शलौम शाब - ६

24 December 2011 वेळ: Saturday, December 24, 2011
अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करून आल्यावर सगळ्यात पहिले जे केलं असेल, ते म्हणजे अगदी गरमा-गरम जेवण. जर्मन बेकरी मध्ये निवांत बसून छान organic कॉफी आणि रोलीचा आस्वाद घेत दिवस आखला. मला इथे अगदी निवांत मासे पकडायचे आहेत, सायकल घेऊन आस पासचा परिसर फिरायचा आहे. एक एक इच्छा मनात येईल तशी पूर्ण होत गेली. संध्याकाळी मानसिंगला फोन लावला, तो तिथे जवळपास होता. लगेच भेटायला आला. त्याला आदल्या आठवड्यातल्या ऑफर बद्दल आठवण करून दिली. तो एक क्षणासाठी विचारात पडला, त्या वरून मी पण एक अनुमान बांधला. नेमकं तो हा आठवडा कामाने गुरफटला होता म्हणून कळाले. मी पण आठवडाभर राहण्याचा बेत आता दोन दिवसांवर आणला. मानसिंगची पण सोय शेवटी महत्वाची. शेतात तसं काही खास काम न्हवते, थोडी बहुत कामं केली की मग गावातल्या आसपासच्या पोरांना गप्पा मरता मरता इंग्रजी शिकवायची.

इथे मानसिंगने मला रॉक्सी (राक्षी)ची ओळख करून दिली. राक्षी ही इथली लोकल दारू. नाचणी पासून बनवल्या जाते. खूप जास्ती ढोसायची नसते. छोट्याशा ग्लास मध्ये साधारण ६० मिली. एका घोटात घेऊन, बाटली कपाटात ठेवणे. राक्षीची शुध्त्ता तपासण्यासाठी राक्षित बोट बुडवून मग बोट अग्नीवर धरायचं. स्पिरीट मुळे बोटाने पेट घेतल्यास ती शुद्ध आहे, अन्यथा त्यात पाणी टाकून भेसळ केली आहे. रात्री थंडीपासून सरंक्षण म्हणून इथे एक एक शॉट राक्षी प्यावी. उग्र वास असून, स्पिरीटचा वास येतो. शॉट रिचवताच नाकातून fumes निघाल्यासारखं वाटतं. दोन दिवस नेपाळी घरघुती जेवणाचा आस्वाद घेतला. इथे पर्यटक म्हणून एक वेगळी वागणूक मिळाली नाही. मानसिंगच्या घरा पासून जवळच एक बढिया स्पॉट शोधून काढला होता. इथे बसून काही दिवसांपूर्वी घेतलेली बासरी वाजवत अंधारात गायब व्हायचं. डासांनी फोडून काढे पर्यंत बसून राहावे. दोनच दिवस राहिलो, मात्र इथून पाय हलत न्हवते. मानसिंगने पृथ्वी चौकात बस पार्क जवळ सोडलं, तो पाऊस सुरु झाला.

आता काठमांडू बघायचा बेत होता. रस्ता पुन्हा एकदा तृशिली नदीच्या कडेने जाणार होता. आज तरी काही करून तृशिली किनारी थांबवलं पाहिजे ह्याने. नशीबाने तृशिली किनारी बसचं टायर पंक्चर झालं. थोडा वेळ तृशिलीचा तो रुद्रावतार बघत एक रोलीचा आस्वाद घ्यावा, अन् मग धुक्यात कुठेतरी निघून जावं, विरघळून जावं. त्या नदी किनारी असलेल्या त्या स्वच्छ वाळूत एखादा कण बनून लुप्त व्हावं. ह्या रेतीच्या कणा मध्ये कुठेच साम्य नाही. कुठलेही दोन कण एक सारखे नाही दिसणार. तरी आपल्यासाठी सगळे कण एक सारखेच. Equality ही एक relative value आहे. Equality मध्येपण दोन वेग वेगळे levels असू शकतात. ह्याच equalities च्या फंद्यात अडकलेल्या असंख्य माणसांचा समुह धर्माला जन्म देत असावा. धर्म नावाचा पेहराव चढवून आपण एक सारखे व्हायचा प्रयत्न करतो खरा, पण त्यात कितपत यश पदरी पडेल हे सर्वांनाच माहिती आहे. काही वर्षांपूर्वी अनुराग कश्यप चा चित्रपट  - "गुलाल" आला होता, आता त्यातल्या पृथ्वी बना आणि दुके बनाचं संभाषण आठवलं.
पंक्चर मात्र काढून झालं होतं.

आज वेळेत काठमांडू मध्ये पोहचलो. मानसिंगने दिलेल्या पत्यावर जाऊन, राहायची चौकशी केली. ठीक ठाक भाव करून रूम मध्ये सामान टाकलं. 

0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates