकाला सत्य घटना नको तितक्या रंगवून, अधिक नाट्यमय, रोमांचक, थरारक पद्धतिने मांडायची खोड आहे. असो... तुम्ही असे पिवळे पडल्यासारखे का दिसताय???)

आपला,
(निभावलेला) सौरभ

5 प्रतिक्रिया

  1. भारीच वर्णन आहे, इतकं हुबेहुब की अनुभवातुन गेले असणार याची खात्री पटते ;-)

    रूम, बेड आणि वायरिंच्या गुंता मात्र माझ्या रुम प्रमाणेच आहे :)

  2. सौरभ Says:

    हा हा हा... आनंद... मला वाटलंच, म्हणून शेवटी एक विषेश सुचना आधीच चिकटवली आहे. :P

  3. Deepti Says:

    hehe saurabh ek no re.....mastch lihilay....
    ani vatavaran nirmiti tar sahich....ekdum dolya samor chitrach ubha rahila

  4. कल्पनाशक्ती आणि अतिशयोक्ती ह्यांची सरमिसळ आणि लेखकाकडे मुबलक प्रमाणात असलेला मोकळा वेळ ह्यांतुन वरील प्रसंगनिर्मिती केली गेली आहे...

    >>> वा सौरभ राव.. वातावरण निर्मिती खरच उत्तम.. आधी काहीवेळ नक्की कुठला प्रसंग गुदरतोय बंड्यावर असा प्रश्नच पडला होता. पण मग..... हे हे.. हा तर खर्च महाअतिप्रसंग होता... नेमके काय खाल्ले होते हो त्याने??? :D

  5. सौरभ Says:

    ह्यॅह्यॅ, अरे ह्या बंड्याच पोट म्हणजे बिघडलेला कारखाना आहे. कधी जोरदार चालू असतो तर कधी ठप्प पडून असतो.

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates