सोंड्या हा तसा अभ्यासाचा खूप मोठा विषय होऊ शकतो. त्याच्या स्वभावाच्या प्रत्येक धाग्याला धरून पीएचडी होऊ शकते.
पुढे सरळ रस्ता दिसला म्हणून, गाडी (होंडा Activa - चं विमान) चालवतांना एखादी डुलकी मारणारा शोधून कुठे सापडणार नाही. दुनियेत सोंड्याला कोण किती पीळेल ह्याचं प्रमाण इनफिनिटी मध्ये सांगणे म्हणजे सोंड्याचा अपमान आहे. कट्ट्यावर वर्षानु वर्षे सोंड्या वर नित्य-नेमाने रोज एक तरी गेम पडतो.सोंड्याचे तसे छंद पण काही कमी नाहीत. कॅरम वर पैज लावणे, फो-रेक्स मध्ये पैसे गुंतवणे. हे सगळं तो पैसा गमावण्यासाठीच करतो जणू. कडकीमध्ये मी पण सोंड्याशी पैज लाऊन माझ्या चहाची बिलं भरली आहे.
हिशोबाचा पक्का, पण इतर सगळ्या गोष्टींमध्ये धांदरट. स्वभावाने थोडे राजे आहेत. झीप्पो त्यांनी अश्या शाही थाटात घेतला खरा, पण त्याचे तुकडे कसे पडले हे तुम्हाला कोणी पण सांगेल. त्याच्या प्रत्येक वाक्यात काही तरी वेगळेपण असतं. तो "Happy New Year" ला "Many happy returns of the New Year" म्हणून शुभेच्छा देईल.
आधी दोस्ती तपासण्यासाठी एकदा विचारून घेतो, माझ्या कडे पैसे नाहीत माझे चहाचे पैसे भरशील का? अन मग आम्हा दोघांच्या चहाचे पैसे तोच भरेल. अजून लहान पोर आहे ते. त्याला कितीही रागवा, शिव्या द्या अन्न ती चूक पुन्हा होऊ नये ह्याचे फंडे द्या. शेवटी महराज पुन्हा तेच करून येतील आणि मग हसतील. ह्यासाठी उदाहरण देणं गरजेचं आहे. आम्हाला एका रविवारी बाईक घेऊन ताम्हिणी घाटात फिरून यायची इच्छा झाली. सगळे मित्र ३-४ बाईक वरून निघालो. पौड रस्त्यावर वाय.डी ची गाडी पंक्चर झाली. तिकडेच एका टायरवाल्याकडून पंक्चर काढून घेतलं. पुढे पुन्हा चांदणी चौकात वाय.डीची गाडी पंक्चर. आम्ही चाक काढून पंक्चर काढून आणायचा विचार केला. पण नेमकं हवे ते पाने त्या टूल-कीट मध्ये न्हवते. मग सोंड्याला सांगितला कि तू तुझ्या गाडी वरून जाऊन पंक्चरवाला घेऊन ये. एक तास झाला अजून पंक्चरवाला नाही म्हंटल्यावर सोंड्याला फोन करून विचारलं काय रे बाबा, तू कुठे अडलास? तर म्हणे आलो ५ मिनटात. ५ मिनटा सांगून हा २० मिनटानंतर आला. सोबत पंक्चरवाला पण वेगळाच होता. मगाशचा न्हवता. त्याला विचारल्यावर म्हणे, टिळक रस्त्यावर माझ्या ओळखीचा एक पंक्चरवाला आहे. त्यालाच घेऊन आलो बघ. आता काही प्रोब्लेम नाही. अशे चालतात आमच्या सोंड्याच्या अकलेचे घोडे. २ कि.मी. वरच्या पंक्चरवाल्याला आणायच्या ऐवजी त्याने डायरेक्ट ८ किलोमीटर वरून त्याचा पंक्चरवाला आणला! आता काय म्हणायचं ह्याला? पंक्चरवाला पण एका अटीवर तयार झाला होता. त्याला न्यायचा आणि आणायची अट होती. ती ताम्हिणी घाटाची ट्रीप सोंड्याकडून चांगलीच वसूल केली.
आमच्या ह्या मित्राला मिळेल ते गाणं मराठी मध्ये अनुवाद करून बेसुर्या आवाजात गायची फार हौस.
"जबसे तेरे नैना, मेरे नैनोसे लागे रे"
ह्याचा अनुवाद, "जेव्हा माझे डोळे, तुझ्या डोळ्यांशी जुळले रे" असा करून आम्ही त्याला गाण्यात साथ द्यावी म्हणून मग "आहा" म्हणत. त्याच्या गाण्याच्या प्रत्येक ओळी नंतर एक समूहदायिक "आहा" येत.
सोंड्याचे तसे रंग चिकार! लिहावा ते थोडं. त्याने आमच्या विनोदी गोष्टींना पुरवलेलं भांडवल, हे जन्मात कोणाला जमणार नाही असं.
अजून त्याच्या शिक्षणातून गणित नावाचा भूत उतरत नसल्याने, डिग्री अडली आहे. आता मात्र स्वतःच्याच वडलांच्या कामात हातभर लावतो आहे.
0 प्रतिक्रिया