पहाटेचा रामप्रहर, वाजे घड्याळी गजर| झोपेचं खोबरं, होतसे||
पेंगुळलेले डोळे, जड त्या पापण्या| स्वप्नांचा चक्काचूर, पहातसे||
दमदार जांभई, अन् आळस घेऊन| गजराचे घड्याळ, पुन्हा स्नूझमधे||
उषःकाल सरुन, मध्यान्ह जाहली| निद्राभंग झाला, गरमीने||
आढेवेढे घेत, पांघरुण सारले| उठावे लागले, नाईलाजे||
प्रातःर्विधी कारणे, न्हाणीघराकडे कूच| नेमक्यावेळी ते, व्यस्त असे||
तोवरी आदण चहाचे, ठेवावे गॅसवर| दिवसाची सुरुवात, अमृताने||
दंतमंजन लेप, घ्यावा ब्रशवरी| लेपून तोंडभरी, मौजे घासावे||
खळाखळ भरुन चूळ, मुखमार्जन पात्री| चेहरा धुवावा, साबणाने||
शुचिर्भुत होवून, प्रसन्न व्हावे| दिनक्रम आपुला, आरंभावा||
चहा वाफाळता, घ्यावा गाळून| सोबती रवंथ, बिस्किटांचे||
बैठक घ्यावी, लॅपटॉपसमोर| साईट विहार, प्रारंभावा||
ना स्क्रॅप कोणाचे, ना एकही ईमेल| तरी पेज रिफ्रेश, करित रहावे||
घटीका सरतील, निष्क्रिय अश्याच| गर्भी उद्रेक, वायुचे||
सारुन बैठक, घ्यावी विश्रांती| निमित्त करावे, न्याहारीचे||
शमवूनी भुक, वामकुक्षी घ्यावी| बागडावे आनंदे, संध्याकाळी||
रात्र होता परतावे, आपुल्या घरी| व्यवस्था करावी, भोजनाची||
आपलेच हात, अन् आपलेच पोट| जाणोनी करावा, स्वयंपाक||
चलचित्र पहाता, उदरभरण करावे| तृप्त व्हावे करुन, हे यज्ञकर्म||
पांघरुण पसरुन, द्यावी ताणून| निद्रिस्त व्हावे, शांतचित्ते||
स्वप्नांचा खेळ, खेळत झोपावे| असा न्यावा दिवस, पुर्णत्वे||
दिनचर्या अशीच, थोड्याफार फरकाने| होतसे रोज त्यात, नाविन्य नसे||
सौरभ म्हणे ज्याने, कंठीले आयुष्य ऐसे| आदर्श बेरोजगार म्हणूनी, गौरवावे||
आपला,
(संत) सौरभ