शलौम शाब - ५

16 December 2011 वेळ: Friday, December 16, 2011
अन्नपूर्णा बेस कॅम्प, आखून दिलेल्या दिवसांपेक्षा कमी दिवसात संपवला. नाहीतर, माझा खिसा संपला असता. जसं उंचावर जाऊ, तसं राहण्याचा खर्च आणि खाण्याचा खरचं वेगाने वाढू लागले. पार्ले-जी आणि सूप पावडर मुळे, बराच खरचं वाचला. ट्रेकसाठी अनेक पर्यटकांची गर्दी. त्यामुळे लॉज वर हमखास जागा मिळेल की नाही हे कधीच ठाऊक नसायचं. अश्यावेळी sleeping bag ने साथ द्यावी. हिमालय बघायला माझ्यासारखे पर्यटक येतात. पण इथल्या लोकांना हिमालय काय नवीन नाही. पैसा बनवणं जास्ती महत्वाचं. साधारण ह्या प्रकारचे अनुभव टाळण्यासाठी जास्तीत जास्त अंतर एका दिवसात कापायचं, आणि रात्री एखाद्या कुंपणात पडी टाकायची. बऱ्याचदा माझ्यासारख्या एखाद दुसऱ्या पर्याताकाशी भेट व्हायची. मग सूप पावडरची देवाण घेवाण करत फोटोज बघत गप्पा व्हायच्या. पहाटे जितक्या लवकर निघाल, तितकी कमी गर्दी रूट वर लागेल.

लांद्रूक मध्ये मात्र अगदी वेगळा अनुभव आला. अत्यंत प्रेमळ लोक, जीव लावणारे. ज्या माणसाच्या (कालो) घरात राहत होतो, त्याने अगदी सकाळचं जेवण खिलवून मगच सोडलं. अतिशय प्रेमळ जोडी होती ती. इतके दिवस नेपाळ मध्ये झालेत, इथल्या काही पद्धती फार आवडल्या. पैसे देतांना/घेतांना नेहमी दोन्ही हाताने घेतल्या/दिल्या जातात. वाटण्याची वृत्ती सर्वांमध्ये आहे कुटून भरलेली आहे. कालो आणि त्याचे कुटुंबीय मला वर्षानुवर्ष ओळखत असल्यासारखे गप्पा मारतांना बघून मजा वाटली. ह्यांना आपल्या देशात बोलवावं आणि मग प्लास्टिकचा आनंद व्यक्त करावा? निम्म्याहून जास्त सगळं अनुकरण, चांगलं असण्याचं.

आपण तर नेहमी एका बाजूने विचार करणारे बनलोय. आज मी ठरवलंय विज्ञानच्या विरुद्ध विचार करायचा. विज्ञानाचा उदो उदो करत असतांना आपण आपल्याच पायावर उद्योगीकरण नावाचा धोंडा नाही का मारून घेतला? कधी कधी आपण गरज आणि personal privileges मध्ये  इतका घोळ घालून का बसतो, की त्या मुळे आपण कशाला प्राधान्यता देतोये हे विसरून बसतो. सगळा गुंता ह्यात वाढत जातो. चला एक उदाहरण देतो - फेसबूक. आम्हीह्या सगळ्या सोई आल्यामुळे आता वेग वेगळ्या ठिकाणी बसलेल्या मित्रांशी गप्पा तर मारू शकतो. अर्थात चांगलं आहे हे आणि म्हणून आम्ही घरातल्या एकाच कोपऱ्यातून दुनिया बघतो. लक्षात ठेवणं - हा एक माणसाचा नष्ट होणारा गुण धर्म आहे. दर ३ महिन्यांनी मी फेसबूकवर माझा वाढदिवस साजरा केला, अन् ह्या वर्षी मला २८ लोकांनी ३ वेळा 'विष' केलं. कमाल असते की नाही.

आमच्यात एक जिद्द खूप दांडगी आहे. समोर येईल त्या वस्तूला काबूत आणायचं. पक्ष्यांपेक्षा वेगाने उडायचे आहे, चीत्त्यापेक्षा वेगाने अंतर कापायचं आहे, अन् थकवा पण नको. जंगलच्या जंगल सपाट केली. कारखाने उभे केले. खोऱ्याने पैसा ओढला, चैनीत जगले आणि एक दिवस जंगलात फिरायला गेले तर त्यांना हरीण, हत्ती, गेंडा, वाघ, बिबट्याच्या मागे एक छोट्या नळीतून धूर निघतांना दिसला तर? सगळे वन्य प्राणी आता लवकरच संपुष्टात येतील. मग आपण डिझलवर चालणारे प्राणी बनवू. नुसत्या माणसांनी भरलेल्या मातीच्या गोळ्यावर काय रहायचं? मग आजूबाजूला बघण्यासारख्या काही प्राणी नको का?

माझं म्हणणं आहे एखादी अशी शाळा असली पाहिजे, जिथे सगळे यंत्र मानव जातील. तरी तिथल्या मास्तरीण बाई त्यांच्यात पण खोट काढतील. सगळं काही perfect करायच्या नादात जो काय राडा केला आहे, तो कसा साफ करणार? सगळं काही जर एका इक्वेशन मध्ये मांडून मोकळे झालो तर काय होईल? पुन्हा एक अचाट तंद्री लागली होती. विज्ञान विरोधी विचार करता करता बराच वेळ निघून गेला होता. सूर्य मागे डोंगराआड झाला होता. आजकाल मी फोटो काढण्यापेक्षा त्या ठिकाणी बसून तिथल्या वातावरणाचा आस्वाद घेत बसतो आहे.

संध्याकाळ पासून हवा काही ठीक न्हवती. ढग दाटून आले होते. Juan - Denmark मध्ये हवामान खात्यात काम करण्याच्या अनुभवावरून सांगितलं, पुढचे ५-७ दिवस ढगाळ वातावरण असेल. पावसाची पण शक्यता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य दर्शन झालंच नाही. अधून मधून पाऊस ही होताच. इथे इंटरनेट सारख्या सोई प्रचंड महाग होत्या. काही ठिकाणी २०० रु. तीस मिनिटं ब्राउज करायचे होते. एक लिटर पाण्याची बाटली ४०० पर्यंत जाते. पण इथे हिमालयातून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी असतांना पाण्याची बाटली विकत घेऊन पिण्याला वर चित्रगुप्ताने पण माफ केलं नसतं. आता ह्या खराब हवामानात उगाच रिस्क नको म्हणून मग अन्नपूर्णा ट्रेल संपवलं पाहिजे.

अन्नपूर्णा बेस कॅम्पचा संपूर्ण ट्रेक एक अप्रतीम अनुभव होता. मला तर अन्नपूर्णापेक्षा माछापुच्रे जास्ती आवडला. माछापुच्रेच्या निमुळत्या शीलाकडे बघत लगेच तंद्री लागायची! काही हाडाचे भटके ही भेटले. गरम पाण्याचं एक कुंड ही लागलं. त्यात शिजवलेला भात एका साधूने मला खायला दिला. त्याला नर्मदा नदी बघायची खूप इच्छा होती. एका साधुशी गप्पा मारायचा एक वेगळाच अनुभव असतो. त्याच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतात, आणि समोरच्याकडे ऐकायला वेळ पाहिजे बस!

हा ट्रेक संपवून पुढे काही दिवस मंसिग गुरुंगच्या गावी जाईन म्हणतो.






 

2 प्रतिक्रिया

  1. Shriraj Says:

    "लक्षात ठेवणं - हा एक माणसाचा नष्ट होणारा गुण धर्म आहे"...
    ... पटलं मित्रा :(

  2. Shriraj Says:

    फोटो नेहमीसारखे अप्रतिम !!!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates