द्रविडी प्राणायाम - दिवस सातवा

06 November 2010 वेळ: Saturday, November 06, 2010
ऑक्टोबर १८:

पहाटे साडे-चार वाजता गजर वाजला. सवयी प्रमाणे स्नूझ न करता उठून तयार झालो, सूर्योदय व्हायच्या आधीच पोहचून मला सुबक जागा मिळवायची होती.

कॅमेरा आदल्या रात्रीच सज्ज करून ठेवला होता. सूर्योदय पाहण्यासाठी खूप गर्दी लोटली होती. एका मेक्सिकन फोटोग्राफरने आपली किट सरकवून मला जागा बनवून दिली. मग एक एक क्षण टिपण्याचा कार्यक्रम सुरु केला. सूर्य अजून उगवायचा होता, पण रंगांचा खेळ सुरु झाला होता. आता कॅमेरा आपली कामगिरी अगदी चोखपणे बजावत होता. हळू हळू माझं लक्ष गर्दीतल्या लोकांकडे जाऊ लागलं. कुणी सहस्त्र सुर्यानाम म्हणण्यात गुंग होतं, तर कोणी सूर्यस्तोत्र. माहोल तयार झाला होता, चीफ गेस्ट सूर्याची सगळेच वाट बघत होते, आणि तोच समुद्राच्या लाटांवर खेळणारी त्याची पहिली किरणं दिसली! माझ्या शेजारी असलेलं म्हातारं जोडपं आनंदात टाळ्या वाजवत होतं. एखाददोन शिट्ट्या पण पडल्या! वाह काय नजारा होता! मी पण मग उल्हासित होऊन अजून जोमाने फोटो काढू लागलो. तुम्हाला सांगतो, ह्या पूर्वी अनेकदा डोंगरदऱ्यांमधून सूर्योदय पहिला होता, पण ह्या सूर्योदयची काही वेगळीच मजा होती. काय माहोल जमला होता. वातावरणात जल्लोष पिकलेला, भारताने क्रिकेट विश्वकरंडक जिंकावा असा जल्लोष! मी पण मग रपारप्प फोटो काढून सूर्याला चिअर-अप केलं.इकडे लोक सूर्याला ओंजळीत घेतल्याचा आभास करून देणारे फोटो, फोटोग्राफरकडून काढून घेत होते. एकाने मला विचारलं एक फोटो का कितना म्हणून. हसून त्याला मी इकडे सूर्योदयाचे फोटो काढायला अलोये सांगून पुन्हा एकदा कॅमेरामधून बघू लागलो. "भाईसाब, क्या आप हमारा फोटो निकाल के देंगे?",पुन्हा तोच माणूस. च्याआयला इकडे सूर्योदय सोडून ह्याच्या परिवाराचे कसले फोटो काढू, शॉट आहे हा माणूस. मी तिकडून कल्टी मारून दुसरीकडे गेलो.

मनसोक्त फोटो काढून आता, मी परत निघालो. इकडे कोळ्यांच्या होड्या येत होत्या. पकडलेले मासे आणून समोर मांडायचे, आणि त्यावर मग बोली लागे. इथे बांगडा - आयला या नावाने ओळखल्या जातो, आणि सुरमईला सिला म्हणतात. मास्याला, मीन म्हणतात. इकडे मीनचा सौदा होत असतांना, मीपण काही फोटो घेतले. कोळ्याचे हावभाव खुशाल होते, आज चांगली किंमत मिळत असावी त्याला. बघता बघता एक एक क्रेट विकला जात होता. आपल्या डायरीत नोंद करून ठेवणारा चीफ कोळी खूपच गडबडीत होता. त्या गजबजाटात मी संपूर्णपणे दुर्लक्षित होतो. कोणी कॅमेरा कॉन्शियास नसल्याने, मनाप्रमाणे portraits मिळाले.


आता निवांत कुठे बसून सूर्योदयाचे फोटो बघावे, आणि कॉफीची एक चाष्नी मारावी! मग बसस्थानकाचा रस्ता पकडून, आवडेल अशी जागा शोधू लागलो. वाटेत थोड्या थोड्या अंतरावर एखादा विक्रेता येऊन मला त्याच्या जवळचा माल दाखवायचा. त्यात एकाने मला गाठलं आणि मोत्याची माळ दाखवली. मग खिश्यातून लायटर काढून, मोतीला लायटरच्या आचे वर ठेऊन दाखवू लागला. "साहब, एकदम ओरीजनल हैं. बहोत बढीया गिफ्ट आयटेम बनेगा. ३०० रुपये में लो|" प्रेमाने त्याला सांगितला, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. मग त्याने उतरता पाढा सुरु केला. मी पुढे चालत होतो, आणि तो माझ्या मागे. शेवटी त्याची गाडी ५० रुपये वर येऊन थांबली! "इससे कम नाही होगा|" "भाई ५० रुपये में मेरा २ वक्त का खान होता हैं. छोडो यार|" त्याला पण अंदाज आला कि त्याच्या समोरचा किती लुक्खा आहे म्हणून.

समुद्राचा नजरा घेत कॉफी संपवली. इकडची वाळू विविध रंगांची आहे, हे इथला एक वैशिष्ट्य आहे. हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरची रेती या ठिकाणी एकत्र येते. इथे सोनेरी, पांढरी आणि काळी वाळू बघायला मिळते. बऱ्याच कथापण आहेत ह्याबद्दल. आपल्या देशाच्या अगदी टोकावर उभे राहण्याचा अनुभव; एक मजेशीर होता. मग पुन्हा एकदा जेट्टी पकडून विवेकानंद रॉक्सवर गेलो. तशी गर्दी असल्याने, माझा थोडा मूड ऑफ झाला होता. कलकलाट आणि गोंधळ काही मन रमू देत नव्हते. इकडे फोटो काढण्याऐवजी मी फक्त डोळे मिटून शांती अनुभवायचा प्रयत्न करत होतो. त्या एक दीड तासाच्या बैठकीत मला ५-१० मिनिटे शांत वाटलं असेल. पण त्यात एक औरच मजा होती!

विवेकानंद केंद्रात परत जातांना इथली एक आठवण म्हणून एक लुंगी घेतली. आता पुढचा दिवस लुंगी नेसून फिरायची इच्छा होती. दुकानदाराने ५० रुपये किंमत सांगितली. सकाळच्या मोतीवाल्याच्या अनुभवावरून मी त्याच्याशी २५ वर घासाघीशी केली. शेवटी ३० रुपयात त्याने द्यायची ठरवली. (परत गेल्यावर मी तुळशी बागेत यशस्वी रित्या भाव करून दाखवणार आहे.) विवेकानंद केंद्राच्या खानावळीत जेऊन मग केंद्राचा फेरफटका मारायला निघालो. विवेकानंद केंद्रात लुंगी नेसून फिरत होतो. आतून एक रस्ता सूर्योदय बघण्याच्या ठिकाणी जात होता. वाटेत मोर स्वच्छंदपणे फिरत होते. एखादं मोरपीस मिळतं का म्हणून नजर फिरवली, पण समोर पसरलेल्या समुद्राकडे लक्ष गेल्यावर मोरपीस नव्हतच पण पूर्ण इलाक्यात माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. समुद्राच्या लाटांच्या आवाजावर आता मी लय पकडली होती. शांत बसून सुमुद्राकडे बघत बसलो होतो. हलकेच पसरलेल्या ढगांनी आपली सावली पाडली होती. भर दुपारीपण इथे मला रम्य वाटत होतं. दुपारचे ४ वाजे पर्यंत इकडेच बसून होतो. एका चिलटाने वळून बघितला नाही. वाह!
संध्याकाळी सूर्यास्त बघायला, बस स्थानकापासून ३-४ किलोमीटर पुढे आलो. बरेच फोटो घेतले. पुन्हा एकदा रंगांच्या खेळात सुर्यानेच बाजी मारली. या सामन्यात मी इतका गुंग झालो होतो, कि मला परत जाण्यासाठी काही साधन मिळेना. ३-४ किलोमीटर तसं फार मोठं अंतर नाही, पण आता पायपिट करायचा मलाच कांटाळा आला होता. तितक्यात, बसस्थानकाच्या दिशेने जाणारी एक दुचाकी येतांना दिसली. मी लिफ्ट मागितली. गाडी थांबली, आयला लई दिवसांनी लुना बघितली! साला पण माझा वजन झेपेल का तिला? मी ८० किलो अन् चालवणारा ६०एक किलोचा असेल. त्याला माझी शंका विचारली, तर नुसता हसला! तसा रस्ताच उतार होता; म्हणून माझा वजन potential म्हणून तिकडे कामी आलं! उद्या सकाळी साडे-पाच वाजताची जयंती एक्स्प्रेस पकडून पुण्याला रवाना व्हायचा प्लान होता.

आपला,
(पांथस्त) माचाफुको

4 प्रतिक्रिया

 1. THE PROPHET Says:

  मित्रा...तोडलंस...
  गड्या जिंकलंस!!!

 2. अनघा Says:

  सौरभ!! अप्रतिम! खूप सुंदर आहेत फोटो!!! मस्त!

 3. राजम तू फोटूग्राफर आहेस की चित्रकार? कसले आलेत फोटोज !! टेक अ बो.. !!

 4. Machafuko Says:

  Prophet, अनघा, हेरंब -

  खूप खूप धन्यवाद!!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates