आता हि परवाचीच गोष्ट. महालक्ष्मी, भुलाभाई देसाई रस्त्यावर VFS च्या कार्यालयासमोर एक चाळीशीतली व्यक्ती आपल्या चकाकत्या गाडीतून उतरली. त्या वेळी सगळ्या घटनेची नोंद रस्त्यावरच्या गर्दीच्या वतीने मी घेत होतो. साहेबांच्या वाहनचालकाला गाडी कडेला न घेता, रस्त्यावर अडथळा निर्माण करणे मान्य असावं. मुंबईत दिवसाच्या वेळी अशी रस्त्यात मधेच थांबलेली गाडी taxi वाल्यांना डोळ्यात भरली, त्यांनी आपल्या पद्धतीत horn ची वाजंत्री वाजवली. मात्र हे आता साहेबांना खटकलं. त्यांनी एक क्षण अगदी शत्रुघ्न सिन्हा सारखी जळजळीत नजर त्या सर्व आम taxi वाल्यांवर टाकली, मग तोंडावर बोट ठेऊन गप्प राहण्याची सूचना केली. मग सावकाश आपली फाईल गाडीतून घेऊन, त्यांच्या वाहनचालकाला सूचना दिली. मग VFS च्या बाहेर आपला कोट नीट करत रांगेत उभे राहिले. कमाल आहे, इतक्या कमी वेळात माणूस इतका सुज्ञ होऊ शकतो, ह्यावर आज पर्यंत माझा विश्वास नव्हता.
ह्यात लक्ष देऊन बघितलं तर त्या चकाकत्या गाडीतून उतरणाऱ्या साहेबाच्या असंवेदक वागणुकी मागचं कारण बघता, हि कोणा एकाची चूक आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल. ह्या मागचे बरेच घटक आहेत, उदाहरणार्थ: कुठे तरी कमी पडलेलं शिक्षण, आपल्याच देशाच्या सरकारी व्यवस्थेने केलेला आपलाच घात, अनुकरण करतांना पण चुका करणे, आपली विशाल सहनशीलता, असे कैक मुद्दे जोडल्या जाऊ शकतात. पण हे मुद्दे ethically पाहता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. आमच्या rule book मध्ये जे दिलं आहे, त्या प्रमाणे आम्ही वागणार, परिस्थितीची बिलकुल खबर न घेता. हे तर आमच्या मुन्नाभाई ने पण दाखवून दिलं, “अगर मरीज मर राहा हो, तो form भरना झरुरी है क्या?” आमच्या बोथड झालेल्या भावनांनी हा विनोद आहे, असे समजून तोंडून ‘ह्या ह्या ह्या ह्या’ असे उद्गार काढायचा सिग्नल दिला. बिचाऱ्या मेंदूची तरी काय चूक?
ह्यात आपल्या सहनशीलतेचा दोष मात्र नक्की आहे. माझी सहनशीलता नको तिकडे चालू पडते. रस्ते खराब आहेत, ठीक आहे, शिव्या घालून काही उपयोग नाही. सहनशीलता जागी आहे. एका मागे एक घोटाळे उघडकीस येत आहेत. आम्ही काय करणार? सहनशीलतेला म्हणा चहा तयार आहे! आज दूधवाला उशिरा आला! “हे साले इकडे येऊन पैसा मिळवतात, आता माजले आहेत!”, (सहनशीलता दूध आणायला गेलीये!) Traffic चं उदाहरण मीच देऊ की तुमचं तुम्ही वाक्य जुळवून घ्याल?
भारत महासत्ता होणार! कसं होणार हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. आमच्या मागून येऊन, बऱ्याच देशांनी स्वतःला महासत्ता म्हणून गाजवलं, बेचिराख झालेलं जपान आज कुठे आहे हे दिसतंच आहे. आपण स्वतंत्र झालो, आणि पुढे काय करायचं ह्या प्रश्नाचा विचार करायचा विसरलो की काय? गोल्डन quadrilateral आज “श्री अटल बिहारी वाजपेयी के सपनों का राजमार्ग" म्हणून ओळखला जातो! आमचे पुढारी, आणि त्यांचे लोचट चमचे ह्यांना आपण सर्व साधनसंपत्ती देऊ केलीये. लुटा....काय वाट्टेल ते करा.
कोणी एखादे, सव्वाशे कोटी लोक “जगा आणि जगू द्या “ चा हा असा अर्थ काढतील असं वाटलं नाही.
तरी बघितलं तर आपण इतके पण दळीद्री नाही, आपल्याकडे आपलं कल्चर आहे! विसरलात का? हाच तर तो मुद्दा जो आपल्याला शेवटी तारतो!
आज हा सूर छेडला आहेच, तर मग हिशोब पण लाऊन टाकू.
मी खूप स्वार्थी मनुष्य आहे. नेहमी तोल-मोल करून मग द्यायचं की घ्यायचं हे ठरवतो. पण काही ठिकाणी देण्यासारखं काही आहे, हे मला ठाऊक नसतं. माझ्या शिक्षणाला वार्षिक २४-२८ रुपये लागत. सरकारी शाळा होती. ना डोनेशन, न कसला आगाऊ खरचं करायला लावला. मात्र आम्ही पदवीधर झालो, पदव्युत्तर शिक्षण घेतलं. आता नौकरी करून आपला बँक खाते भरणार. वेळच्या वेळी आयकार भरणार, न चुकता मतदान करणार, सर्व नियम पाळणार …... बास? संविधान म्हणेल तसेच आम्ही आमचे हक्क आणि कर्तव्य बजावू. पढ लिखके आपण भले शिकलो, तरी आज मी माझ्या शाळेचं ऋण फेडलं का? उत्तर आलं “नाही” पोराच्या पहिल्या पगारात घरी पेढे, आई साठी साडी! आम्हाला कधी चांगले मास्तर नाही मिळाले म्हणायला आम्ही मोकळे. मला असं आयुष्य पाहिजे, जिकडे मी रोज माझ्या कामावरून आल्यावर मला सुखाने दोन घास खात एखादा टी.व्ही शो बघता यावा. मग एखादा पियानो concert ऐकत पेंगुळून झोपावं. मी आयकार वेळच्या वेळी भरीन, आणि म्हणून ह्याच्या बदल्यात मला माझा परिसर, माझा देश एकदम टाप-टीप पाहिजे? खरच मी अशी अपेक्षा करू शकतो का? आमच्या मोलकरणी मागे लाख जीव लाऊन एक एक काम नीट करून घेतल्या जातं. मग आपण आपल्या नेत्यांवर इतका विश्वास ठेवतो का? ९९% लोक ह्या प्रश्नाचा उत्तर नाही देतील. मग विश्वास ठेवत नाहीत, तरी तो माणूस सगळं नीट-नेटकं करेल ह्याची हमी तुम्हाला आहे? हे आता जास्तीच किचकट होत चाललंय. सोडा.....मला काय, आज पर्यंत देश चालतच आलं की. मी एकट्याने काही केल्याने काही बदल होणार आहे का? असं असेल, तर एक मेल forward केल्याने तरी काय होतंय? एखाद विचार कसा फोल आहे हे सांगून मी मोकळा, पण ह्यालाच जरा डागडूजी पुरवून कसं उभं ठेवता येईल हे आम्हाला ठाऊक नाही. हीच तर आपली प्रवृत्ती आहे. आयुष्यात काय करायचं आहे हे माहिती असून काय उपयोग? काय नाही करायचं हे हि तर माहिती करून घेतलं पाहिजे.
शाळेत आठवीत गेल्यावर मास्तर ने फळ्यावर “Circumference of a Circle = 2πr” लिहलं. आम्ही गाढवा सारखं वहीत उतरवून घेतलं, पुस्तकात दिलंय, तेच मास्तर फळ्यावर लिहतो, म्हणजे त्यात काही चूक नसणार. मग विश्वास ठेऊन पुढची गणितं हातावेगळी करायची. पण त्यावेळी ह्या ‘π - पाय’ ची किंमत नेहमी २२/७ किवा ३.१४१५९ का? असा प्रश्न कधी स्वप्नात हि पडला नाही. तो सरळ आठवीची परीक्षा झाल्यावर पडला. उत्तरही तितकंच सोप्पं होतं, पण हे वर्गात विचारलं तर मास्तर रागावतील, इतर मित्र हसतील, मग असू दे. मास्तरला कदाचित हे समजावून सांगणं तितकं महत्वाचं वाटलं नसेल. आमच्या सारीशला पण त्यांच्या मास्तरांनी नाही शिकवलं. बघा, ‘कित्त्ती’ फरक पडलाय! मुलं, विचारायला बघत नाहीत, आणि मास्तर स्वतःहून काही सांगायला जात नाहीत. शाळेपासूनच आमचा आणि आमच्या मास्तरांमध्ये अभ्यासाच्या बाबतीत communication gap होता. आज आम्ही शाळेत नाही, ना कॉलेज मधे. पण communication gap मात्र सांभाळून ठेवलाय. आता हा gap मी स्वतःशीच पाळतो. स्वतःशीच खोटं नाटक करून ‘विश्वास’ ह्या भावनेशी खेळतो. taxi वाल्यावर चुकून विश्वास ठेवायचा नाही, पण तिकडे मंत्रालयात बसलेला १००% चोर असूनपण त्यावर मात्र विश्वास आहे!! हा आमचा विश्वास! विश्वास ह्या शब्दाचा इतर वेळी प्रयोग होत असेल किंवा नसेल, मात्र एक क्वार्टर संपवून दुसरी मागवली की नक्की होतो! असो......
अजून आमच्या बाल्याला चड्डी सांभाळता येत नाही, तरी बोलतो कसा. एकदा मला पण कळणार आहे. म्हणूनच हे सगळं कळायच्या आत असलं असंबद्ध बरळून मोकळं व्हावं.
अनुकरण! अनुकरण हे तर आपल्या रक्तात भिनलंय. आम्हाला अजून चांगले रस्ते उपलब्ध नाहीत, तरी गोव्यात मात्र स्कायबसचा प्रोजेक्ट करतात. ठीक आहे, प्रगती तर झालीच पाहिजे, पण अनुकरण करतांना मग हुबे हुब अनुकरण करा, किंवा संपूर्ण स्वतःच्या जीवावर बनवा. अधे मध्ये नका ठेऊ. मग ती गोव्याची स्कायबस कोसळावी, आणि त्या बरोबरच आम्ही अजून या स्वतःची स्कायबस बनवण्याच्या लायकीचे नाही हे सिद्ध होतं. पण आपल्याकडे तर एका पेक्षा एक इंजिनियर आहेत. तरी हि परिस्थिती. ‘अनुकरण' ह्या शब्दावरून एक गोष्टं आठवली.
एका तलावात बरेच मासे राहत असे. एक दिवस, ह्या तलावात एक कोळी आपलं जाळ टाकून बसतो. त्याच्या जाळ्यात पहिला मासा लागतो. मासा आपली अक्कल लाऊन चूप-चाप हालचाल न करता, श्वास न घेता जाळ्यात पडून राहतो. कोळी त्याला जाळ्यातून मोकळं करतो, मेलेला मासा बघून, त्या मास्याला पुन्हा तलावात फेकून देतो. तलावातले इतर मासे हे बघतात. कोळी पुन्हा एकदा जाळ टाकतो. ह्यावेळी दुसरा मासा जाळ्यात सापडतो. तो लगेच पहिल्या मास्याचे अनुकरण करायला बघतो. डोळे मिटून पडतो, पण श्वास रोकून धरायचा त्याला ठाऊक नसल्याने, कोळी त्याला आपल्या टोपलीत टाकतो. ह्या वेळी तिसरा मासा डोळे मिटून, श्वास रोखून पडतो. पण बिचारा पाण्याबाहेर येताच तडफडू लागतो. त्याची पण रवानगी टोपलीत होते. पुढे काय झालं सांगायची तशी गरज नाही. पण गोष्टीचा बोध असा होता की, अनुकरण करायचं असल्यास अगदी हुबेहुब करा, नाहीतर करूच नका.
आम्ही दिसेल तसं पाश्चिमात्य पद्धतीचं अनुकरण केलं. औद्योगिकीकरणची लाट आली. उद्योगधंदे देशोदेशी सुरु झाले. प्रत्येक गोष्टीचं उत्पादन वाढू लागलं. आता विक्रीसाठी तिसऱ्या दुनियेतले देश उघडे आहेतच. विका! पण ह्यांना आधी खरेदी करायची चटक लावा. मग आमच्या टी.व्ही वर अजय देवगण आणि सौ. काजोल देवगण आपल्या refrigerator ची जाहिरात करतात. मी ह्या visual pollution च्या तोंडी पडतो. मला का कोणास ठाऊक, पण माझा फ्रीज नाकाम वाटू लागतो. आता अचानक आमचा २० वर्षापूर्वीच्या फ्रीजची जागा एक डबल डोर फ्रीज घेतं. आता मला माझा टी.व्ही. पण जुनाट वाटतोय, द्या बदलून. पण मला ह्याची चिंता नसावी, की हा टी.व्ही आला कुठून, गेला कुठे? माझ्या दिवाणखान्यात शोभा वाढली की झालं. आज आमच्या अडगळीच्या खोलीत अश्याच गोष्टी पडून आहेत. एखाद दिवशी मोलकरीण घेऊन जाईल. चला एक छोटं उदाहरण घेऊ, तुमचा हा कितवा मोबाईल फोन आहे? ह्या पूर्वीच्या handsetsचं काय केलंत? माझ्या नवीन मोबाईल वापरण्याच्या हट्टासाठी कित्येक गोष्टी ओरबाडल्या जात आहेत. कदाचित हा माझ्या हातातला मोबाईल कोणाच्या परिवारावर अंधार पसरवून गेलेला ब्लड-डायमंड नसेल? छे छे, इतकी काळजी करू नका. हे सगळं कळतं पण वळत नाही त्यातलं आहे. आणि मला म्हणतात असंवेदनशील मनुष्य प्राणी!
जगायचा चाळा लागलाय सगळ्यांना.