शलौम शाब - ८

22 January 2012 वेळ: Sunday, January 22, 2012
आज काठमांडू मधल्या लहान - मोठ्या गल्ल्या फिरून यायचं ठरवलं. थामेल मधली रौनक संध्याकाळी बघण्यासारखी असते. सुरवात परत एकदा गौशाला कडून करायची होती. पशुपतीनाथचं मंदिर बाय-पास करून सरळ घाटावर जाऊन सकाळचा वेळ काढावा म्हंटलं. पशुपतीनाथ मंदिर हे बागमती नदी किनाऱ्यावर आहे. मंदिराच्या मागे घाट आहे. मंदिरात शिव लिंगावर होणाऱ्या अभिषेकचा तीर्थ एका गोमुखातून बागमती नदीत वाहत जातं. हिमालयातून वाहत येणाऱ्या ह्या नदीत आता दुनियाभरच्या गोष्टी निर्माल्यच्या नावाखाली येऊन पडतील. नदीचा आणि प्रदूषणाचा ही पहिली भेट. एका बाजूने एक प्रेत आले. जमलेल्या गोऱ्यांना "हिंदू क्रिमेशन" म्हणून त्यांच्या गाईडने सांगितलं. थंडीमधे सकाळी सकाळी वैतागून गाईडला पैसे दिले आहेत म्हणून निघालेली युरोपीयन म्हातारी पण थोडा रस घेऊन "हिंदू क्रिमेशन" पाहू लागली. बऱ्याच जणांना त्याचा विडियो रेकॉर्ड करावसा वाटला. त्यात एकाच्या गळ्यात २ भारीतले SLR दिसले. 70-200 mm एल सिरीजचा वापर एका अंतिम क्रियेचे फोटो काढण्यासाठी उपयोगी पडतांना बघून मला पण हसू आलं. घाटाच्या ह्या बाजूला कुज-बुज वाढू लागली. कोणाला कशाचं कुतूहल वाटेल हे सांगणं खरंच मुश्कील आहे. हा माणूस, ह्या "हिंदू क्रीमेशन" चे फोटो काय म्हणून दाखवणार आहे कोण जाणे. तरी नशीब इथे प्रेत नदीत सोडून द्यायची पद्धत बंद केलीये.

समोर मंदिरात आरती संपत आली,  मी तिथल्या ढोंगी साधूचे फोटो घेतले. एका परदेशी पर्यटकाने २-३ साधू गोळा केले होते. त्यांना पैसे देऊन, फोटोसाठी पोज द्यायला लावत होता. त्याचा गाईड - हूडचं काम करत होता. मी मनात ठरवून ठेवलं, ह्या साधूने आपल्याला पैसे मागितले तर त्याला पैश्यांच्या मायेत अडकू नाही द्यायचं. त्यातल्या एकाने मला विचारलं "which country?" आणि मला globalization ची जाणीव झाली! स्वतः ला नागा साधू म्हणवणारा इंग्रजाळलेला होता. मी त्याच्याशी गप्पा मारत त्याचे फोटो काढत बसलो.

परत जातांना वाटेत एक नागा साधू भेटला. त्याच्याशी बऱ्याच गप्पा रंगल्या. त्याची तपस्या अजून सुरु झाली नव्हती. त्याचे भ्रमण अजूनही सुरु होते. त्याने तपस्या करण्यासाठी एक जागा पण बघून ठेवली होती. "मै पढा-लिखा नही, मगर आंखो से देखकर सब समझ लिया |" त्याच्या कडून बरंच काही समजलं. म्हणे बनारस (वाराणसी) मधे गंगा पोहत पार केली तर स्वर्ग दिसतो. सगळे देव एकत्र बसलेले दिसतात. हा काय नवीन किस्सा आहे? कदाचीत तो रुपकात्मक अलंकार वापरात आहे. खरोखर स्वर्ग नसून, त्यात काही वेगळं कारण असेल. मी माझ्या सोईचा अर्थ लावला. मोघलांच्या हल्ल्या पासून मूर्त्या वाचवण्यासाठी, त्यांचं विसर्जन गंगेत केलं असावं. सगळे देव-देवता जिथे एकत्र येतील तिथे स्वर्ग उभं करणारा हा साधू मनोवेधक वाटला. मी मुक्तीनाथ होऊन आल्याचं कळताच, मुक्तीनाथ बाबाला शालीग्राम देण्याचा विषय काढला. शालीग्राम कधी विकत घ्यायचा अथवा द्यायचा नसतो. तो स्वतः जाऊन वेचावा लागतो. तो त्याच्या प्रवाहात बोलत होता. जे समजलं ते लक्षात ठेवलं. नर्मदेचा विषय निघताच, त्याच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितला. नर्मदेच दर्शन करून आलेल्याचा आशीर्वाद घ्यावा म्हणे. मी पण संकोचत त्याच्या जटाधारी डोक्यावर हात ठेवला. त्याने त्याच्या पिशवीतून कसलीशी पांढरी भुकटी काढली, अन् कपाळाला लावली. मग मी पण त्याचे काही फोटोज घेतले. गप्पांमध्ये बराच वेळ पळाला होता, खैर मला इथे कसलंच वेळापत्रक नसल्याने फरक पडत नाही.

आज भक्तापूर ऐवजी स्वयाम्भुनाथला जाऊन यायचं मनाशी ठरवलं. माय्क्रो पकडली. स्वयाम्भुनाथ हे सगळ्यात जुनं स्तूप आहे. वर पर्यंत रस्ता जातो, पण त्यासाठी वर जाणाऱ्या बसची वाट बघत बसावं लागलं असतं. त्यापेक्षा पायऱ्या चढून लवकर पोहचलो. इथे बरेच चित्रकार होते. बऱ्याच जणांचे स्टुडियो होते. तिथे बसल्या बसल्या हिमालयाचे नजरे त्यांच्या कॅन्वासवर उमटत असतांना बघून मजा वाटली. काठमांडू शहराचा पसारा इथून दिसतो. इथे सोलापूर होऊन आलेले कित्तूर भेटले. ते साठ माणसांच्या गटात, कुठल्याशा travel agency बरोबर आले होते. ते कुठल्याशा travel agency बरोबर आले होते. त्यांनी आपल्या इतर साथीदारांशी ओळख करून दिली. सगळ्यांनी मला रात्री महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण जेवायचं आमंत्रण दिलं. रात्रीचे परतीचे वांदे नको म्हणून मी नेपाळी जेवणात सुख मानलं. बाग बाजार पासून चालत थामेलला आलो. चालत जायला वेळ लागतो, मात्र इतकं सगळं बघितल्यानंतर पचवतापण आलं पाहिजे. आपलं चालतांना हे सगळं रवंथ करायला बराच वेळ मिळतो. आता इथले रस्ते नीट समजले आहेत. नकाश्याची गरज पडत नाही. थामेलच्या गल्ल्या तसे फार confusing, पण हळू हळू सवय पडते. चे-गुवेरा, बॉब मार्ली, गन्स अन् रोसेस, लेड - झेप्प्लीन ची चित्रं असलेले ध्वज विकायला ठेवले होते. इथे पण बाजारात फिरतांना खोटं-खोटं हसून "हेलो, कम इन प्लीज" म्हणणारे दुकानदार चुकवत फिरावं.


आज नेपाळी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. डोळ्यावर झोप आली अन् रूम कडे पाउलांनी रूमची वाट धरली. रूम मधल्या भूताची मात्र आता भीती निघून गेली होती. पडल्या पडल्या झोप लागली.

रूम मधल्या भूताची मात्र आता भीती निघून गेली होती. पडल्या पडल्या झोप लागते.

 


शलौम शाब - ७

04 January 2012 वेळ: Wednesday, January 04, 2012
खोली तशी लहान एक पलंग, कोपऱ्यात टी.व्ही, एक छोटा स्टडी टेबल आणि खुर्ची. एक साधारण हॉटेलची खोली असावी तशी खोली. आडवा पडलो, आणि बघतो तर वर पंखा नाही. फक्त पंखा लावायला एक bracket दिसत होती, आणि insulating टेपने वायर झाकली होती. धोबी घाट सिनेमा मधला पंखा डोळ्यासमोर आला, सब-कोन्शियास मधून वाराणसी मधली गोष्ट आठवली. आता मी दिवा विझवला, की दिवा आपोआप चालू होईल का? उगाच प्रश्न भंडावू लागले. आता नवीन रूम शोधायची इच्छा नव्हती, आज दिवे चालूच ठेऊन झोपायचं ठरवलं. बघु काय होईल ते. झोप लागे पर्यंत असंख्य विचार डोक्यात नाचून गेले. शेवटी एकदाची झोप लागली, जाग आली ती थेट पहाटे सहा वाजता. सकाळी उठून इथल्या थंड पाण्याचे शिप्के चेहऱ्यावर घेतले की झोप कुठल्याकुठे पळून जाते. चहा पितांना आदल्या रात्री मनात चालेल्या चकमकीची आठवण झाली. मला तर काही विचित्र अनुभव नाही आला. नेहमी सारखी छान झोप लागली.

शेवटी भूत म्हणजे काय? जे आपल्या माहितीत नाही, ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही अश्याच गोष्टी भूत म्हणून भंडावून सोडतात. लहानपणी गणिताचं भूत देखील असंच मानगुटीवर बसायचं. फक्त ते भूत पुस्तक मिटताच नाहीसं होत असे. अजून बरेच प्रश्न आहेत जे आपल्याला सुटले नाहीत. कदाचीत सुटले तर आणखीन नवीन कोडी आपली वाट बघत असतील. आपणच एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा, आणि मग आपणच त्याला छानसं नावं द्यायचं. आता न्युटनने सफरचंद पडतांना पाहिलं, आणि त्याने त्याचा आभ्यास करून गुरुतात्वाकर्षणचा शोध लावला. ह्याचा अर्थ असा नाही की न्युटनने शोध लावायच्या आधी gravity अस्तित्वात न्हवती. ह्या निसर्गात सगळं आहे, सर्व शक्ती आहेत, आपण फक्त त्या वेवलेंथ वर ट्यून व्हायचे बाकी आहोत. सालं डोकं पण जाम वांड प्रकार असतो. काही कळायच्या आत, धोबी-घाटचा पंखा, वाराणसी मधला आणि काठमांडू मधल्या खोलीतला नसलेला पंख्याची एकत्र  कडी जोडून मोकळा झाला.

आज काठमांडूच्या गल्ली बोळ फिरायचे आहेत. सुरवात पशुपतीनाथच्या मंदिरापासून करावी म्हंटलं. दार्जलिंगमधे प्रती पशुपतीनाथ मंदिर पाहिलं होतं. मी ज्या इलाक्यात राहात होतो, त्याला थामेल म्हणत. इथून आता रत्नापार्क आणि रत्नापार्क होऊन पुढे गौशालाकडे जाणाऱ्या माय्क्रो पकडायची होती. किती काय, भाडे होईल ती चौकशी करून बसणे कधी पण चांगलं. गौशालेला जातांना एक ओळख झाली, त्यांनी संपूर्ण पशुपतीनाथ मंदिर दाखवलं. प्रत्येक मूर्तीची खासियत सांगितली. मंदिरात प्रचंड गर्दी होती, पण तरी आत पटकन घेतलं. ह्या मंदिरचं कौतुक करावं तितकं कमी. सुंदर बांधकाम शैली, त्यात एक-एक पौराणिक कथा रोवल्या होत्या. एका ४ फुटी कमानीमधे मोठा घंटा बांधला होता. वर मंदिराच्या छतावर माकडांची चढा-ओढ लागली होती. मग माकडं भांडू लागली, घंट्या बांधलेल्या साखळी वरून दुसऱ्या साखळीवर आणि मग तोल जाऊन धप्प-कन्न खाली माणसांच्या गर्दीत. एक क्षण, पुजाऱ्या पासून ते बाहेरच्या द्वारपाल - सगळ्यांचे लक्ष ह्या माकडांचे चाळे बघण्यात गुंतले होते. एक क्षण सगळं काही फ्रीझ झाल्यागत.

आपल्याकडे, मंदिरांच्या बाहेर दारापाशी यक्ष - यक्षिणीच्या मुर्त्या असतात तसंच इकडे भैरव नेपाळ मध्ये यक्ष मानल्या जातो. बाजारात याक्षांचे मुखवटे देखील विक्री साठी असतात. मुखवटे हे पारंपरिकरीत्या काही जमातींमध्ये सणानिमित्त नृत्याच्यावेळी घातल्या जातात. इथे बऱ्याच प्रथा भारतातल्या सारख्या आहेत. अगदी बारीक फरक असतील तेवढेच. आत प्रकाशचित्र काढण्यासाठी मनाई होती. आसपासचा परिसर फिरून, तिथून पुढे बौद्धनाथला जायचं ठरवलं. चालत जाण्यासारखं अंतर, आणि काठमांडू मधल्या रस्त्यांवर फिरता बऱ्याच गोष्टी आढळतात. हिंदू राष्ट्रात, काही मंदिरात फक्त हिंदू धर्माच्या लोकांना प्रवेश मिळेल. इतर लोकांनी बाहेरून मंदिर बघून समाधानी व्हावं. काठमांडू म्हणजे देव-देवालयाचे शहर म्हणता येईल. थोड्या-थोड्या अंतरावर सुंदर, मंदिर बांधले आहेत. त्यांच्या प्रत्येक भागात कलात्मकता दिसते. लाकडी चौकटीवरचे कोरीव कामात अचूकता. ज्यांनी हे कोरीव काम केलं असेल, त्याने अगदी मान मोडून काम केलंय. प्रत्येक प्रांताच्या बांधकामाची एक वेगळी शैली असते. मराठ्यांची बांधकामं भक्कम असत. फार कोरीवपण दिसत नाही. तोच पेशवाईमधे कोरीव काम दिसून येतं. मोगल साम्राज्यात, कलात्मक दृष्टीकोनाने वास्तू निर्मिती दिसून येते. ह्यावर इतिहासाची एक छाप राहून जाते. प्रत्येक राजकर्त्याच्या विचार सारणीचा अंदाज येतो. असेच architectural सौंदर्य बघण्यासाठी उद्या भक्तपुर बघायचं ठरवलं.

पशुपतीनाथ मंदिरापासून दोन-तीन किलोमीटर वर बौद्धनाथ आहे. हे नेपाळ मधले सगळ्यात मोठे स्तूप मानल्या जातं. इथे, हवेत थंडी असल्यामुळे चालत फिरतांना थकवा येत नाही. (पैसे पण वाचतात, ते वेगळं.) बौद्धनाथला पोहचलो. ओम माणि पद्मे हुम - तिबेटीयन chant ने एक माहोल बनवून ठेवला होता. (सालं, आपल्याला तर एखाद्या गोष्टीपेक्षा माहोल जास्ती लागतो. आभ्यास कमी केला असेल, पण अभ्यासाला लागणारा complete माहोल कसा बनवावा हे मला विचारा!) काही महिन्यांपूर्वी दातारने हा तिबेटी chant ऐकवला होता. मग रात्री आभ्यास करत असतांना व्हाईट नॉइझ म्हणून हा chant लावायचो. हळू हळू हा chant डोक्यात बसला. आता हे chanting काही नवीन नाही. इथे बऱ्याच ठिकाणी तिबेटी लिपीमधे "ओम माणि पद्मे हुम" लिहलेले दिसून येतं. इथे एका तिबेटी चित्रकाराने मला ह्या मंत्राचा अर्थ सांगितला. माणसाच्या आयुष्यात चालू असलेले पाप-पुण्याचे चक्र एकदाचे थांबावे. मानवाला मोक्ष प्राप्ती व्हावी. असा काहीसा अर्थ त्याने समजावून सांगितला. इथे छोट्या भांड्यांमधे पाण्यात झेंडूची फुलं ठेवलेली दिसतात. त्या पाण्यात फुलाचा थोडा रंग उतरला आहे. हेच पाणी वर स्तुपावर सडा टाकायला वापरत असावेत.

पायतोड करून मग राज दरबार बघायचं ठरवलं. इथे आता वस्तू संग्राहलय बनवले आहे. इथे प्रत्येक वस्तू वर सुयोग्य प्रकाश योजना केली आहे. खाली टिपणी देखील सुटसुटीत आहे. आज दुपारच्या जेवणाला लटकी बसली. आता पोटात आग पडली होती. पुन्हा एकदा थामेलमधे येऊन पोहचलो. थामेल - हा इलाका tourist ने भरलेला असतो. म्हणून इथे थोडी उशीर पर्यंत चेहेल पेहेल असते. इतर भाग मात्र साम-सूम असतात. रस्त्याने फिरत, बाजार बघत थामेलच्या गल्ल्या पार पडत होत्या. एका ठिकाणी, एक छोटंसं चायनीज उपहार गृह दिसलं. ह्या रोड साईड उपहार गृहत निवांत शांत बसून आज काढलेले फोटो परत एकदा नीट बघत खायचं होतं. आज म्हशीचे मांस खाऊन बघितले. इथे थूकपा नावाचा एक पदार्थ मिळतो. त्याला आपण सुपी-नूडल्स म्हणू. ह्यात म्हशीचे मांस थोडं रबरी लागत होते. जबड्याचे व्यायाम करण्यासाठी मी नक्की हे खाईन.

परतीच्या वाटेवर जरा भटकलो, पण आता हा इलाका कोळून पाठ झाल्यागत आहे.आज मात्र मेल्यासारखा गाढ झोपलो.

                                                                                                 


 
AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates