शलौम शाब - ४

06 December 2011 वेळ: Tuesday, December 06, 2011
थे बसचे हॉर्न इतके कर्कश का आहेत? पार झोपेचं खोबरं केलं साल्यांनी. एक बढिया बंपर रोली तयार केला. शांत वाटू लागलं.
सामान पाठीवर टाकल अन् पुन्हा एकदा पृथ्वी चौकात आलो. कालच्या काळोखात ह्या जागेला उगाच नावं ठेवली होती. कालच्या त्या दोन पोरांच्या लोचटपणावरून सगळं Judge केल्यामुळे मी प्रचंड कडवाहट बाळगून बाहेर पडलो खरा, पण चौकात येऊन नजारा बघून मनातली कडवाहट एकदम साफ झाली. कुठल्या दिशेने जायचं आहे माहिती नसून, मी चालू लागलो - हिमालय जो दिसला होता. आता पोखरा लेक पाशी जायचं होतं. चौकशी करून मायक्रो पकडली. लेक कडे जाता-जाता काही नियम आखायला घेतले.

१) Taxiवाल्या समोर कुठलाच पत्ता विचारू नये, आणि त्यांना भाव ही देऊ नये.
२) पटकन कुठलीही गोष्ट judge करायची नाही.

वाटेत मोकळ्या मैदानात चार उंच बांबू उभे करून, त्यावर एक पाळणा बांधलेला दिसला. शेजारच्या म्हातारीला विचारलं तर समजलं, की नवरात्रीत लहान मुलांसाठी असे पाळणे उभे केले जातात.

इतक्यात पोखरा लेक आला पण! एक नकाशा घेणं जरुरी होतं. इकडे रस्त्याच्या कडेला Souviner विकायला ठेवले होते. दुकानाच्या बाहेर बसलेल्या कोणाशीही नजर मिळवली ना मिळवली की समोरची व्यक्ती आपल्या प्लास्टिकच्या चेहऱ्यावर खोटं स्मित आणून "नमस्ते" करते. "Buy something?" मग आपण पण खोटं-खोटं हसून त्याला नाही म्हणायचं आणि पुढे जायचं. शेवटी ही सगळी पापी पेटसाठी चाललेली उठाठेव. एक गॉगल पाहिजे. Eye contact करायचाचं नाही.

चालत-भरकटत एका पुस्तकाच्या दुकानासमोर आलो. त्याच्याच दारात bag ठेवली. एक नकाशा निवडला. काही वापरलेले जुने पुस्तकं स्वस्तात विकायला होती. घ्यायची इच्छा फार होती. २ पोस्टकार्ड घेतले आमच्या गोडू-बाबासाठी. एकावर पत्ता, आणि निरोप टाकून तिथल्याच पत्र पेटीत टाकले. दुकानदार हसमुख होता. त्याने पोस्टकार्ड बघितलं, "बस इतना ही लिखा?" "भांजी सिर्फ ४ महिने की हैं|" तो पण हसला. लगे हात मी त्याला तिकडे राहण्यासाठी स्वस्त जागा कुठे मिळेल विचारून घेतलं. त्याने लगेच एक फोन लावला. म्हणे त्याचा एक मित्र आहे, ज्याचं घर तिथून १७ किलोमीटर वर आहे, त्याच्याशी माझी भेट घालून दिली. ह्या मित्राचं नाव मानसिंग गुरुंग. नेमकं मानसिंगचं घर आणि मला पुढे जायचं ठिकाण विरुद्ध दिशेला होते. मानसिंग स्वतःहोऊन मला dam side घेऊन गेला. तिकडे फर्स्ट क्लास राहायची सोय करून दिली. खास म्हणजे माझ्या बजेट मध्ये ही रूम बसत होती! रूम मधून अन्नपूर्णाचा नजरा, समोर गच्चीत टेबल खुर्च्या लावल्या होत्या. वाह! बहोत खूब!

मानसिंग व्यवसायाने शेतकरी आहे. Tourist येतात तेंव्हा, तो त्यांना पोखराच्या आजू-बाजूचा परिसर फिरवून आणतो. गप्पा मरता मरता त्याला पण एक रोली ऑफर केला. तो असाच इकडून तिकडून इंग्रजी बोलायला शिकला होता. मग सहज खडा टाकून बघितला, "जर मी तुझ्या गावात येऊन मुलांना इंग्रजी शिकवलं तर चालेल का?" तर तो खुष होऊन, "हो" म्हणाला. मग तर मला शेती करायची पण हौस आली. चलो, आज नसीब अजमा के देखते! (मला तरी कुठे माहित होतं, आज नशिबात काय काय वाढून ठेवलं असेल) मी ऑफर दिली की त्याच्या शेतावर येऊन काम करून, मुलांना इंग्रजी शिकवीन आणि मोबदल्यात तू मला तुझ्या घरी राहू दे. मानसिंगला मान्य होतं. मग हळूच म्हणाला, "मी पण गरीब माणूस आहे, थोडे पैसे तर मिळालेच पाहिजे नं?" ही आमची डील जमली. अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक आटोपून मग मी त्याच्या गावी येईन म्हणून सांगितलं. जाता-जाता मानसिंगने मला ACAP च्या ऑफिस समोर सोडलं. इथून जवळपासच्या ट्रेकचे परमीट मिळतात.

अन्नपूर्णा बेस कॅम्प साठी परमीट मिळवून सारंगकोटचा बेत आखला. मायक्रो पकडून, सारंगकोटच्या पायथ्याशी आलो. २ टेकड्या पार करून जायचं होतं. ४५ मिनिटांचा ट्रेल असावा. अंधार पडायच्या आत वर पोहचलं पाहिजे. वर जातांनाच ही फेरी वसूल झाली. वर पोहचलो, अन् तंद्री लावायला काही वेळ नाही लागला. अचाट हिमालय आणि त्याची ती तांबूस कॉलर. उगवणारा चंद्र. दुसरीकडे पाहतांना एका मागे एक डोंगर फिक्के पडत चालले होते. जणू Plan of action असल्या सारखे ते डोंगर रचले होते. जवळचे टार्गेट अगदी नीट दिसत होते. लांबचे टार्गेट दिसत होते, पण पुसटशे. (नंतर एकदा ऑनलाईन आल्यावर पंकज झरेकरचं > हरवले हे रान धुक्यात < बघून पुन्हा हाच विचार आला.)
वरती एका बाकड्यावर खूप जास्ती वेळ बसून राहिल्यामुळे, खाली येतांना अंधार पडला होता. पुन्हा एकदा pack up झालेला बस पार्क. Dam Side कडे जाण्यासाठी आता एक तर taxi करा, किंवा लिफ्ट मागा. एकाने मला लिफ्ट दिली. मी मुंबईचा असल्याचे कळतच तो आणखीन खुष झाला. मी महाराष्ट्रीय असल्याचा प्रश्न त्याने केला. ही पुन्हा होकार दिला. ह्या पुढे झालं, त्यामुळे मी चालत्या गाडीवरून पडायचा बाकी होतो. तो माणूस चक्क मराठीत बोलू लागला! दुर्गा गेली १० वर्ष मुंबईत काम करत होता. त्याचं मूळ गाव पोखरा असून, त्याला आता सिंगापूरला नौकरी मिळाली होती. दहा वर्षांपासून तो खार मध्ये राहत होता. अशी ओळख निघाल्यावर तर त्याने सरळ मला घरी जेवायचं आमंत्रण दिलं. Dam Side पासून घर जवळच होतं. आधी त्याच्या घरी गेलो. (घरच्यांना आमची मैत्री जुनी वाटावी म्हणून मराठीत गप्पा मारत होतो.) प्रशस्त बंगला होता. जेवण गरम करून होई पर्यंत मला त्याचा laptop दिला, वाय-फाय चालू करून दिलं, काढलेल्या फोटोजचा back-up घेतला. त्याच्या परिवारच्या सगळ्या सदस्यांशी मग गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता दुर्गाचं माझ्या Cafe Leopold लिहलेल्या टी-शर्ट कडे लक्ष गेलं. मग तर आणखीन जिगरी वाढली! दुर्गाचं career इथून चालू झालं होतं. तितक्यात जेवण समोर आलं. इथे जास्ती मसाले नाही वापरत, पण ज्या दोन मासाल्यांवर भाजी / डाळ बनवतात त्याची चव भारी असते. इथे भात खाल्ल्या जातो. पोट भर जेवल्यावर आता सगळ्यांचा निरोप घेतला. दुर्गाचं म्हणणं होतं, आता पोखराची night life बघू.

शून्य planning आणि एकटे फिरण्याचा हा फायदा. मनात येईल ते करता येतं. आधी पोखरा तलावाच्या भोवतालच्या एका शांत ठिकाणी बसलो. इथून पोखराची रात्रीची रोषणाई दिसत होती. गप्पांच्या ओघात सिरीयस टोनवर कधी आलो ते कळालच नाही. मग तिथून निघालो, एका घरगुती बार मध्ये गेलो. इथे २ टेबल होते. ओटा - वजा counter होतं. एक मुलगी सगळं सांभाळत होती. आम्ही बीयर मागवली. बाजूला बसलेला शेरपा पण आमच्या गप्पांमध्ये शामिल झाला. आता हलकी तार बसली असतांना दुर्गाने मला रात्रीच्या वेळी हिमालय बघण्यासाठी विशेष स्पॉट दाखवला. उंडारून यायला बराच उशीर झाला होता. जर्मन बेकरीच्या समोरच्या गल्लीत लुम्बिनी resort लगेच गावलं. दुसऱ्या दिवशी पोखरा पासून २६ किलोमीटर वर असलेल्या दुर्गाच्या गावी फिरवून आणायचा बेत आखला. उद्या दुपारी नया पूलला जाऊन अन्नपूर्णा बेस कॅम्प चा ट्रेक सुरु करायचा बेत मी फायनल केला.

आजचा दिवस कुठे उडाला समजलं पण नाही. तुम्हाला कदाचीत वाटत असेल, असं कोणी अनोळखी माणसाबरोबर जातं का? मला लुटला असता तर? माझ्या मनात पण एक वेळ हा विचार आला होता. पण मला लिफ्ट देतांना दुर्गाने पण माझ्यावर विश्वास टाकला होताच की. अन् आता तर माझ्याकडे गमावण्यासारख काहीच न्हवते. आपोआप सगळे मनातले अडथळे गळून पडले.









3 प्रतिक्रिया

  1. Shriraj Says:

    गमावण्यासारखे काहीच नसणे ही किती जमेची बाजू असते ना, Machafuko!!!

    आकाश, केतकी आणि सौरभ, मल एक प्रश्न नेहमी पडतो.. तुमच्या ब्लॉगचे नाव "MAKS-The4dimensions" का नाही?

  2. Aakash Says:

    त्याची गंमत अशी आहे की ब्लॉग नोंदवला तेंव्हा माचाफुकोचा जन्म झालाच न्हवता. मग द्राविडी प्राणायाम केल्यानंतर माचाफुकोला AKS वर आमच्या पण वतीने लिहायला ठेवलं आहे! ;)

  3. rajiv Says:

    नारदालाही हेवा वाटायला लागणारा `माचाफुकोचा हा आसेतु हिमाचल' संचार आणि त्यात आढळलेली नानाविध कंगोरे असलेली असंख्य व्यक्ती चित्रे व प्रकाशचित्रे ... माचाफुको तुसी ग्रेट हो !!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates