Well-wisher

21 December 2010 वेळ: Tuesday, December 21, 2010
A well-wisher, obviously wish the best possible things for you but also is the one who always thinks something bad might happen to you and worries about you...

Damn... I don't want to be a well-wisher anymore...

Yours,
(Well-wisher) Saurabh

Being Seriousss...

वेळ: Tuesday, December 21, 2010
एकदम सन्नाटा... नीरव गडद शांतता... इतकी की टाचणी पडली तरी कानठळ्या बसाव्यात... अश्यावेळी फक्त एकच आवाज ऐकू येतो...

सोsss हमsss
सोsss हमsss
सोsss हमsss

काही क्षण असेच ती अनैच्छिक क्रिया ऐकण्यात जातात... बेसावध...

अचानक एक दिलासा देऊन जाणारी जाणिव होते. मी जिवंत आहे. माझे श्वास चालू आहेत. पण... पण पुढचा श्वास ऐकू नाही आला तर.... मणके गोठवत जाणारी भिती थरकाप उडवत पुर्ण अंगातून सळसळते...

आणि खरच पुढच्या क्षणाला तसच होतं. श्वास ऐकू येईनासा होतो....

कारण......


तुमची समाधी भंगलेली असते. तुम्ही तंद्रीतुन बाहेर आलेले असता... ज्यासाठी श्वास चालू आहे ते जगण्यासाठी.... तो फिर नाच्च्यो.... धत्तरतत्तर धत्तरतत्तर... अपडी पोडे पोडे पोडे... च्यायला काय राव... अरे भाय कितना सिरिअस... काय चाल्लय काय... और कायको... कशाला डोक्याची काशी घालून घेताय. सध्या सगळीकडे गंभीर-गंभीर माहोल आहे. म्हटलं... आपणपण थोडं सिरिअस झालं पाहिजे. आणि मला त्या साथिची लागण झाली. आपण लय सेंसेंटिव... (कोण???) सेंसिटिव्ह... पण माझ्यासाठी हे असले विचार आणि नाकातला शेंबुड एकसारखेच. झाली सर्दी माझ्यापण डोक्याला. धत्ततिच्या... लगेच डोकं शिंकरलं... I mean आपटलं... नाय ठोकलं(???)... झटकलं(!!!)... हाड हाड... केलं काय तरी... भ्यॅक्क... ओकलो (शेंबुड ओकला???) आपलं... शिंकरलो इकडे सगळं. आता फ्रेश येक्दम. साला सिरिअस होता येत नाय राव मला. गंभीर बाब है की ही.

सो... श्श... शॉ.. ऑ... हाsssक्ष्च्छीsss....

आपला,
(शेंबडा sorry गंभीर) सौरभ

आज्जीची मटण रस्सा पाककृती

19 December 2010 वेळ: Sunday, December 19, 2010
आजी अमेरिकेला गेली असतां, आजीने खास पारंपारिक मटण करायची दिक्षा वरुणला दिली.  

थोडक्यात ओळख देतो :
आजी : रोहिणी कुलकर्णी
Anchor & Post porcessing : वरुण वैद्य.
Property : वरुण आणि रेणुका.

मी...

18 December 2010 वेळ: Saturday, December 18, 2010
Okay, खालच्या ओळी मला कशामुळे सुचल्या ते आधी सांगतो. अनघा मॅमच्या ब्लॉगवरची "दुभंगलेली" हि पोस्ट वाचली. मेंदु घुसळला गेला, विचारांच वादळ सुटलं आणि मी भरकटलो. आता त्या पोस्टचा आणि खालच्या ओळींचा नक्की काय कसा संबंध ते विचारु नका. बस्स... वाटलं काय तरी... सुचलं... लिहलं. (खर्र सांगू काय... मला उगीच लय भारी काहितरी लिहल्यासारखं वाटतय. ;-) माहित नाही का. पर आज अपन अपनपेईच खुष है!!! हिहॉहॉहॉ... चला... भगव्या रंगाचं धोतर शिवायला टाकलं पाहिजे. :-P)

सूर्य मी, चंद्र मी, दिवस जसा तशी रात्र मी...
हस्तक्षेप ना कुणात माझा, नं माझ्यात कधी आले कोणी...
मी उगवतो, मी रहातो, मी पहातो, मी मावळतो...
पृथ्वीवरच्या सर्व बदलांस तरी का सर्वथा जबाबदार मी...
भंगते ती, भिजते ती, उजाडते ती, सजते ती...
फेर धरुनी फिरते ती, स्वतःच सर्वाचे कारण ती....
भविष्य घडवण्या तुच समर्थ, तुजमध्ये ना कधी लुडबुडलो मी...
तुझ्या नशिबाच्या कुंडलीपंचांगांमधे तरी कसा बरे फसलो मी...

आपला,
(अगम्य) सौरभ

सवाई गंधर्व

17 December 2010 वेळ: Friday, December 17, 2010
ह्या वेळी जमेल तितकं सवाई गंधर्वला जायचं ठरवलं. 
लिहण्यासाठी खरच काही उरलं नाही. 
तुम्ही अजून कधी गेला नसाल, तर नक्की जावा. 




एक हॉर्मोनचा शोध

07 December 2010 वेळ: Tuesday, December 07, 2010
 
मी अत्यंत फुकटचंद रिकामटेकड्या डोक्याचा आहे असं नाही. पण सालं सुचतंच असं कि मग ते पोस्ट करायची खाज, पोस्ट केल्या शिवाय जात नाही.

CAUTION: सभ्य भाषेची अपेक्षा ठेऊ नका.

तर ह्या वेळी बाब अशी आहे, मी मधे एक स्वखर्चात एक रिसर्च केला. रिसर्च म्हणजे नेमका काय केलं -
विविध लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले. माणूस घरी असतांना, कार्यालयात असतांना, खरेदी करतांना, हागल्या-पादल्याला त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा केले.
आश्चर्य म्हणजे एक नवीनच हॉर्मोन माझ्या नजरेस आला!
मी त्या हॉर्मोनचं नाव मग : "आई घाल्या हॉर्मोन" ठेवलं. 
हा हॉर्मोन विशेषकरून माणसं रस्त्यावर गती पकडू लागल्यावर रिलीज होतो.
तसं पाहता, ह्या हॉर्मोनचं प्रमाण काही ठराविक नसतं, पण रक्तात मद्य, भिनलं असतांना हॉर्मोनचा असर जास्ती होतो.

नेमकं हा हॉर्मोन रिलीज होतो म्हणजे काय होतं ते बघा :
लोकांना आपण "रायडर" असल्याचा भास होतो. (आता मी कुठे म्हणतो कि तुम्ही बेजावाब्दारपणे गाडी हाकता)
.....थोडक्यात लोकं "रीतसर" गाडी चालवतात.

रिक्षावाल्यांमध्ये हा हॉर्मोन मुबलक प्रमाणात मिळतो, बस चालक ह्या होर्मोंचे बूस्टर आपल्या तंबाखू बरोबर मळून घेतात. (हो आम्ही अश्या बस चालकांची पीक कलेक्ट करून हे बोल्तोये.) अजून आमचा अभ्यास ग्लोबल झाला नसला, तरी आम्ही दावा करू शकतो कि तिसर्या दुनियेतल्या सगळ्या देशात हा हॉर्मोन आढळत असावा.

ह्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असतां आम्हाला समजला कि ते लोक आमच्या बापाचं काही खात नसल्याने असं होतं. म्हणूनच सगळ्यात जास्ती उत्तरं,"तुझ्या बापाचं खातो का?" ह्या category मध्ये नोंदवल्या गेले.

हॉर्मोन रिलीज होण्याचा आणि बुडाखालच्या गाडीचा काही मात्र संबंध नाही. माणूस हायाबुसा वर बसलेला असो, किंवा सनी झिप वर. आपल्या मागे कोणाचा हात आहे, ह्या वरून हायपर किव्वा हायपो सिक्रिशन ठरतं. नंबर प्लेट वर महाराजांचा उल्लेख असेल तर त्याच्या हॉर्मोन लेवेल थोड्या जास्ती असण्याची शक्यता असते. पण जर नंबर प्लेट वर "डॉली, मोनाली, जानू, आशिक, mom says no girls" असं काही लिहला असेल, आणि रायडर ने मर्क्युरी चा गॉगल "टाकला" असेल, तर हॉर्मोन चा विचार करूच नका; आधी गाडीची चावी काढा, handle lock करून गाडी main stand वर लावा. तुमची चूक नसतांना कशाला गाडीचा inssurance क्लेम करायचा?

शेवटच्या टप्प्यात आम्ही काही landing gear मध्ये गाडी चालवणार्यांना विचारलं. अजून आमच्या अंगाचे काही भाग सुजलेले आहेत, आणि डोकं बधीर!

  

कोकण क्रिडा - सिंधुदुर्ग

01 December 2010 वेळ: Wednesday, December 01, 2010
पुन्हा एकदा आयुष्यात एक long weekend, प्रोफ.ला पण सुट्टी मिळाली. कुठे जायचं अजून काही ठरलं नाही. इतकंच ठरलं होतं की कोकण रेल्वेची सफर करायची. मग दादर-सावंतवाडी पकडली खरी, पण कुठे चाल्लोय हे माहित नाही, अन् पुढे काय वाढलाय ह्याची तर अजिबातच कल्पना नव्हती. तिकीट काढायच्या रांगेतच गर्दीचा अंदाज आला, पण आम्ही जिद्द हरलो नाही.

००:४५ची ट्रेन होती, एखादा जलदुर्ग बघून परत फिरू असा बेत आखला. ट्रेनमधे सीट मिळवण्यासाठी चांगला लढा दिल्यावर बसायचा अनुभव घेता आला! आता मागून येणारे हळूहळू adjust होऊ लागले. कोणी समान ठेवायच्या फळीवर, तर कोणी दोन berthच्या मधल्या जागेत. हे तर काहीच नाही, २ toiletsपैकी एका toiletमध्येपण एखाददोनजण accommodate झाले होते. ट्रेन स्टेशन मधून निघेपर्यंत आजूबाजूला इतकी माणसं गोळा झाली होती, कि अगदी heavy rush असलेली लोकलपण लाजेल. वरच्या berthवर बसलेल्यांच्या पायांची अशी काही जाळी विणली गेली होती कि खाली उजेड यायची संभावना संपली. तासाभरानी शरीराला पाय असतात ह्याचा आम्हाला विसर पडला. पायाला "ping" पाठवल्यास तिसऱ्याच्याच पायाचा reply यायचा. मग सालं ketamineचा एक डोस घेऊन निवांत झोपी जावं. त्यात पण नशिबाची गरिबी म्हणजे ट्रेन पेणजवळ सिग्नलवर २-२:३० तास थांबून होती. पाहटे उठून बघितलं तर रोह आलं होतं. म्हणजे रात्रभर आपण फक्त १००-१५० किलोमीटर काटले होते? आता ह्या बधीर अवस्थेत आणखीन प्रवास झेपला नसता. ट्रेन सोडून, पुढे ट्रकमधून जायचा प्लान आखला. तितक्यात प्रोफ. म्हंटला म्हणून पुढचे डब्बे तपासून आलो. एका डब्यात जागा मिळाली. चला टांग बच्ची तो लाखो पाये!

सिंधुदुर्ग स्टेशन येई पर्यंत दुपारचा ०१:०० वाजला होता. ढगांच्या दाटीमागून सूर्यकिरणं डोकं काढीत होते. आता पाय मनसोक्त मोकळे करून घेतले, चालतांना आपले पाय अजूनपण हलतात ह्याचा आनंद होताच. बस स्थानकाच्या जवळच एका घरगुती खानावळीत बढीया बांगडा थाळीवर हात मारला. प्रोफ.ने कोंबडी नसल्या कारणाने शाकाहारी आहार पसंत केला. जेवण चविष्ट होतं आणि बांगडा ताजा! पुढे होऊन मालवणला जाणारी बस पकडून सिंधुदुर्ग बघायचा आणि सूर्यास्ताचे फोटो काढायचा विचार होता. तसं बघता आजकाल दुर्ग आणि गडांवर बघण्यासारखं काही उरलं नाहीये. तुमच्या जवळपास कुठे ताक, लिंबू सरबत, शीत पेय मिळत नसतील तर मग नक्की जावा! (काही गड अजूनही अपवाद म्हणून आपण ठेऊ...... तरीपण घुमवून फिरवून मला निषेध नोंदवायचा होता.) वाटेत होडीमधे एक छान portrait मिळालं. सिंधुदुर्गावर तसे काही चांगले फोटो पदरी पडले.




आम्ही आता मालवण स्थानकावर पोहचेपर्यंत कणकवलीला जाणारी शेवटची बस निघून गेली होती, आता कसालला जाऊन, तिथून कणकवलीची बस पकडणे हा एक पर्याय होता. आम्ही तो आजमावला. अंगावरचा घाम अन् धुळीचा लेप थोडा धुऊन काढला. अन् पौर्णिमेच्या प्रकाशात मिणमिणतं कोकण पाहत होतो. चांदण्या आणि चंद्र ह्याशिवाय एकही उजेडाचा स्त्रोत नसलेल्या highwayची मजाच और आहे. आजूबाजूच्या झाडीचा तो गोड गंध आणि पानांची सळसळ.

कणकवली बस स्थानकापासून मुंबई-गोवा महामार्ग जवळच होता. महामार्गाच्याच एका टपरीवर उसळ-पाव जेवलो. आता इथून ट्रकला लिफ्ट मागून मुंबईला पोहचायचा विचार होता. पण ह्या अखंड प्रवासात आमचं नशिब कुठेच साथ देत नव्हतं. मग बस स्थानकावर ११:४५ची पुण्याची बस पकडायचा प्रयत्न केला, आत घुसणं मुष्किल होतं. एखादी ट्रेन पकडू म्हणून रेल्वे स्टेशनची वाट धरली. एका ठिकाणी रेल्वे स्टेशनचा पत्ता विचारायला एकाला हात दाखवला, तर तो तिथून आम्हाला नं बघतच सटकला. कमाल आहे, आम्ही कोकणात ह्या महामार्गावरचे भूत वाटत असू त्यांना! एका ठिकाणी ATM दिसलं. पण त्या इमारतीच्या मुख्य दरवाज्यालाच कुलूप होतं! काय भारी गाव आहे हे!! त्या स्टेशन वर पहाटे ०५:४५ पर्यंत ट्रेन थांबणार नव्हती. आता फलाटावर पुठ्याची गादी बनवून आडवं पडून स्वतःशीच म्हंटलं, "उद्याच्या ट्रेनमध्ये इतकी गर्दी असेल कि सालं आपल्याला उभं राहायलापण जागा नाही मिळणार." Murphy's Lawप्रमाणे जे होऊ नये असं वाटतं, तेच होईल अशी अशा करा. पण आमच्या कुत्रं झालेल्या नाशिबासमोर Murphy's Law ने पण हात टेकले.

ट्रेनमध्ये चढलो तर सही, पण सालं उभं राहायचा कांटाळा आला होता. ६ इंच सीट बघून मग तिकडे टेकलो, आणि निर्लज्ज होऊन एकेकाला ढकलून निवांत जागा बनवून घेतली. मग ती जागा एका म्हाताऱ्या बाबाला दिल्यावर मात्र आम्ही दारात पसरून बसलो. पनवेल वरून पुण्याची बस पकडली. बसायला जागा नव्हती, पण तरी आम्ही दोघांनी जिन्यात बसायचे खयाली पुलाव रंगवले! पनवेल सोडलं नसेल तर मागे उभ्या बाईला बसचा त्रास होऊ लागला. त्यात त्यांनी जिन्यात उलट्या केल्या...... वाह रे मेरे नसीब!! काय सुरेख आसन होतं, बरबटलं बिचारं.

काही म्हणा, हा पण एक नविनच अनुभव होता! Patience तर भारीच वाढला आणि सगळेच प्रवास सुखाचे नसतात हा बोध घेतला! केरळ ट्रिपला आपल्याकडे सगळेच हुकुमी पत्ते होते, ह्या वेळी जरा अवघड डाव होता. पण कोकण रेल्वेबद्दल जे निसर्गरम्य वर्णन ऐकून होतो, ते सगळे धुळीत गेले. रुळांच्या बाजूने प्लास्टिकची रांगोळी सर्वत्रच होती. ह्यापेक्षा केरळ मधला कुठलाही random रूट १०० टक्के निसर्गरम्य ठरेल.

असो घरी येऊन व्हिस्कीचा घोट घेत पुढच्या वेळी कुठे जायचं हा प्रश्न कायमच होता. :)

आपला,
(दमलेला) माचाफुको

कवितेची कत्तल

27 November 2010 वेळ: Saturday, November 27, 2010
मला बनवायचीये एक दुःखीकष्टी क्लिष्ट कविता.
म्हणुन मी आणलेत काही हुंदके आणि उसासे.
प्रेमात विव्हळणारी आणि दुःख कुरवाळणारी माणसे.
पोळणारा पाऊस, बोचणाऱ्या आठवणी.
उडालेले रंग, अर्धवट राहिलेली कहाणी.
पाहिलेली स्वप्न ज्यांच्या ठिकऱ्या उडाल्या.
नात्यांची बंधन ज्याच्या चिंधड्या झाल्या.
आणला एकटेपणा तो जो आयुष्यभर पुरला.
सोबत अपयशाचा करंडक ज्याला डोईवर मिरवला.
जितक्या होत्या यातना वेदना त्या सगळ्या मिळवल्या.
एकमेकांत मिसळुन कालव कालव कालवल्या.
एकजिनसी मिश्रण ते भोवताली वाटले.
आसवं डोळ्यात आणत त्यांनी चवीनं चाखले.
प्रेमळ माणसं ती, मनभरुन वाटून खाल्लं.
माझंच दुःख माझ्यासाठीच नाही उरलं.
भरलेलं पातेलं चाटूनपुसुन लख्ख केलं.
परतफेड म्हणुन, प्रेमानं पुन्हा भरुन दिलं.
मला आश्चर्य वाटलं, ते कोणीच गंभीर नव्हते.
तृप्त समाधानी असल्यासारखे सगळेच हसत होते.
आयला हे तर मॅटरच उलटं झालं.
मला अपेक्षित होतं एक आणि भलतच काही घडलं.
म्हटलं अरे हसताय काय? तुम्ही रडावं म्हणुन मी दुःखी कविता केली.
त्यावर अजुनच हसत ते म्हणाले, "अरे त्या कवितेची आम्ही कधीच कत्तल केली."
दुःखी होणं आमच्या स्वभावात बसत नाही.
कोणी झालेलं आपल्याला बघवत नाही.
दुःखपण सालं दुःखी, सगळेच त्याची हेटाळणी करतात.
दुःखालापण आम्ही गोंजारतो, मग तीपण खुदकन हसतात.
आता दुःखच जर हसलं, तर आम्ही का बरं रडावं???
हसावं आणि हसवावं, असंच आपण जगावं...


आपला,
(कातिल) सौरभ

द्रविडी प्राणायाम - इतिश्री

09 November 2010 वेळ: Tuesday, November 09, 2010
तशी मला माचाफुकोने द्रविडी प्राणायामसाठी प्रस्तावना लिहायला सांगितली होती. ते काही आपल्याला झेपलं नाही. पण हो, ह्या प्रावासाची सांगता मात्र करतोय. कराविच लागणार. कारणच तसं आहे. द्रविडी प्राणायामच्या आठही भागांवर तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया मनाला खुप उभारी देणाऱ्या आहेत. पण तुमच्या प्रतिक्रियांना परत प्रतिक्रिया दिली नाही. कारण, सांगण्यासारखं बरंच आहे.

तुम्हा सर्वांना एवढं नक्की समजलं असेल की द्रविडी प्राणायामातील पुर्ण प्रवास खरा घडलेला प्रसंग आहे. पण तरी मी काही गोष्टी औपचारीक रित्या इकडे जाहिर करु ईच्छितो -
१) हो, द्रविडी प्राणायाम, हा एक घडलेला १००% अस्सल, खर्राखुर्रा आणि कोणतीही अतिशयोक्ती नसलेला प्रवास आहे. उगीच मेंदूचे तंतू ताणून, शब्दांचे बुडबुडे सोडुन, विचारांचे पंख, कल्पनेतले रंग.... ब्ला ब्ला ब्ला... (विसरलो, काय म्हणायच होतं ते...) तर असलं काही केलं नाहीये.
२) हा प्रवास मी केलेला नाही.
३) "हे आठही भाग मी लिहले नाहित."

बरं, मग तरी हे सर्व प्रवास वर्णन माझ्या ब्लॉगवर का? ब्लॉगवरच ट्रॅफिक वाढवायला तर नक्किच नाही. (मोठ्ठा नाही. नाहीतला "ना" आणि "ही" जितके जास्त खेचता येतिल तितके खेचा.) खेचलं??? बास आता.
पण प्रतिक्रियांमधे तुम्ही माझं/माझ्या लिखाणाचं जे कौतुक केलं ते वाचुन ज्याम मजा आली. मलापण आणि माचाफुकोलापण. तुमच्या ह्या सर्व कौतुकांचा माचाफुको एक(लो)टा हकदार आहे. आणि त्याच्यापर्यंत तुमच्या सर्व भावना पोचल्या आहेत. मधे मी होतो, पण हरकत नाही. तेवढंच माझं वजन वाढलं. (गणित सोप्पय - कौतुक केलं -> मुठभर मांस वाढलं -> वजन वाढलं, पुढल्यावेळी एवढं स्पष्टीकरण देणार नाही, टायपायला बोर होतं.)

तर.... (विषय भरकटलाय!!!)

अच्छा... तर मग हे सगळं प्रवास वर्णन माझ्या ब्लॉगवर का?? आणि तेपण "माचाफुको" अश्या सतरंगी नावाने का??? ह्याचं कारण असं आहे की, माचाफुको जरा लहरी आहे. कधी काय हुक्की येईल भरोसा नाय. चॅटींग करताना एकदा सहज म्हणाला, एक फ्रिक ट्रिप मारायचीये. मीपण, करतोय्स, कर; म्हणुन नमो नमो केलं. आता शक्यतो (इतर)कोणी असा आगाऊपणा करतं तेव्हा आम्ही आगीत तेल घालतो. उगीच मग समोरच्याला उपसवतो. पुढे त्याच्या होणाऱ्या फजितीचा फुकट तमाशा बघायला मिळतो. पण माचाफुकोची बात निराळी आहे. हा पठ्ठ्या असं बोल्ला म्हणजे आज ना उद्या हा ८-१० दिवसांसाठी गायब होणारच हे नक्की. त्याच्या हाव (कोकणी हो)ला हाव केलं खरं, पण साला काळजीभी वाटली. नंतर एकदा दुसऱ्या मित्राशी बोलताना तो सहज म्हणाला, "अरे, माचाफुको चाल्लाय बॅंगलोरला प्रोजेक्टसाठी." (मी - ह्यॅह्यॅह्यॅ) नंतर दोनतीन दिवसात अजुन एक मित्र बोल्ला, "माचाफुकोने फोन केलेला. प्रोजेक्टसाठी बॅंगलोरला पोचलाय म्हणुन निरोप द्यायला सांगितलय तुला." (मी भौचक्का!!! पोचलापण!!!! च्याsssमायला!!!)

त्यानंतर काही दिवसांनी माचाफुको ऑनलाईन भेटला. "नेटकॅफे (तेच नेटकॅफे जिकडे त्याने "तोलमोल" केलेली) मे है! फोटोका बॅकअप ले रा!! एक बॅच भेजता..." आणि मग त्याने एकदोन किस्से असे ऐकवले, १५०० वरुन एकदम १०० रुपयात कलामंडलममधे झालेली पुर्ण व्यवस्था, (कढईतुन काढलेल्या ताज्या गर्रम जिलेबीसारखे)कथकलीचे फोटो, राजर्षी, मल्लू फिल्म शुटिंग... बॉस्स... माझ्या डोक्यावरचे सगळे केस उद्गारवाचक चिन्हासारखे उभे!!! व्वेड व्वेड व्वेड!!! मी बसल्याबसल्या टुणटुणत होतो. म्हंटल, गड्या... तु हिट्ट हैस!!! हे नुसतं बघुन जर मीच एवढा excite झालोय तर मग बाकीच्यांनापण नक्कीच धमाल येईल. त्याच्याकडुन प्रत्येक दिवसाच्या नोंदी मागवल्या. सांगितलं टाक ब्लॉगवर. पण आता आली का पंचाईत. जर हे द्रविडी प्राणायाम नामक माचाफुको महात्म्य त्याच्या घरच्यांना कळालं, तर गेम ना भाय!!! लफडा फुल्टू!!! पण आपल्याला किस्सा तर ऐकवायचाय. तो फिर अपना ब्लॉग कायको है??? छापो इधरिच!!! तेबी "माचाफुको" टोपणनाव लगाके. छाप्या ना मग लगेच आपनने आक्खी सिरीज. डरता क्या?!

तो ये बात थी, ती सिरीज इकडे टाकायची "माचाफुको" म्हणुन. असो, अजुन एक. तुम्ही विचार करत असाल (नसाल तर करा, आणि नाही केलात तरी मी सांगणार) "माचाफुको" म्हणजे नक्की काय??? तर "माचाफुको" हा "स्वाहिली" भाषेतला एक शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो "CHAOS" (आमचे समानार्थी शब्द: कल्लोळ, त्राहीत्राही, आग आग आग, हैदोस). तर पठ्ठ्याच्या व्यक्तिमत्वाला हा शब्द अगदी चपखल बसतो. म्हणुन "माचाफुको" ह्या टोपणनावाने सदर लिखाण.

(कारणे, संदर्भासहित स्पष्टीकरणं देऊन झाली... च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव... हेपण करुन झालं!!! हम्म्म... तर आता तुमच्या प्रतिक्रियांना प्रतिक्रिया)

राजीव, अनघा, श्रीराज, अपर्णा, आनंद, विद्याधर, हेरंब, Panda, पंकज, रोहन, गौरव - खुप खुप खुप आभार. (खरं तर हे अश्या पद्धतिने आभार मानणं आम्हाला आवडत नाही आणि पटतही नाही. तुमच्या प्रतिक्रिया इतक्या दिल-से आहेत की वाचल्यावर तुम्हाला एक जादू की झप्पी, जोरदार HI5 किंवा कड्डक टाळी द्यावीशी वाटत्ये.)

तुम्ही "माझं" जे कौतुक केलं, ते पाहुन आम्हाला जाम हसू येत होतं. मला खरतर कसंबसं होत होतं. पण म्हटल ठिकाय चालू दे ना जे चाल्लय ते. मलापण वजन वाढवायचंच होतं. (वरचं समीकरण आठवा)

राजीवजी, द्रविडी प्राणायाम वाचुन तुम्ही माझ्या बुद्धीच्या, व्यक्तिमत्वाच्या, लिखाणाच्या प्रेमात पडलात. तुम्हाला "माझ्या"बाबत निराश केल्याबद्दल माफी. मी आधीच वॉर्न (शेन वॉर्न नव्हे) केलेलं. पण तुमचे प्रेम माचाफुकोपर्यंत पोचते झाले आहे. आणि ते द्वाड कार्ट हैच लई प्रेम करण्यासारखं.
अनघा मॅडम, हा हा हा!!! तुम्ही खुप guesses केलेत. पण ते चुकले. :P ;D कन्याकुमारीला नक्की जाऊन या. भारताच्या टोकाशी उभे राहुन तिन समुद्रांचा संगम आणि तिथल्या भिन्न रंगछटा पहाणे, "स्वामी विवेकानंद रॉक" हे दैवी अनुभव आहे.
आनंद, अरे है किधर??? खरंय, करायला आत्मविश्वास लागतो, पण त्याहुन जास्त एक वेड असावं लागतं. :D
अपर्णा, मला खात्री आहे हा (खयाली)पुलाव तुला नक्की आवडला असेल. ;)
हेरंब, दिवसभरात ज्या घटना घडल्या त्यांच्या नोंदी प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केला. म्हणुन काही लेख मोठे, काही छोटे झालेत. आणि रांचो आणि फुन्सुख वांगडूचं जसं होतं तसं माचाफुको आणि सौरभबद्दल नाहीये. :P (हेहेहे)
बाबा THE PROPHET, (ह्हिहॉहॉहॉ) खरी आयडेंटिटी नाही डिस्क्लोज करु शकत.
श्रीराज, (ख्यॅख्यॅख्यॅ) तुनेभी अंधेरेमें काफी तीर चलाये. पण एकसुद्धा निशाण्यावर नाही लागला.
Panda, तु माझा blog बऱ्यापैकी follow करतोस, आणि तु ह्यावर पहिल्यांदा खास प्रतिक्रिया दिलीस. छान वाटलं. :D
गौरव, हा धाडसी धुरंधर जो कोणी आहे तो "माचाफुको"च.
पंकज (पंकज म्हंटल की मला सिंपु सिंगचा Ask the Pankazz आठवतो.) अरे, तु कॅमेरा फेकणार असशील तर हवं तर आमच्या तोंडावर फेकुन मार. सोबत त्याच्या लेन्सेस/किट तेपण फेकुन मार. आम्ही आनंदाने हा मार सोसुन त्याचा स्विकार करु.
रोहन, (पुन्हा हिहॉहॉहॉ) माझ्यामते आता बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळाली असतिल तुला. आणि हो, प्रवास १० तारखेच्या आधी संपवलाय रे. :D :D

आता जाता जाता (माहितीये बरंच लिहलय, पण हत्ती गेला नी शेपुट राहिलं असं व्हायला नको म्हणुन)... मला ह्या प्रवासाबद्दल काय वाटतं ते...

माचाफुकोशी बोलताबोलता तो एकदा सहज म्हणाला, (पाचव्या दिवसाची शेवटची ओळ >>) आयुष्यात काहीही घडू शकतं! आपलं नेहमीचं कवच सोडून थोडं बाहेर पडलो काय आणि काय काय भारी अनुभव आलेत!

ह्या वाक्याने एक जादूची कांडी फिरवल्यासारखी वाटत्ये मला. आपणच आपल्या भोवती जे कुंपण घालुन ठेवलय ते भेदण्याची ताकद आल्यासारखं वाटतय. हे कवच फोडुन, चौकट मोडुन, उंबरठा ओलांडुन, कोषातुन (काहीही असो) बाहेर येणं गरजेच आहे. काहीतरी भारी अनुभवण्यासाठी नसलं तरी खुप काही शिकण्यासाठी. आता हे भेदणं काही कठीण आहे का?? माचाफुकोने जे केलं ते काही विक्षिप्त आहे का?? नक्कीच नाही. पण नेहमीच्या साच्याबाहेरच आहे. ह्हा, प्रवासाची गोष्ट निघालेली तेव्हा तो मला म्हणालेला, मी जे करतोय त्याचं outcome काय असेल माहित नाही. कदाचित खुप रोमांचक अनुभव असेल किंवा खतरनाक. पण जे काही असेल ते अविस्मरणीय असेल. (महेश कोठारेसारखं उजवी मुठ डाव्या तळव्यावर मारत) Damn it!!! आपल्याला हा साचाच मोडता येत नाही राव. आणि आपली उगीचच लाईफच्या बाबतीत कोल्हेकुई चालु असते. मोडा तिच्यायला तो साचा. ओय ओय ओय... मोडण्यापुर्वी आवरा!!! साचा मोडा म्हणजे एकदम पिसाटलेल्या कुत्र्यासारखं काही सद्सद्सौरभबुद्धीला (नेहमी विवेकला कशाला भाव द्यायचा???) सोडुन अनैतिक/बेकायदेशिर करु नका रे!!! च्यायला पोलिस मला घेतिल रिमांडमधे.

असो, माचाफुकोचं आपल्याला भारी कौतुक आहे. त्याच्याबद्दल किती नी काय बोलावं. आपल्याकडुन एक प्रेमळ गळाभेट आणि त्याच्या रुतब्याला सलाम !!!

आपला,
(माचाफुकोलेला) सौरभ

द्रविडी प्राणायाम - दिवस आठवा

07 November 2010 वेळ: Sunday, November 07, 2010
ऑक्टोबर १९:

पहाटे ०५:३० ची कन्याकुमारी - मुंबई मध्ये स्वार झालो. मनाप्रमाणे ट्रिप झाली होती. तिकीट काढल्यानंतर माझ्याकडे १५० रुपये उरले होते. आता मी २१ तारखेच्या ००:४० ला पुण्याला पोह्चीन. ४३ तास ट्रेनमध्ये काढायचे होते. पूर्ण प्रवासात वाचायला एकपण पुस्तक सोबतीला नसल्याने, मग आजूबाजूच्या प्रवाश्यांशी गप्पा मारून वेळ काढणे हा एक उपाय होता. गेले काही दिवस अगदी मनात येईल तसा फिरत होतो, ज्या क्षणाला जे वाटेल ते करून बघितलं. हेच मी एका planned trip वर आलो असतो, सगळा प्रवास आखलेला असता, तर ना मला राजर्षी सारखा माणूस भेटला असता, ना असला अनुभव घेता आला असता.

संध्याकाळपर्यंत pantry boy पासून ते प्रवाश्यांशी ओळख झाली होती. गप्पा रंगल्या कि मग वेळ कसा जातो ते समजत नाही. अधेमधे मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली असतांना "दारू - सिगरेट" black मध्ये आणून देणारे लोकंपण येत! इकडे रेल्वेकडून २०० रुपये दंड आहे, अन दुसरीकडे मला कोल्ड्रिंक घ्यावी तशी दारू मिळतेय! वाह आपल्या देशात काहीही होऊ शकतं.

ट्रेनमधे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक भेटतात, एक सह-प्रवाशी समाज कार्यकर्ते होते, त्यांच्याशी खूप विषयांबद्दल चर्चा झाली. एक डॉक्टर होता, खूप सिरीयस प्राणी होता तो. एक बँकर होते, हसमुख अगदी. एक आपल्या मुलाकडे जाणारी आजी. ह्या पूर्ण प्रवासात आम्ही सगळे गोवले गेलो होतो.

पुण्याहून निघताना मला कसलीच कल्पना नव्हती. कसे लोक भेटतील, काय होईल, या सर्व पैलूंकडे थोडं दुर्लक्ष केलं, तरी सेल्फ डिफेन्ससाठी एक कस्टम-मेड चाकू घेतला होता, पण त्याचं काम कधीच पडलं नाही. प्रवासात लुटण्याचे किस्से बरेच ऐकिवात येतात, त्यात एखादं शस्त्र असलं तर आधार मिळतो. सुदैवाने फिरणं सुरळीत झालं. कुठे कोणी ठग भेटला नाही, म्हणून केरळ आणि कन्याकुमारीच्या गोड आठवणी घेऊन मी आता माझ्या परतीच्या प्रवासावर होतो.

सगळे योग अगदी जुळून आल्यासारखे होते. "When you want something, all the universe conspires in helping you to achieve it." (आयुष्यात मी बऱ्याचदा ह्या Alchemistच्या वाक्याशी स्वतःला relate केलंय, त्यातलीच हि अजून एक वेळ.) बरंच अंतर मला माझी डेस्टिनी (का destination म्हणू?) माहित नव्हती, तिसऱ्या दिवशी कुठे माझा रूट निश्चित झाला. (हे तर अगदी माझ्या करियर सारखंच वाटतंय!) असो, आता ह्या ट्रेनच्या डब्यात मला माझ्या आजूबाजूचे काय बोलतायत काही कळत नाहीये. त्यामुळे जरी शोर-गुल्ला होता, मला शांतपणे तंद्री लाऊन बसता आलं. बॉस तंद्री लाऊन तासानतास बसण्यात काय मजा असते. बरेच महिने झाले, कधी शांत बसून मेंदूचं defragmentation केलं नाही. हळूच जाणीव झाली, अश्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. राहून गेलेल्या गोष्टींची लिस्ट नकळत वाढत असते, आणि मग जेव्हा त्यातलं काही करणं अगदी अशक्य होतं तेव्हा आपण त्याचे खयाली पुलाव बनवतो!

प्रवासाचे शेवटचे काही तास तर काही केल्या सरकत नव्हते. अखेरीस हा प्रवास संपला. ट्रेन मध्ये काढलेल्या ४३ तासात मी बरीच धूळ खाल्ली होती. आता रूमवर जाऊन बढीया गरम पाण्याने अंघोळ करावी, आणि आपल्या ह्या ट्रीपची victory साजरी करत एखादी सिगरेट पेटवावी! साधारण तासाभरांनी मी निवांत पडून झुरके घेत होतो.

हा पोस्ट द्रविडी प्राणायाम सिरीज मधला शेवटचा पोस्ट. बऱ्याच गोष्टी अनुभवल्या, पण सगळंच काही उमटतं असं नाही. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून मलापण लिहण्याचा चेव चढला! बऱ्याच जणांना हि ट्रिप एक वेडेपण वाटेल. काही असो, मलातर असल्या ट्रिप पुन्हा पुन्हा मारायचा चस्का लागणार आहे.

Veendum kaanaam !!

आपला,
(मार्गस्थ) माचाफुको

द्रविडी प्राणायाम - दिवस सातवा

06 November 2010 वेळ: Saturday, November 06, 2010
ऑक्टोबर १८:

पहाटे साडे-चार वाजता गजर वाजला. सवयी प्रमाणे स्नूझ न करता उठून तयार झालो, सूर्योदय व्हायच्या आधीच पोहचून मला सुबक जागा मिळवायची होती.

कॅमेरा आदल्या रात्रीच सज्ज करून ठेवला होता. सूर्योदय पाहण्यासाठी खूप गर्दी लोटली होती. एका मेक्सिकन फोटोग्राफरने आपली किट सरकवून मला जागा बनवून दिली. मग एक एक क्षण टिपण्याचा कार्यक्रम सुरु केला. सूर्य अजून उगवायचा होता, पण रंगांचा खेळ सुरु झाला होता. आता कॅमेरा आपली कामगिरी अगदी चोखपणे बजावत होता. हळू हळू माझं लक्ष गर्दीतल्या लोकांकडे जाऊ लागलं. कुणी सहस्त्र सुर्यानाम म्हणण्यात गुंग होतं, तर कोणी सूर्यस्तोत्र. माहोल तयार झाला होता, चीफ गेस्ट सूर्याची सगळेच वाट बघत होते, आणि तोच समुद्राच्या लाटांवर खेळणारी त्याची पहिली किरणं दिसली! माझ्या शेजारी असलेलं म्हातारं जोडपं आनंदात टाळ्या वाजवत होतं. एखाददोन शिट्ट्या पण पडल्या! वाह काय नजारा होता! मी पण मग उल्हासित होऊन अजून जोमाने फोटो काढू लागलो. तुम्हाला सांगतो, ह्या पूर्वी अनेकदा डोंगरदऱ्यांमधून सूर्योदय पहिला होता, पण ह्या सूर्योदयची काही वेगळीच मजा होती. काय माहोल जमला होता. वातावरणात जल्लोष पिकलेला, भारताने क्रिकेट विश्वकरंडक जिंकावा असा जल्लोष! मी पण मग रपारप्प फोटो काढून सूर्याला चिअर-अप केलं.



इकडे लोक सूर्याला ओंजळीत घेतल्याचा आभास करून देणारे फोटो, फोटोग्राफरकडून काढून घेत होते. एकाने मला विचारलं एक फोटो का कितना म्हणून. हसून त्याला मी इकडे सूर्योदयाचे फोटो काढायला अलोये सांगून पुन्हा एकदा कॅमेरामधून बघू लागलो. "भाईसाब, क्या आप हमारा फोटो निकाल के देंगे?",पुन्हा तोच माणूस. च्याआयला इकडे सूर्योदय सोडून ह्याच्या परिवाराचे कसले फोटो काढू, शॉट आहे हा माणूस. मी तिकडून कल्टी मारून दुसरीकडे गेलो.

मनसोक्त फोटो काढून आता, मी परत निघालो. इकडे कोळ्यांच्या होड्या येत होत्या. पकडलेले मासे आणून समोर मांडायचे, आणि त्यावर मग बोली लागे. इथे बांगडा - आयला या नावाने ओळखल्या जातो, आणि सुरमईला सिला म्हणतात. मास्याला, मीन म्हणतात. इकडे मीनचा सौदा होत असतांना, मीपण काही फोटो घेतले. कोळ्याचे हावभाव खुशाल होते, आज चांगली किंमत मिळत असावी त्याला. बघता बघता एक एक क्रेट विकला जात होता. आपल्या डायरीत नोंद करून ठेवणारा चीफ कोळी खूपच गडबडीत होता. त्या गजबजाटात मी संपूर्णपणे दुर्लक्षित होतो. कोणी कॅमेरा कॉन्शियास नसल्याने, मनाप्रमाणे portraits मिळाले.


आता निवांत कुठे बसून सूर्योदयाचे फोटो बघावे, आणि कॉफीची एक चाष्नी मारावी! मग बसस्थानकाचा रस्ता पकडून, आवडेल अशी जागा शोधू लागलो. वाटेत थोड्या थोड्या अंतरावर एखादा विक्रेता येऊन मला त्याच्या जवळचा माल दाखवायचा. त्यात एकाने मला गाठलं आणि मोत्याची माळ दाखवली. मग खिश्यातून लायटर काढून, मोतीला लायटरच्या आचे वर ठेऊन दाखवू लागला. "साहब, एकदम ओरीजनल हैं. बहोत बढीया गिफ्ट आयटेम बनेगा. ३०० रुपये में लो|" प्रेमाने त्याला सांगितला, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. मग त्याने उतरता पाढा सुरु केला. मी पुढे चालत होतो, आणि तो माझ्या मागे. शेवटी त्याची गाडी ५० रुपये वर येऊन थांबली! "इससे कम नाही होगा|" "भाई ५० रुपये में मेरा २ वक्त का खान होता हैं. छोडो यार|" त्याला पण अंदाज आला कि त्याच्या समोरचा किती लुक्खा आहे म्हणून.

समुद्राचा नजरा घेत कॉफी संपवली. इकडची वाळू विविध रंगांची आहे, हे इथला एक वैशिष्ट्य आहे. हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरची रेती या ठिकाणी एकत्र येते. इथे सोनेरी, पांढरी आणि काळी वाळू बघायला मिळते. बऱ्याच कथापण आहेत ह्याबद्दल. आपल्या देशाच्या अगदी टोकावर उभे राहण्याचा अनुभव; एक मजेशीर होता. मग पुन्हा एकदा जेट्टी पकडून विवेकानंद रॉक्सवर गेलो. तशी गर्दी असल्याने, माझा थोडा मूड ऑफ झाला होता. कलकलाट आणि गोंधळ काही मन रमू देत नव्हते. इकडे फोटो काढण्याऐवजी मी फक्त डोळे मिटून शांती अनुभवायचा प्रयत्न करत होतो. त्या एक दीड तासाच्या बैठकीत मला ५-१० मिनिटे शांत वाटलं असेल. पण त्यात एक औरच मजा होती!

विवेकानंद केंद्रात परत जातांना इथली एक आठवण म्हणून एक लुंगी घेतली. आता पुढचा दिवस लुंगी नेसून फिरायची इच्छा होती. दुकानदाराने ५० रुपये किंमत सांगितली. सकाळच्या मोतीवाल्याच्या अनुभवावरून मी त्याच्याशी २५ वर घासाघीशी केली. शेवटी ३० रुपयात त्याने द्यायची ठरवली. (परत गेल्यावर मी तुळशी बागेत यशस्वी रित्या भाव करून दाखवणार आहे.) विवेकानंद केंद्राच्या खानावळीत जेऊन मग केंद्राचा फेरफटका मारायला निघालो. विवेकानंद केंद्रात लुंगी नेसून फिरत होतो. आतून एक रस्ता सूर्योदय बघण्याच्या ठिकाणी जात होता. वाटेत मोर स्वच्छंदपणे फिरत होते. एखादं मोरपीस मिळतं का म्हणून नजर फिरवली, पण समोर पसरलेल्या समुद्राकडे लक्ष गेल्यावर मोरपीस नव्हतच पण पूर्ण इलाक्यात माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. समुद्राच्या लाटांच्या आवाजावर आता मी लय पकडली होती. शांत बसून सुमुद्राकडे बघत बसलो होतो. हलकेच पसरलेल्या ढगांनी आपली सावली पाडली होती. भर दुपारीपण इथे मला रम्य वाटत होतं. दुपारचे ४ वाजे पर्यंत इकडेच बसून होतो. एका चिलटाने वळून बघितला नाही. वाह!




संध्याकाळी सूर्यास्त बघायला, बस स्थानकापासून ३-४ किलोमीटर पुढे आलो. बरेच फोटो घेतले. पुन्हा एकदा रंगांच्या खेळात सुर्यानेच बाजी मारली. या सामन्यात मी इतका गुंग झालो होतो, कि मला परत जाण्यासाठी काही साधन मिळेना. ३-४ किलोमीटर तसं फार मोठं अंतर नाही, पण आता पायपिट करायचा मलाच कांटाळा आला होता. तितक्यात, बसस्थानकाच्या दिशेने जाणारी एक दुचाकी येतांना दिसली. मी लिफ्ट मागितली. गाडी थांबली, आयला लई दिवसांनी लुना बघितली! साला पण माझा वजन झेपेल का तिला? मी ८० किलो अन् चालवणारा ६०एक किलोचा असेल. त्याला माझी शंका विचारली, तर नुसता हसला! तसा रस्ताच उतार होता; म्हणून माझा वजन potential म्हणून तिकडे कामी आलं! उद्या सकाळी साडे-पाच वाजताची जयंती एक्स्प्रेस पकडून पुण्याला रवाना व्हायचा प्लान होता.

आपला,
(पांथस्त) माचाफुको

द्रविडी प्राणायाम - दिवस सहावा

04 November 2010 वेळ: Thursday, November 04, 2010
ऑक्टोबर १७:

सकाळी उठलो, आणि एक मिनिट मी कुठे आहे असा प्रश्न पडला! कालचा कमालीचा दिवस आठवला आणि मग खिडकीतून बाहेर बघितलं. रस्ते ओले दिसत होते. मग राजर्षीला हाक़ मारून उठवलं, पाऊस ऐकून तो पण बिछान्यातून तड्कान्न उठला. टी.वी लावला, नीओ स्पोर्ट्सची anchor अर्चना आपली बेछूट अदाकारी बरसवत होती.
"They say the weather in kerala is like the marriage of the fox. You never know what will happen next."
थोड्याच वेळात सामना रद्द केल्याची बातमी राजर्षीला फोनवर मिळाली.


रद्द झालेल्या सामन्याचे फोटो काय काढायचे, म्हणून मग मी कन्याकुमारीला जायचा प्लान केला. पुन्हा एकदा 'गरीब-रथात' स्वार होऊन कन्याकुमारीकडे कूच करू लागलो. हा साधारण ५-६ तासाचा प्रवास होता. ११:०० वाजताची ट्रेन पकडली तर निश्चित्त सूर्यास्ताचे फोटो काढता येतील. पण बंगलोर-कन्याकुमारी 'एक्स्प्रेस'ने माझ्या गणिताचा पार चुथडा केला. ट्रेन मध्ये जॉर्जशी ओळख झाली. कन्याकुमारीला पोहचेस्तोवर सूर्यास्त होऊन गेला होता.

या प्रदेशात नैसर्गिक सौंदर्य मोकळ्या हाताने रंगवलं होतं!


मग राहण्यासाठी मी स्वस्तं जागेचा शोध घेत होतो. इकडे नक्की रामकृष्ण मठ असेल. मला तिकडे राहता येईल.चौकशी केल्यावर मला विवेकानंद केंद्राचा पत्ता सांगितला. तिकडे राहण्याची सोय आहे, ते सर्वात स्वच्छ आणि स्वस्त accommodation आहे. विवेकानंद केंद्रात सिंगल रूम उपलब्ध नसल्याने, मला एक ३ बेड्सची रूम घ्यावी लागली. तरी रूमचं भाडं ४५ रुपये होतं! बाहेर लॉज मध्ये किमान २५० रुपये घेतात. पूर्ण वेळ मी जॉर्जला माझ्या सोबत फिरवत होतो! त्याला पण मजा येत होती. त्याने विवेकानंद केंद्रात खोली मिळाल्यावर निरोप घेतला. तो पण कन्याकुमारीला राहणार होता, पण अचानक त्याने परत जायचा निर्णय घेतला. नेमकं काय घोळत होतं त्याच्या मनात देव जाणे. आजचा दिवस प्रवासातच वाया गेला, रात्री विवेकानंद केंद्राच्या उपहारगृहात जेवण करून मग समुद्र किनाऱ्यावर गेलो. अगदी तुरळक गर्दी होती, छान थंड वारा वाहत होता. रोशणाई मुळे रात्रीच्या वेळी विवेकानंद स्मारक आकर्षक दिसत होतं. मग काही फोटो काढून, सूर्योदय बघण्यासाठी योग्य जागेचा शोध घेतला. उद्या सकाळी लवकर उठून सूर्योदय बघायचा आहे!



आपला,
(फिरता) माचाफुको

द्रविडी प्राणायाम - दिवस पाचवा

02 November 2010 वेळ: Tuesday, November 02, 2010
१६ ऑक्टोबर:

सकाळी उठलो, तेव्हा फक्त कोची आणि तिथल्या चायनीज फिशिंग नेट्स बघणे हा प्लान होता. ह्या पुढे काहीच अपेक्षित नव्हतं. कधी कधी unplanned ट्रीप मध्ये कायच्या काय मजा येते! त्यातलाच हा एक दिवस. A day full of surprises!

Shornur(शोर्नुर)च्या बसची वाट पाहत असतांना बिडी मारायची तलफ आली. शेजारी उभ्या म्हाताऱ्याला एक बिडी मागितली. (मी किती निर्लज्ज झालोय आता!!) बिडी शिलगावून, पावसाने ओल्या परिसरात हलकेच पसरणाऱ्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत झुरके घेत होतो. बिडी संपत आली, तोच त्रिचूरला जाणारी बस आली. पुन्हा एकदा त्रिचूर स्टेशन, तोच फलाट. एर्नाकुलमचं तिकीट काढून फलाटावर म्हाताऱ्या बाबाला शोधू लागलो. आज कुठे दिसला नाही. ट्रेन आली, पुन्हा एकदा जनरल डबा झिंदाबाद!

ट्रेन मध्ये, चायनीज फिशिंग नेट्स कुठे बघायला मिळतील हि माहिती मिळवली. फोटोज काढायला संध्याकाळची वेळ चांगली असेल, म्हणून मग दिवसभर बघण्यासारख्या गोष्टींची थोडी माहिती मिळवली. मग ठरवलं आधी खादाडी, त्यानंतर मग broadway (हो इकडे पण एक broadway आहे!) फिरायचा, जवळपास असलेली मसाल्यांची दुकानं बघावी आणि मग मरीन ड्राईव (हो, ते हि आहे कोचीमध्ये). तिथून मग पुढे फोर्ट कोचीला जाऊन चायनीज फिशिंग नेट्स बघू, वास्को द गामाचं घर पाहून मग रात्री त्रिवेंद्रमला निघू. म्हणजे आज रात्री राहण्याचा खर्च वाचेल. रात्री ट्रेन मधेच झोपता येईल. एर्नाकुलम (कोची) स्टेशनवरून बाहेर पडलो. इकडे मात्र सडकांवर पुन्हा एकदा गर्दी, गोंधळ, आणि अस्वच्छतेचा प्रत्यय आला. वाटेत, एक नेट-कॅफे दिसलं. त्याच्याकडून फोटोजचा back-up घेतला. DVD write करायच्या किमतीवर घसाघीशी केली. मला DVD च्या किमतीत, DVD writeपण करून मिळाली! (आयुष्यात कधी मी नेट-कॅफे वर तोलमोल करीन हे वाटलं नाही.)

इकडे मलबारी बिर्याणी चांगली मिळते म्हणून ऐकिवात आलं. मग एक बिर्याणी हाणून, पुढे 'मेनका'ला जाणारी बस पकडली. आज इथल्या Jawaharlal Nehru Stadiumवर इंडिया-ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना आहे! गर्दीचं हे हि एक कारण असावं. Broadway म्हणजे पुण्याचा लक्ष्मी रोड म्हणता येईल. वेगवेगळ्या गोष्टी विकणारी दुकानं होती. मसाल्यांचे डोंगर रचून ठेवले होते. एका दोघांनी मला पत्रकार समजून आपल्या दुकानात असलेल्या प्रत्येक मसाल्याची ओळख दिली!

आज हवेत उकाडा जाणवत होता. थोड्या वेळात मरीन ड्राईववर एक चक्कर मारली. आतापर्यंत गर्दीमुळे फोटो काढण्यात ती मजा येत नव्हती. मग जास्ती वेळ खर्च न करता फोर्ट कोचीला जायचं ठरवलं. फोर्टवर जाण्यासाठी मरीन ड्राईव वरून एक जेट्टी जाते. फोर्ट कोचीला पोहचण्याचा हा सर्वात स्वस्त आणि कमी वेळ घेणारा रस्ता आहे. अडीच रुपयांचं तिकीट काढून जेट्टी कुठल्या दिशेला जाईल ह्याचा अंदाज घेतला. म्हणजे मी डाव्या बाजूला थांबलो, तर सूर्यप्रकाशामुळे फोटो ओव्हरएक्स्पोज नाही होणार. जेट्टीतून जातांना पूर्वेकडचे shipyards बघत, पुढे सरकत होतो. आकाशात ढगांचे पुंजके तरंगत होते. पुढे चायनीज फिशिंग नेट्सचे मनसोक्त फोटो काढून, तिरुअनंतपुरामला जाण्याची आकडेमोड करू लागलो. तिथून पुढे कन्याकुमारीला जाईन म्हणतो. "Kanyakumari shall be the last destination on this trip!"



Vasco da Gama चं घर


फोर्ट कोचीमधील रस्ते
इकडून कोची स्कायलाईन फार सुरेख दिसत होती! फोर्ट कोचीने पुन्हा एकदा गोव्याची आठवण करून दिली! स्ट्रीट फोटोग्राफी करतांना, मागून एकाने मला थोडं बाजू व्हायला सांगितलं. कदाचित मी त्याच्या फ्रेममध्ये येत होतो. मग आमचं बोलणं सुरु झालं. त्याचं नाव राजर्षी आहे. तो एक बंगाली वृत्तपत्राचा पत्रकार होता. इंडिया-ऑस्ट्रेलिया सामना कव्हर करायला आला होता. मला आता फोटो काढायला company मिळाली होती. राजर्षीने आदल्या दिवशी हा इलाका बघून ठेवला होता. गप्पा मारत मारत फोटो काढणं सुरु होतंच. भरपूर फोटो काढले. सूर्यास्ताचे फोटो काढून आम्ही Vasco da Gamaच्या घराचे फोटो काढायला गेलो. हवेत गर्मी वाढली होती. घामाने शर्ट ओला झाला होता. राजर्षीने एकएक बियरची ऑफर दिली. त्याचा एक मित्र पुढे एका restaurant मध्ये बसला होता. वाटेत, आम्हाला एका मल्लू सिनेमाचं शूटिंग बघायला मिळालं. राजर्षी थेट शूटिंगच्या सेटवर जाऊन फोटो काढू लागला! त्याच्या गळ्यात लटकणाऱ्या त्याचा आय-डी बघून कोणी अडवलं नाही. मी पण त्यात हात साफ करून घेतला! ऍन्जेलिका नावाची कोणी नवीन हेरोईन होती. Restaurant मधे राजर्षीचा मित्र त्याची वाट बघत होता.

राजर्षी
आमची दोघांची ओळख झाली. तो मुंबईच्या DNA साठी काम करतो. १५-२० मिनटात दोघांनी पण आपली कामं उरकली. उद्याच्या पेपर मधे छापून येणारी बातमी, आज मी एक दिवस आधीच वाचली होती! मग गप्पांचा विषय माझ्या ट्रीपकडे वळला. त्यांना ह्या अनोख्या ट्रीपबद्दल सांगितल्यावर, दोघांना पण मजा आली. राजर्षीने आज रात्रीचं जेवण आणि स्टे स्पोन्सर केला! अन दुसऱ्या दिवशी असलेल्या क्रिकेट सामन्याचे फोटो काढायला यायची ऑफर!! रात्री जेवणात बढीया ब्रोस्टेड चिकन हाणलं. हॉटेल कडे जातांना Box Topsचं Letter शिट्टीवर सूर धरू लागलं. मनात "Give me a ticket for an aeroplane....", हे शब्द शिट्टीच्या सुरावर थिरकत होते!

आजची संध्याकाळ कायच्या काय होती राव. ह्या ट्रीपवर मी मल्लू शूटिंग बघायचं स्वप्नं पण बघितलं नव्हतं, ना हि राजर्षीसारख्या उदार माणसाची भेट, ना हि एक बियर, ना ब्रोस्टेड चिकन, ना क्रिकेट सामन्याचे फोटो....

आयुष्यात काहीही घडू शकतं! आपलं नेहमीचं कवच सोडून थोडं बाहेर पडलो काय आणि काय काय भारी अनुभव आलेत! वेड रे वेड.... असो मी जरा hyper excite झालोय!

आपला,
(लहरी) माचाफुको

Click here to see more images

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates