डोक्यावर उन तापत असतांना, एखादा म्युझियम बघत वेळ कसा जातो कळत नाही.
वाराणसीमध्ये संध्याकाळी गंगा आरती बघण्यासारखी असते. तो पर्यंत, गल्ल्या-बोळ फिरत-बघत एक चक्कर मारून झाली. परत येऊन पाहतो, तर घाट अगदी स्वच्छ होते. क्लोरीन टाकून सफाई झाली होती. जशी आरती सुरु झाली, घाटावर धूप आणि अगरबत्तीचा सुवास पसरला! अचानक माहोल तयार झाला. खूप गर्दी जमली होती. फ्लोरिडाच्या इथन आणि मी, आम्हाला नीट फोटो मिळतील अशी जागा पकडून ठेवली. थोडं टीमवर्क करून आम्ही आमच्या पुरता प्रकाशचित्र घेत होतो. मग खाली बसलेल्या बाबूला राग आला, त्याने आमच्या टीमवर्कला foul घोषीत केलं. मला तर त्याचं म्हणणं कळलंच नाही, पण आता इकडे हुज्जत कोण घालणार? पण त्याच्या कॅमेऱ्याला जोडलेलं ४००mm बघून माझी थोडी जळाली.
आरती संपली, आणि इथन आणि त्याची मैत्रीण परत भेटले. आता, त्यांना परत हॉटेल पर्यंत जाण्यासाठी रिक्षा हवी होती. गोरा बघून तर रिक्षावाल्यांना ताव येतो, ४० रुपयेचे २०० मागतात. माझ्यासाठी पण असे वरचढ भाव कुठे तरी असतील, ह्याचा अनुभव लवकरच आला. अतिथि देवो भवच्या जाहिरातीत अमीर खान तेवढा हिरो वाटतो, इकडे दोन पोरं जाता जाता मला, "looking gorgeous" म्हणून टोमणा मारून गेले. मी पण उत्तर म्हणून २-४ भ-कार हासडले, मग मात्र "sorry" ची पांढरी फीत झळकली.
तुम्हाला घाटावर साधू खूप दिसतील, सगळे ढोंगी वाटले मला. एका साधूचा फोटो काढायला थांबलो, तर आधी त्याने पैसे मागितले. पैसे देत नाही तो पर्यंत आपलं रुपडं लपवून ठेवलं. मी पण टांग दिली. हा तर मला पण एक कल्चरल शॉक होता. बाहेर देशचे हे बघून तर हादरून जात असतील. गाईला देव मानणारे, रस्त्यात बसलेल्या गाईच्या पाठीत काठी हाणून उठवून लावतांना बघितलं की काय होईल. सर्व माया मागे सोडलेले साधू, पैसे घेऊन करत काय असतील?
असो, अश्या गोष्टी खटकत राहतीलच. काळजीपूर्वक ह्यांना आपल्या पासून लांब ठेवणं आपलीच जबाबदारी.
वाराणसी मध्ये खाण्यासाठी अनेक उपहारगृहांचे पर्याय तुमच्यासाठी मोकळे असतील, तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठे आस्वाद घ्यायचा ते ठरवा. केशर, मधली स्पेशल थाळी वर ढेकर देत मधुर जलपान मध्ये तोंड गोड केल्याशिवाय आत्मा थंड होत नाही. आमची खळगी भरली, की मग डोक्याला चावी बसते.
बऱ्याचदा शब्दांचे मनोरे न बांधता, कुठे मनातल्या मनात एखादा विचार गिरवत बसण्यात जी मजा आहे, ती कश्यात नाही. मग गिरवता गिरवता कधी track बदलतो, कळत पण नाही. वेग कधी वाढतो, कळत पण नाही. आजवर कधी पोटभर तंद्री लावलीच न्हवती. नेमका फोन वाजायचा, तर कधी गजर. मी अश्या जागेच्या शोधात होतो, जिकडे वाक्य-शब्द-अक्षर पोहचत नाही. आपण आपल्यापुरता कधी शब्दांना अर्थ देतो, आणि कधी त्यांचा अर्थ काढून घेतो, कधी-कधी तर दोन अर्थ देतो. आता तुम्हीच सांगा, अश्या मेह्फिलीत बसून पोकळ मनोरे उभारणार? उदाहरण: निसर्गाने आपल्याला सगळं दिलं. चांगलं आणि वाईटच्या व्याख्या आपणच आखल्या आहेत. आजू बाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमुळे आपण एका programed मशीन बनून bias तयार करतो. आपल्याकरता तुकतुकीत नाक आणि गोरं असणं हे सौंदर्य, मग आफ्रिकेत मोठे ओठ आणि पसरट नाक सौंदर्य मानल्या जातं. एक वेळ आपण माणसांनी बनवलेल्या गोष्टींमध्ये चांगलं आणि वाईट ओळखणं सोपं आहे, पण निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टींची पारख करण्यायोग्य आपण आहोत का?
तेवढ्यासाठी आता दीड हजार किलोमीटर लांब आलो आहे, म्हणालात तरी चालेल. कधीतरी एकट्याने असा प्रवास करण्यात वेगळाच अनुभव मिळतो. आपल्याच तांड्यात वावरल्याने सतत आपल्या ओळखीच्या, पटणाऱ्या, आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर राहतो. आपल्याच भवताली सगळं बना-बनाया माहोल घेऊन फिरलो, तर तिथे अस्तित्वात असलेला माहोल कसा अनुभवता येईल? एका बंद खोलीत डांबून ठेवल्यासारखं होतं मग. उन्हाळ्यात गच्चीत झोपण्याची मजा आठवून तर बघा, आहे का त्याला किंग बेडची सर?
भारत रेल्वेशी romance करत प्रवासात, कधी एकसारखा अनुभव येणार नाही. काही खास संभाषणं पण होत नाहीत, पण एक निश्चित की आजू-बाजूच्या लोकांचं निरीक्षण करण्यात आणि कंटाळ आला की चिंतन-मनन करत कापलेले ३६-४८ तास पण कमी वाटतात. तो एक विशिष्ठ रेल्वे गाडी मधला वास, नकळत आवडायला लागेल. सकाळी नाश्त्यात मिळणारे cutlets चा एक विशेष nostalgia आहेच, सोबतीला कचोरी,सामोसे येत असले तर काय सांगावं. सकाळी पाच वाजता "गरम चाई" चा गजर असतांना, तुमची आणखीन १० मिनिट झोपायची इच्छा पण उडवून लावेल. स्टीलच्या भांड्याला तोटी बसवलेली, अन् खाली वाडग्यात फुलवलेले कोळसे. कडाक्याच्या थंडीमध्ये गरम चहा देता यावा म्हणून ही सिस्टम अन्य कुठे दिसणार नाही. पहाटे चहाचा कप घेऊन गाडीच्या दारात उभं राहून, धुक्याच्या दुलईत लपलेले शेत झप-झप मागे जात असतांना तो pantry मधला फिक्का चहा पण चांगला लागतो. अशी ही जादू आहे रेल्वेची.
फोटो बाप आहेत
खूप आवडलं...
लेखातील विचार खूप आवडले...पटले...
फोटोंनी त्या विचारांना दिलेली जोड एकदम भारी !
सुंदर फोटो !
:)
@श्रीराज: *blink* धन्स!!
@अनघा ताई: :) धन्यवाद! कदाचीत काही वर्षांनी पुन्हा हा पोस्ट वाचतांना माझा मलाच वेडसर वाटीन!