हि त्या कार्यक्रमाची सूची पत्रिका होती. |
द्रविडी प्राणायाम - दिवस चौथा
30 October 2010
वेळ:
Saturday, October 30, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
१५ ऑक्टोबर:
आज सकाळ पासून धुवाधार पाऊस सुरु आहे. तरी भटकेगिरी करायचा वेळ वाया न घालवता पुन्हा एकदा कलामंडलममध्ये घिरट्या मारत राहिलो. काहीच सोडायचं नाही! आज मला कथकली मेकअप सहित बघायचा होता. चौकशी केली, पण असा काही प्रोग्रॅम नव्हता. मग तुलसी सरांनी एक पत्ता लिहून दिला, तिकडे आज संध्याकाळी कथकली मेकअप सहित बघायला मिळेल असं सांगितलं. हा पत्ता 'पैन्कुलम' नावाच्या गावातला होता. दुपारपर्यंत पुन्हा एकदा कलामंडलमच्या कॅम्पसची सैर करून आलो.
अजूनही पाऊस पडत होता. २ बस बदलून मी पैन्कुलमला पोहचलो. मग ती पत्रिका दाखवत दाखवत मी रामचकीयार स्मारक कलापीडमला पोहचलो. बरंच रिमोट गाव आहे हे. पाऊस पडल्याने सगळंच एकदम हिरवंकंच झालं होतं. Landscapes तर नुसते वेड लावत होते. भाताचे शेत, ढगांनी भरलेलं आकाश, शेतांच्या पुढे डोंगरांची रास, उंचच उंच नारळाची आणि सुपारीची झाडं, त्यात एखाद्या शेतकऱ्याची हाळी. छोटेशे पूल, मासे पकडायला गळ टाकून बसलेली पोरं, त्यांच्यात्यांच्यातला चिवचिवाट. थोडक्यात सांगायचं म्हणजे इथे लोकांचं आयुष्य materialistic नाही. लोक त्यातल्यात्यात सुजाण आहेत. इकडच्या प्रत्येक गोष्टीत डुबलो होतो.
कलापीडम म्हणजे नाट्यगृह असेल अशी माझी संकल्पना क्षणातच विरघळली. रामचकीयार ह्यांच्या स्मारकाच्या अंगणातच एक स्टेज होता. मग थोडी ओळख देऊन मी Greenroom बघायची संमती घेतली. आत श्रुती इंद्र सर मेकअप चे रंग तयार करत बसले होते! मला बघून हालहवाल विचारले. श्रुती इंद्र सरांचं बालपण जबलपूर मध्ये गेलं होतं. हिंदी मध्ये ती छाप येत होती. मग रंग कसे बनवतात हे बघता बघता, आमचा गप्पा पण रंगत होत्या. आज कृष्ण-सुदामा भेट, या काव्यावर कथकली होणार आहे. त्याच्या आधी श्रुती इंद्र सर प्रस्तावना देणार आहे.
भरपूर फोटो काढले आहेत! दुपारचे २ वाजल्या पासून ते रात्री १० पर्यंत इथेच फोटो काढत, observations करत बसलो होतो. हॉस्टेलला परत येतांना बस नसल्याने, लिफ्ट देणाऱ्याचे आभार मानून ताणून दिली! उद्या सकाळी लवकर निघायचं आहे.
आपला,
(लहरी) माचाफुको
Click here to see more images
Posted In द्रविडी प्राणायाम | 5 प्रतिक्रिया |
द्रविडी प्राणायाम - दिवस तिसरा
28 October 2010
वेळ:
Thursday, October 28, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
१४ ऑक्टोबर: ०३:०५ त्रिचूर
उतरल्या उतरल्या "केरळ" हाक मारून, केरळच्या हवेला दिल निचोडून मिठी मारली. मग रंजीतला अलविदा केलं. ५ वाजेपर्यंत बसण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता. मुख्य फलाटावर फेऱ्या मारत होतो. स्टेशनवर तुरळक गर्दी होती. अजून डोळ्यावरची झोप पूर्ण उडाली नव्हती. एक रिकामा बाकडा दिसला. शेवटी तिकडे खांद्यावरची sac उतरवून ठेवली.
इथे मला जवळजवळ २ तास काढायचे होते. शाळेत 'रेल्वे स्टेशनवर घालवलेला एक तास' निबंध आठवला. साला, त्यावेळी काही मनात येईल ते लिहायचो, आणि मग निबंधाला नजर लागू नये म्हणून भिकाऱ्यांचा उद्धार करायचो. आज मला कोणी ह्याच विषयावर लिहायला सांगितलं - तर नक्की मी फलाटावर केस विंचरून, गुंत्याचं parachute करणाऱ्या बाईबद्दल लिहीन, आणि २ कप चहाचे पैसे लाटू बघणाऱ्या चहावाल्याने आपल्या किटलीत हळूच पाणी कसं टाकलं हे पण लिहीन. कदाचित त्यावेळी मास्तरीण बाईच्या भीतीपायी असं काही लिहिलं नसेल.
थोड्या वेळाने कंटाळून परत फलाटावर फेऱ्या मारत असतांना, एका वजन काट्याच्या आडोश्याला देह टेकून, एक गरीब म्हातारा बसलेला दिसला. जवळून जाणाऱ्यांपुढे हात पसरवत होता. आमची नजरभेट झाली. त्यांने डोळ्यांनीच मदत मागितली. खिश्याची तंगी लक्षात घेऊन त्याला आर्थिक मदत देणं; पुढे मलाच आडवं येईल. तसाच फलाटावर पावलं मोजत फिरत होतो. थोडं पुढे, कुठल्याशा ट्रेनचे reservation charts धूळ खात पडले होते. पायाने ते कोपऱ्यात सरकवले, तितक्यात मनात विचार आला, म्हाताऱ्याला पैसे नाही देऊ शकत म्हणून काय झालं. इकडे मला कोण ओळखतं? मग पुन्हा एकदा एक स्वतःबरोबरच पैज लावली. म्हाताऱ्याला पैसे मिळवून द्यायचे! मागे जाऊन काही कागद उचलले. म्हाताऱ्यापासून २ फुटावर भिंतीला टेकून बसलो. म्हाताऱ्याने पुन्हा माझ्याकडे बघितलं. मी त्याला खुणावून सांगितलं बघ आता. एका कागदावर "I NEED CHANGE" लिहलं, आणि म्हाताऱ्याला धरायला लावलं. दुसऱ्या कागदावर लिहिलं "ME TOO" आणि तो मी धरला. आता शीळ घालून लोकांचं लक्ष वेधायचं!
मी हे का करत होतो? कधी स्वप्नातही असं काही करेन असं वाटलं नव्हतं. आता एका अनोळख्या ठिकाणी, जिकडे माझी कोणालाच ओळख नाही, तिकडे मला लाज कसली? काही गोष्टींमागे काहीच कारण नसतं, पण त्या केल्याने वेगळीच मजा येते, त्यातलंच हे एक. थोड्या वेळाने माझी भीती चेपली. लोकं बघत होती. काहींनी म्हाताऱ्याच्या हातात पैसे ठेवले, काहींनी माझ्या! (कदाचित त्यांना एकच change माहित असावा.) मग ते पैसे म्हाताऱ्याच्या हातात ठेवायचो. आता गाणे काही सुचत नव्हते, पण चेव आला होता. म्हाताऱ्याला पण मजा येत असावी. थोडे पैसे जमल्यावर मी उठलो, आणि म्हाताऱ्या बरोबर हात मिळवून निरोप घेतला!
आता उजाडायला लागलं होतं. कलामंडलमची चौकशी केली. बस स्थानकाकडे जाणारा रस्ता समजून घेऊन, एक कॉफी मारून निघालो. त्रिचूरच्या रस्त्यांवर फिरतांना काही वेगळं नाही आढळलं, पण दागिन्यांच्या जाहिरातीपासून ते लुंगीच्या जाहिरातीमधे मोहनलाल(सिनेनट)ची monopoly होती! हलके ढगांचे पुंजके, पहाटेची थंड हवा आणि नवीनच शहर! North Bus Stand ला पोहचून मी पुन्हा कलामंडलमला जाणारी बस शोधू लागलो. Shornur(शोर्नुर)ला जाणारी बस कलामंडलमवरून जाते. १८ रुपयात कलामंडलम समोर बसने सोडलं. बसमधे मल्याळम FM Radio च्या गाण्यांशी गाठ पडली. ३४ किलोमीटरच्या बसप्रवासात काय बघू अन काय नको असं झालं होतं. सुंदर बसकी घरं, आजूबाजूला गर्द झाडी. सुपारीची, नारळाची झाडं; गोव्याचं हे एक non-commercial रूप म्हणता येईल. कलामंडलम येताच कंडक्टरने मला सूचित केलं. मी पण मग "नन्नी" म्हणून त्याचा निरोप घेतला.
प्रवासात संपूर्ण ५ राज्यांची धूळ खाऊन मी आता इथे कलामंडलम समोर उभा होतो, आणि हलकं व्हायची इच्छा तीव्र होत होती. कलामंडलमच्या समोरच एक दुकान वजा खानावळ - 'हॉटेल स्टेशनरी' (ह्या हॉटेलचं नाव असं का, हे काही विचारलं नाही बुवा) होतं. तिकडेच राहण्या-खाण्याची चौकशी केली. एक-दीड किलोमीटरवर एक लॉज होता. पण तो जरा माझ्या बजेटला महागडा होता. तिकडेच कलामंडलम मधे Kudiyattam (कुडियात्तम) शिकवणारे कनक कुमार भेटले. बोलतांना समजलं की आत शिक्षकांसाठी आणि कलामंडलमच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आहेत. मग थोडं गयावया करून त्या हॉस्टेल मधे राहण्याची परवानगी मिळवली. थोड्याच वेळात अंघोळ उरकून मी पुन्हा कलामंडलमच्या मेनगेटशी हजर झालो. तिथला security gaurd मला कुठल्याशा 'स्मिथा' मॅडमकडे घेऊन गेला.
मॅडमने मग माहिती दिली. "The fees for spending a day with the masters is 1000 Rs. And if you want to click photographs it will be 500 Rs." अरे बापरे, १५०० रुपये :O!!
हे तर अजिबातच जमणार नाही. तिला सरळ सांगितलं की माझ्याकडे इतके पैसे नाहीत, आणि ह्याची मला पूर्व कल्पनाही नव्हती. १५०० किलोमीटर प्रवास करून आल्यावर मी कलामंडलम बघूनच जाईन. तुम्हीच मला एखादा मार्ग सुचवा. सिक्युरिटी गार्ड तर एकदम हायपर झाला. इकडे असं काही होऊ शकत नाहीची भाषा ऐकवायला लागला. तितक्यात स्मिथा मॅडमने विचार करून सांगितलं, "Go and see the superintendent, see if he can make an exception.". मनात मी म्हंटलं, "ये हुई ना बात!" स्मिथा मॅडमचे 'नन्नी' म्हणून आभार मानले, मॅडम पण मग हसली.
Superintendentला भेटून मी परिस्थिती समजावली. त्यांना थोडं आश्चर्य वाटलं, मग कौतुकाने अख्खा कॅम्पस बघायची संमती दिली, फक्त फोटो काढण्यास १०० रुपयांची पावती फाडण्यास सांगितलं. हा आकडा आता माझ्या बजेट मधे बसत होता.
श्रुती इंद्र सर त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवतांना |
आता दुपारी मला काय हॉस्टेल मधे बसून राहण्यात रस नव्हता. Library मधे बसून या सर्व कलांची अधिक माहिती वाचावी म्हंटलं. मग मोर्चा libraryकडे वळवला. तिकडे सांगण्यात आलं की पर्यटकांना library चा वापर नाही करता येत. ह्या वेळी Registrarची भेट घेतली. त्यांना इकडे येण्याच्या हेतूपासून सर्व सांगितलं, मग मुद्द्याकडे वळून त्यांना विनंती केली. त्यांनी पण संमती दिली. कार्यालयाच्या बाहेर आलो, अन भुकेची जाणीव झाली. कलामंडलमच्या कॅन्टीन मधे गेलो, तर ते बंद झालं होतं. मग सकाळच्या 'हॉटेल स्टेशनरी' वर येऊन पोहचलो. तिकडे एका टेबलवर तुलसी सर जेवतांना दिसले, त्यांच्या शेजारची जागा रिकामी होती. त्यांनी खुणावून बोलावलं.
लायब्ररी |
इकडे सगळीकडे प्यायला कोमट, लालसर दिसणारं पाणी मिळतं. (कॅम्पसमधे आणि हॉटेल स्टेशनरी मधे पण) विचारल्यावर समजलं की इथे पाण्यात कुठल्याशा आयुर्वेदिक झाडाच्या खोडाचे काही तुकडे टाकून पाणी उकळवतात. ह्याने घसा साफ राहतो. वा!!! हे पाणीतर मग साध्या पाण्यापेक्षा जास्ती चांगलं. मग दिवसभर हे पेय पिऊन मी घशाचे लाड करत राहिलो. बाहेर पडल्यापासून अक्वागार्ड वगैरे भानगडीत न पडता कुठलंही पाणी एक समजून तहान दूर लोटत होतो. जो होगा, सो देखा जायेगा!
Library मधे जाऊन, librarian ला कुठलं पुस्तक वाचू असा प्रश्न केला. तिने लगेच मला 'The Kathakali Complex : Philip Zarrilli' दिलं. सकाळच्या काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं इथे शोधली, समाधानकारक उत्तर वाचून मग सहचित्र कथकली बद्दल माहिती चाळली. काही इंटरेस्टिंग नोट्स पण काढल्या. दुपारचे अडीच तास कसे उडाले समजलंच नाही.
Library मधून बाहेर पडलो. कॉफी पिऊ म्हणून कॅम्पसमधुन निघालो. बढिया कॉफी मारली अन् परत आत जाणार तेच पावसाने गाठलं. हॉटेल आणि कलामंडलममधे किमान २०० मीटर अंतर असेल. मधे आडोश्याला काहीच नाही. तितक्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराच्या व्हरांड्यात उभ्या म्हाताऱ्या बाबाने हातवारे करून मला आडोसा घ्यायला बोलावलं. मी पोहोचताच ते हसून मल्याळम मधे काहीतरी बोलले. मी लगेच आपलं तोडकं मल्याळमचं ज्ञान उपयोगात आणून त्यांना सांगितलं, की मला मल्याळम येत नाही. त्यांना हिंदी आणि इंग्रजी येत नसल्याने आम्ही मग खाणाखुणांनी बोलू लागलो. त्यांनी मला खुणेने चहासाठी विचारलं, मी हसून आभार मानले अन आताच कॉफी घेऊन आल्याचं सांगितलं. ते पण हसले. पाचएक मिनिट आम्ही अश्या गप्पा मारल्या. भाषेअभावी संभाषणात काही अडचण आली नाही. अन इकडे आपण भाषा हा एक मुद्दा धरून कित्ती उत्पात माजवतो. भाषा आता एक संभाषणाचं माध्यम नसून, राजकारण करणाऱ्यांची पायाखालची पायरी झाली आहे.
मंदिर |
असो. आजचा दिवस प्रचंड मोठा होता. दिवसभर फोटो काढून आणि आता डायरी लिहून हात दुखायला लागलाय. झोपही अनावर होत आहे...
आपला,
(लहरी) माचाफुको
Under Test: Click Here To See More Images: THESE PICS WILL COME SOON
Posted In द्रविडी प्राणायाम | 7 प्रतिक्रिया |
द्रविडी प्राणायाम - दिवस दुसरा
27 October 2010
वेळ:
Wednesday, October 27, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
१३ ऑक्टोबर:
काल झालेल्या तोंड ओळखी, आज जरा वाढवून केरळ माहिती मिळवण्यात घालवला. बरेच दोस्त झाले (टी.सी. मोजून). रंजीत कडून मल्याळमचे धडे घेतले, अगदी शिव्यांपासून ते ख्यालीखुशाली विचारणे, एवढे मल्याळममध्ये शिकून घेतले. एका कागदाच्या चिट्ठीवर ते सगळे लिहून घेतले. पुढे काय काय बघायचं आणि कसा रूट घ्यायचा हे हि ठरवलं. २ सपाटेबाज केळ्यांनी दुपारची भूक पळवली होती. संध्याकाळी मग दहीबुत्ती खाऊन पोट शांत केलं. बरेच सल्ले मिळत होते, ते सगळे फिल्टर करून मी माझ्यापाशी ठेवत होतो. रंजीतने मी तिकडे एकटाच आणि नवीन असल्याने रात्री १० ते पहाटे ५ भटकणे टाळायला सांगितला. मी हा सल्ला काटेकोरपणे पाळायचा ठरवला.
आयुष्यात कोणी मला वेळ "pause " करायची जादू शिकवा रे........
*****
मल्याळम शब्दांची यादीतले काही शब्द (ह्यातले काही तमिळ शब्द पण आहेत):
Yendha Sugama - How are you?
Sugam - Fine
Yavailav - How much?
Chetta - Elder brother
Annian - Younger brother
Chechi - Elder sister
Aniyati - Younger sister
Nanni - Thank you
Mannika - Sorry
Malayalam ariyele - I cant speak malayalam
Para - Tell me
Yevada - Where is
Varu - Come
ह्या काही निवडक शब्दांच्या जोडीला काही इंग्लिश शब्द जोडून मला त्यातल्या त्यात माझं काम चालवून घेता आलं.
(संध्याकाळी सगळ्यांचे फोन नंबर आणि मेल आयडी घेऊन घेतले.....)
आपला,
(सुगम) माचाफुको
Posted In द्रविडी प्राणायाम | 6 प्रतिक्रिया |
द्रविडी प्राणायाम - दिवस पहिला
26 October 2010
वेळ:
Tuesday, October 26, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
१२ ऑक्टोबर:
अगदी कंटाळा आलाय.
नित्यक्रमाचा कंटाळा आलाय.
ह्या गडबड गोंधळाचा कांटाळ आलाय.
रोज दिसणाऱ्या चेहऱ्यांचा कांटाळ आलाय.
माझ्या मोबाईलचा कांटाळ आलाय.
माझ्या कपड्यांचा कांटाळ आलाय.
अण्णाच्या चहाचा पण कांटाळ आलाय.
आज पासून पुढील ७-८ दिवस मला वेळ आहे. गेल्या २-३ वर्षांपासून मनात एक "फ्रिक ट्रीप" मारायची इच्छा होती, आणि अश्या योजना वरच्यावर हवेत विरून गेल्या. गंगोत्री, pondicherry चा एकच निकाल लागला.
काही दिवसांपूर्वी एका मित्राशी कथकलीचा विषय निघाला होता. केरळ बघावं. ठरलं तर, एक केरळ ची अतरंगी ट्रीप! तशी तयारी काही करायची नव्हती. २ जोडी कपडे, कॅमेरा (बंड्याच्या भाषेत - तिसरा डोळा), १०-२० कोरे कागद, पेन आणि डायरी. केरळची माहिती गुगल करण्याऐवजी वाटेत मिळवण्याचा पर्याय निवडला मी. अजून एक गंमत म्हणून हि ट्रिप १००० रुपयांमध्ये उरकायची ठरवलं. (मध्ये एक कार्यक्रम बघितला होता - बेग, बॉरो ऑर स्टील. तसाच काही करायची इच्छा होती.) हे काही जमेल कि नाही, ह्याची खात्री नव्हती. पुणे स्टेशन वरून १९:०० ला कुठलीशी केरळला जाणारी ट्रेन आहे, हि माहिती मिळवली. तासभर आधीच स्टेशनवर पोहचून जनरल डब्याचं त्रिचूर पर्यंतच तिकीट काढलं. त्रिचूरपासून कलामंडलम जवळ असल्याची माहिती, एकदा कथकलीबद्दल वाचतांना मिळाली होती. तसंही कथकलीबद्दल बरंच कुतूहल होतं. तिकीट साधारण २३२ झालं. पहिलाच इतका मोठा बांबू. या हिशोबा प्रमाणे आपण तर कंगाल होऊ - वेग पकडणाऱ्या डब्याच्या दारात उभा असतांना हा विचार चाटून गेला. पैसे कमवायचा मार्ग शोधला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी कर्जत स्टेशनला वडापाव हातोहात विकले होते. असंच काही करावं. वडापाव मागे फार कमी पैसे येतील. पुस्तकं विकण्यात जास्ती मार्जिन काढता येईल.
पुढचं स्टेशन दौंड. जनरलचा डब्बा सोलापूरला उतणाऱ्यांनी खच्चून भरला होता. पुस्तकं विकण्यासाठी हा डबा काही योग्य नाही. स्लीपर डब्यांमध्ये आणि ए/सी डबे आपल्या कामी पडतील. दौंड स्टेशन येताच पुस्तकाच्या दुकानावर धावत जाऊन २ सुधा मूर्तींची पुस्तकं 3०० रुपय देऊन घेतले. या पुस्तकांवर जितकी जास्ती मार्जिन काढीन तितकं बरं. चढतांना स्लीपर डब्यात चढलो. उगाच टी.सी ने पकडून दंड लावण्यापेक्षा, आधी टी.सी ला पटवलं पाहिजे. टी.सी ला शोधून त्याला थोडा अंदाज दिला, टी.सी पण पोरगासा होता. ठीक आहे म्हणे. पाठीवर सामानाची sac, गळ्यात कॅमेरा, आणि हातात २ पुस्तकं. पहिल्या एक-दोन डब्यात जास्ती गर्दी न्हवती. लोक फक्त प्रश्नार्थी नजरेने बघत. शेवटी एकदाचा एक जण भेटला, त्याला डील सांगितली. २००च्या पुस्तकावर मी १०% कमावण्याचा माझा विचार त्याच्या समोर मांडला. त्याने विचारल्यावर त्याला पुस्तकं विकण्याच्या मागचा हेतू सांगितला. थोडी ओळख झाली. टेक-महेंद्र मध्ये कामाला आहे. माझ्या ट्रीप साठी शुभेच्छा दिल्या. आता थोडा आत्मविश्वास पण वाढला होता. दुसरा पुस्तक पण सहज विकलं. दोन्ही पुस्तकं वाचलेली असल्यामुळे, त्यांचं समालोचन देखील पुरवत होतो. टी.सी ने नोंद घेतली होतीच. आता पुस्तकं विकून झाली होती, पुढच्या स्टेशनला जनरलचा डब्बा झिंदाबाद. टी.सी ला सहज विचारलं, "आज काफी सीट्स खाली हैं, कोई जुगाड हो साकेगा क्या?" आणि माझं नशीब फळला! टी.सी ने तिरुपती पर्यंत मला एक बर्थ दिला. अजुबाजुच्या २ काकांशी ओळख करून घेतली. सगळेच झोपायच्या तयारीला लागले होते, मी पण आपली बॅग उशाशी घेऊन ताणून दिली.
आपला,
(भरकटलेला) माचाफुको
Posted In केरळ प्रवास वर्णन, द्रविडी प्राणायाम | 9 प्रतिक्रिया |
रहस्यभेद
वेळ:
Tuesday, October 26, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०८:३३ वाजता रजनीकांत बाळ ठाकरेंना भेटला, हि भेट साधारण ४० मिनिटे चालली.
५ ऑक्टोबर रोजी अंदाजे संध्याकाळी ०९:१५ वाजता बाळ ठाकरे अस्खलित तामिळ बोलू लागले!
| 8 प्रतिक्रिया |
आयुष्य आणि सुरळी
23 October 2010
वेळ:
Saturday, October 23, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
गुंड्या: काय चाल्लय बाकी?
बंड्या: चाल्लय.
गुंड्या: काय?
बंड्या: आयुष्य सुरळीत चाल्लय आणि सुरळी ............................
(बंड्या आणि गुंड्या एकमेकांकडे बघुन उगीचच 'ह' नी 'ख'च्या बाराखडीत बराच वेळ खिदळत होते.)
आपला,
(बावळट) सौरभ
Posted In संवाद | 11 प्रतिक्रिया |
लढा
14 October 2010
वेळ:
Thursday, October 14, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
गेले कितीतरी तास तसाच झोपून होता तो. अचानक त्याचे डोळे अलगद उघडले. पिवळ्या मंद उजेडात त्याला आई दिसली. तो तिच्याच मांडीवर डोकं ठेऊन झोपला होता. त्याची आई भिंतीशी डोकं टेकवून झोपलेली. झोपताना देखील खूपच दमलेली वाटत होती. रडुन रडुन थकली होती. डोळ्याच्या कडांतुन बाजुला पाहता बाकड्यावर अंगाची गुटमळी करुन झोपलेले बाबा दिसले. तितकेच थकलेले. त्याला तहान लागली होती. घसा कोरडा पडलेला. सलाईन लावलेला हातपण सुन्न झालेला. इस्पितळातल्या छताकडे तसाच एकटक बघत नील निपचित पडुन होता.
---------------------------------------------------
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
"सर, धिस इज पीझी. पहाडी ३ जवळ पेट्रोलींग स्क्वाड २वर स्थानिक अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढवलाय. आम्हाला लवकरात लवकर बॅकअप पाठवा. गोळीबारात आमच्या गाडीची पुर्ण नासधुस झालीये. ऑल युनिट सेफ. वी आर फायटिंग बॅक. बट वी निड अ बॅकअप एएसएपी. ओव्हर." - पीझी
"पेट्रोलींग स्क्वाड २. बॅकअप इज ऑन इट्स वे. होल्ड युअर पोझिशन्स. ओव्हर."
"ऑल युनिट टेक कव्हर. स्टे व्हिजिलन्ट."
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
"सॅवी... सॅवी... सॅवी... आर यु ओके? सॅवी रिस्पॉन्ड. आर यु ओके?" - नील
सॅवीने थम्ब्सअप देऊन अजुन जिवंत असल्याचा इशारा दिला.
"सर, सॅवी इज हिट बॅड्ली. हि इज नॉट एबल टू मुव्ह. आय एम गोईंग तू गेट हिम. गिव्ह मी कव्हर फायर." - नील
"ऑलराईट, डॉम, टिबी कव्हर नील. पीझी, डॅनी वी विल टेक द रेस्ट" - मेजर व्हि
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...
सरपटत, आडोसा घेत नील सॅवीजवळ पोहचला.
"सॅवी, यु गॉन्ना बी ऑलराईट. स्टे कुल." - नील
सूं सूं सूं सूं... झप्प... एक गरम धातुचा तुकडा नीलच्या मानेला चाटुन गेला.
"ह्म्प्फ्क..."
श्वास रोखुन ठेवलेल्या नीलने सॅवीला खेचुन कसाबसा एका आडोश्याला आणला. डॉम आणि टिबी ताबडतोप त्याच्या मदतीला धावले. तिघांनी मिळुन सॅवीला सुरक्षित ठिकाणी आणलं.
"पीएस२, बॅकअप युनिट ऍट पोझिशन. होस्टाईल टार्गेट हॅज बीन ट्रॅप्ड. हन्ट देम डाऊन."
...धाडधाडधाडधाड...धाडधाडधाडधाड...धडाम...धडाम...धाड...
"पीएस२, ऑल होस्टाईल टार्गेट्स डाऊन. झोन क्लिअर. मुव्ह युअर युनिट टू द बेस."
"शाब्बास, भले शाब्बास. ७ जणांच्या पेट्रोलींग युनिटने जवळपास २० अतिरेक्यांचा हल्ला नुसता फोलच नाही केला तर त्या सर्वांना यमसदनी धाडलं. मला तुमचा अभिमान वाटतो. नील, तुझा गर्व वाटतो. तुझ्यामुळे आज सॅवीचे प्राण नक्कीच वाचतील."
"यॅह्ह... थॅंह्न्क्स..." नीलच्या तोंडुन अस्फुटसे शब्द बाहेर पडले. "ह्म्प्फ्क...ह्म्प्फ्क..."
"नील, तु ठीक आहेस?" मेजर व्हिने जवळ येत विचारलं. "ओह माय गॉड, पीझी इन्फॉर्म बेस टु मेन सिव्हिअरली इंजर्ड."
"सर, वी हॅव टु मेन इंजर्ड. क्रिटिकल कंडिशन. वी निड इमिजिएट मेडिकल सपोर्ट. ओव्हर." - पीझी
"अफर्मेटिव्ह. ओव्हर."
मेजर व्हिने रक्तप्रवाह थांबवण्यासाठी नीलच्या गळ्याभोवती कपडा गुंडाळला. त्याची शुद्ध हरपत चाल्लेली. मगाशी चाटुन गेलेली गोळी मानेच्या खालच्या थोड्या भागाचा लचका उडवुन गेलेली. पण चाललेल्या रणधुमाळीत काही समजलच नाही.
---------------------------------------------------
(हुंदके... उसासे... चिंताग्रस्त चेहरे...)
"डॉक्टर, अजुन किती दिवस ठेवावं लागेल? कधी बरा होईल?" रडत विचारणारी आई.
"काकू, अहो ठिक आहे. काळजीच काही कारण नाही. ऑपरेशन अगदी यशस्वी पार पडलय. ताकद यायला थोडा वेळ तरी जाईलच. काका, सांभाळा ह्यांना..." इंजेक्शन देता देता डॉक्टरने समजूत घातली.
"काही झालं नाहिये त्याला. डॉक्टर आहेत ना. व्यवस्थित होईल लवकरच तो." बाबांचा बिथरलेला पण संयमित आवाज.
"आई..." पलंगावर डोळे मिटुन पडलेला नील थोड्याश्या शुद्धीत होता. "मी ठीक आहे. काळजी नको करुस. उगीच रडु नकोस."
"हो हो. तू तू आराम कर. जास्त बोलू नकोस. पडून रहा."
"बघा काकू, तो बोलला पण तुमच्याशी. लवकरच ठणठणीत होईल. पण त्याला आता आराम करु देत. नील, यु टेक रेस्ट." - डॉक्टर
ग्लानीत असलेला नील लगेचच झोपेच्या आहारी गेला.
---------------------------------------------------
एकटक छताकडे बघत असेला नील भानावर आला. अंग आखडून गेलेलं. तहानेने कासावीस व्हायला होत होतं. पण आपल्या हालचालीने आईची झोपमोड करायची नव्हती. का कोण जाणो त्याला परशुराम आणि कर्णाची गोष्ट आठवली. कर्णाने त्याच्या मांडीवर विसावलेल्या परशुरामांची झोपमोड होऊ नये म्हणुन भुंग्याच्या मांडी पोखरण्याच्या वेदना सहन केलेल्या. इथे मात्र नील जखमी, वेदनेने विव्हळत, तहानेने व्याकुळ आईच्या मांडीवर शांत पडुन होता. तिची झोपमोड होऊ नये म्हणुन.
सैनिकाचं खडतर जीवन जगत होता नील. घरापासुन कित्येक महिने लांब रहा. घरच्यांची काळजी, त्यांच्या आठवणी, त्यामुळे होणारी घालमेल. मोहिमेवर जाताना घर सोडतेवेळी आईबाबांच्या पाया पडताना असं वाटायचं शेवटच पाहतोय. पण तरी हसतमुखाने निरोप घ्यायचा. ह्यामुळेच त्याने स्वतः लग्नाचे कित्येक प्रस्ताव नाकारलेले. अनेक भावनिक वादळं अचानक नीलच्या मनात घोंघावु लागली. पण अश्या भावनांना त्याने कधीच स्वतःचा ताबा घेऊ दिला नाही. सैनिक म्हणुन दुबळा पडला असता तो. आता देखिल त्याला हमसून रडावसं वाटत होतं. पण आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. जन्मदात्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन नील शांत पहुडला होता. त्याची दुसरी आई, त्याची मातृभुमी, त्याच्या मांडीवर निश्चिंत झोपली असल्याचा नीलला उगीचच भास झाला. ह्या दोघींची झोपमोड होऊ नये म्हणुन त्याच्या रुंद छाताडाने लढा देत पुन्हा एकदा सगळी भावनिक वादळं आतच दडपुन टाकली. आसवं गिळत पापण्या मिटल्या. एक हसू ओठावर चिकटवून नील पुन्हा निजता झाला.
आपला,
(लढवय्या) सौरभ
Posted In सुचलं ते लिहलं | 20 प्रतिक्रिया |
वीकेंड गेटअवे 002
11 October 2010
वेळ:
Monday, October 11, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
केतन बरोबर शटर उडवायला भूकुम जवळ गेलो.....लिहण्यासाठी काही नाही :(
आणि उगाच मी स्विफ्ट ची लाल केलीये!
| 4 प्रतिक्रिया |
गणेशोत्सव २००९/१०
06 October 2010
वेळ:
Wednesday, October 06, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
गुंड्या: बंड्या...
गणेशोत्सव २००९
गणेशोत्सव २०१०
बंड्या: काय???
गुंड्या: ह्यावर्षी गणपति कधी होते???
बंड्या: ११ सप्टेंबरला.
गुंड्या: आणि गेले कधी???
बंड्या: २२ ला...
गुंड्या: आज तारीख काय???
बंड्या: ६ ओक्टोबर...
गुंड्या: बरी लवकर आठवण झाली तुला फोटो टाकायची...
बंड्या: अब्बे, फोटो आत्तातर मिळालेत.
गुंड्या: गेल्या वर्षाच्या गणपतिंचे फोटोपण आत्ता मिळाले का???
बंड्या: ... हे बघ... (उम्म्म्) ... (अम्म्म्म्) ... त्यावेळी मी ब्लॉगिंग नव्हतो करत. आता उगीच डोक्याच्या झांजा नको वाजवूस... गुमान फोटो बघ...
गणेशोत्सव २००९
गणेशोत्सव २०१०
बंड्या: अर्रे गुंड्या, लेका ते आपलं गाणं लाव, "अशी चिक मोत्याची माळ", त्याशिवाय गणपति साजरा केल्यासारखं वाटत नाही यार...
गुंड्या: :) येक्दम बर्रोब्बर्र बोल्लाय्स... हे घे... :D
गुंड्या: :) येक्दम बर्रोब्बर्र बोल्लाय्स... हे घे... :D
बोला गणपति बाप्पा... मोरया... मंगलमूर्ती... मोरया...
आपला,
(बाप्पाभक्त) सौरभ
Posted In आठवणी, गणेशोत्सव | 10 प्रतिक्रिया |
वीकेंड गेट अवे
01 October 2010
वेळ:
Friday, October 01, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
गेल्या रविवारी शहराबाहेर फेरफटका मारला, लागे हात कॅमेरा होताच. चालत्या गाडीतूनच शटर उडवला. माफ करा, सध्या वाचायला अशुद्ध लेखन पुरवू शकत नाही... :) लवकरच एखादा पोस्ट टाकीन (हा माझा विचार आहे.)
अजून काही फोटो आहेत, टाकीन निवांत. (प्रोफेसर ला blogging चा नाद लावला पाहिजे)
| 5 प्रतिक्रिया |
Subscribe to:
Posts (Atom)