एक प्याला - अनेक प्यायले!

11 October 2011 वेळ: Tuesday, October 11, 2011

आज पर्यंत ब्लॉग विश्वात वाईन कशी प्यावी, चांगली व्हिस्की कशी ओळखावी बद्दल बरंच वाचलं.
दारू आणि मद्य मध्ये बराच फरक आहे, तितकाच जितका लफडं आणि affair मध्ये आहे. तसा, दारू ह्या शब्दाचा 'बेवडा' शी संबंध जोडल्या जातो. दारू कुठली असो, ती चांगली की वाईट ते पिणाऱ्यावर अवलंबून असतं. (सांगायचं झाल्यास नोकिया ११०० आणि आय-फोन ४ मध्ये काही फरक नाही. दोघांवर फोन आला की कळतं, मेसेजची देवाण-घेवाण करता येते. बस इतर accessories हव्या असतील तर जास्ती किंमत मोजून आय-फोन घ्या!)

आज आपन देशी दारवां बद्दल लिहणार! जी दारू, जिभेच्या प्रत्येक भागावर एक सारखीच लागते अन् पोटात उतरतांना गरम वाटते! चांगल्या दर्ज्याची दारू कुठे उपलब्ध होते, हे बऱ्याचदा माहिती नसल्याने आपण ती चाखून बघायला धजत नाही. कुठली ही दारू बनवण्यासाठी आंबवणे महत्वाचं असतं. नेमकी ही आंबवण्याची पद्धत चुकार असल्याने, बऱ्याच जणांची अशी दारू प्यायची हींमत होत नाही.

तुम्ही पिऊन बघाच, हे ही म्हणणं नाही माझं.

देशी दारू, मध्ये जी.एम - संत्रा, बडीशेप, मोसंबी < त्यातल्या त्यात sophisticated असतात. ताडी, खोपडी, हात भट्टी, काजू फेणी, मोहाची, तांदळाची, बाभळी ह्यातले काही प्रकार.
सुरवात mild दारू पासून करू.

ताडी:
नीरा आंब्ल्यावर ताडी बनते. चवीला आंबूस, दुधाळ रंग. गुत्यात नेहमी जुन्या बीयरच्या बाटलीत मिळते. १०-१२ रुपयाला एक बाटली. ताडीच्या गुत्यात एक विशिष्ठ आंबूस वास तुमचं स्वागत करतो. जमीन नेहमी ओली असते. मित्रांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या नावाने, प्रत्येक बाटलीतले २ घोट जमिनीवर ओतल्या जाते. गुत्यात, शौकीन ओळखणं कठीण नसतं, तो माणूस ताडी मधली पावडर काढण्यासाठी ताडी रुमालाने गळून घेतांना दिसतो. आपल्याकडे एक समज आहे, दारू जर चढली नाही तर ती बेकार. म्हणून ताडी मध्ये एक्स्ट्रा किक बसण्यासाठी पावडर टाकल्या जाते. शक्यतो पावडर वाली ताडी पिऊ नये. ताडी ही हळुवार चढणारी चीज आहे. ताडी, ही किडनीसाठी उत्तम असल्याचा समज ताडी प्रेमी मध्ये आढळतो. किडनीवर प्रेम करून लिव्हरशी वैर पाळणारे म्हणजे ताडी पंटर म्हणून ओळखावा. अत्यंत शांत नशा होते. पलंगावर पाठ टेकवल्या टेकवल्या झोप लागते, आणि hangover तर अजिबात नाही. तोंडी लावायला - उकडलेली अंडी, तांदळाचे पापड, उकडलेलं कडधान्य, मिरची पकोडे घेतल्या जातात. तोंडी लावायचे पदार्थ नेहमीपेक्षा जास्ती तिखट आणि खारट असतात. ताडीच्या आंबूस गोड चवीचा उतारा म्हणून हे तोंडी लावणं. शहरापासून थोडं बाहेर जाऊन, चौकशी केल्यास पावडर नसलेली ताडी तुम्हाला मिळेल. ठोक घ्यायची झाली, तर ८०-१०० रुपये बदली (५ लिटर) मिळते.
पुण्याच्या जवळपास चांगली ताडी नक्की मिळेल.

ताडीची कोकणातली बहिण : माडी.


हात भट्टी:
गूळ आणि खराब धान्य कुजव्ल्या जातं. त्यातून distillation मार्गे दारू जमा केली जाते. ठीक ठिकाणी concentrate स्वरूपात पोहचवल्या जातं. त्यात पाणी मिसळून सौम्य केल्या जातं. उग्र स्पिरीटचा वास येतो. तांब्या - हे माप आहे. हात भट्टीची खासियत अशी आहे, की कधी ही २ तांब्या पिऊन चढेल, तर कधी ५ तांब्या रिचवल्यावर चढेल. हात भट्टीची नशा मात्र एकदम रावडी असते. नवख्याला भिर्मीटायला लावते. मजबूत hangover बसतो, अंगालाही प्रचंड वास येतो. तोंडी लावायला अननस, बोर, करवंद मीठ लावून रुचकर लागतात. हात भट्टी आणि ताडी कधी एकत्र पिऊ नये. फार जहाल मिश्रण होतं. समोर पेल्यात हात भट्टी असतांना, जग/दुनिया/आयुष्य/प्रेम  हे विषय शक्यतो टाळा. राग आणि हात भट्टीचं जुळलं तर उद्या तुमच्या नावावर किमान एखादी "फुल" ची केस असेल!

हात भट्टीची सावत्र बहिण म्हणजे खोपडी. चवीला हात भट्टी पेक्षा फिक्की, पण हिचं माप किटली आहे. ह्या दोघी बहिणी तुम्हाला बगैर त्रास चाखायची असेल, तर 'कोरी' (concentrate) कुठे मिळते ह्याचा पत्ता लावा. शक्य नसल्यास एखाद्या हात भट्टीवाल्याला गोडीत घ्या. मग घरी आणून, त्यात पाणी मिसळून सौम्य करून घ्या! ह्या दोघी बहिणी स्टीलच्या ग्लास मधून पितांना समजत नाही. त्यातल्या त्यात, चाहाच्या प्याली पेक्षा थोड्या मोठ्या प्यालीत पिण्याची मजा येते. पिण्याचा एक नियम आहे, प्रत्येक ग्लास उचलला की रिता करूनच खाली ठेवायचा (chug). ह्यांची चव तितकी रुचकर नसल्याने, ती घोटात संपवणे सर्वांना पटेल.

बाभळी:
एखादी काचेची बाटली (स्वच्छ धून पुसून) मध्ये साखर भरल्या जाते. बाभळीच्या झाडा खाली खणून, बाटलीत जाऊ शकेल असं मूळ - सोलून, पुसून साखर भरलेल्या बाटलीत टाकतात. मग वरून प्लास्टिकने गच्च बांधून, वरून कापडाने बांधतात. आता महिनाभर ती बाटली तशीच सोडायची. महिन्याभराने, बाभळीच्या मुळाचे रस आणि साखर मिसळून आंबलेले असतात आणि दारू सारखं द्रव्य तयार झालेलं मिळेल. खूप उग्र वास नसतो, पण, बराच वेळ -'पिऊन बघू की नको' मध्ये जातो. भरपूर साखर असल्याने गोडसर चव लागते. पण एक ग्लास मध्ये विमान झालेलं असतं. हिचा अतिरेक करायचा नसतो. बाभळीची दारू, बाजारात मिळत नाही. ती एक तर स्वतः बनवून प्या, नहीतर ह्यातला एखादा तज्ञ शोधा.

फेणी:
गोव्याला गेलं की फेणी पिऊन बघाच. काजू फेणी कधी ग्लास मध्ये ओतून घेण्यात मजा नाही. सरळ बाटलीतून कोरी फेणीचे घुटके घेण्यात जास्ती मजा आहे. काजू फेणीची चव बऱ्याच लोकांना आवडत नाही. काजू फेणीची चव आवडत नसेल, तर कोकम सरबत मध्ये जीरा पावडर टाकून बघा. जिन मध्ये फेणीचा स्मॉल, जरा चव आणतो! फेणी बरोबर मासे हे सर्वात चांगलं तोंडी लावणं आहे. फेणी प्यायल्यावर किमान २४ तास तरी फेणीचा वास तुमचा साथ सोडणार नाही. काजू फेणी बनवण्याची प्रक्रिया बघण्यासारखी असते. १०X१० फुटाच्या टाक्यात नासके काजू फळ टाकल्या जातात. एक माणूस त्या फळांना कुस्करून, लगदा बनवून मग आंबवतो. Distillation करून ती बाजारात विकल्या जाते. फेणी बरोबर, चुलीत भाजलेले काजू खाण्याची मजाच वेगळी आहे.

जांभळाची दारू पण काजू फेणी सारखीच बनवल्या जाते. चवीला मात्र थोडी तुरट असते. पहिल्या धारेची प्यायल्या मुळे मी पहिल्या round मधेच भिर्मीटलो. जास्ती काही आठवत नाही!

मोहाची:
मोहाची फुलं खायला गोड लागतात. उन्हाळ्यात माकडं ही फुलं खायला अगदी gentleman बनतात. मूठभर मोहाची फुलं माकडांना दाखवलीत, तर ते माकड तुमच्या पायात येऊन बसेल, आणि एक एक फुल वेचून खाईल. मोहाची फुलं चढत नाहीत. त्यांची दारू चढते. विदर्भ मधल्या काही आदिवासी गावात उत्तम मोहाची दारू  प्यायला मिळेल. १५-२० रुपयात एक बिसलेरीची बाटली भरून मिळते. ही एक बाटली दोघा-तिघांना पुरून नशा देते. उग्र स्पिरीटचा वास, लिम्का किंवा मिरिंडा बरोबर रुचकर लागेल. आम्ही मात्र गावकरी पितात तशी प्यायची ठरवली. तोंडी लावायला बीडी (अनुप बीडी, बंगाली बीडी). Hangover बसतो. मोहाची दारू गढूळ असल्यास, घेऊ नये.

तांदळाची:
भारतातल्या तांदूळ प्रधान प्रदेशातले आदिवासी, तांदळाची दारू बनवतात. तांदळाची बियर म्हणून प्रसिद्ध आहे. सडीचा तांदूळ (unpolished) ३-४ तास शिजवून, त्यात काही पाला टाकून, त्याचे गोळे बनवतात. हे गोळे एका मडक्यात ठेवतात. काही दिवसांनी आंबवलेले हे भाताचे गोळे आणि त्याचं सुटलेलं पाणी गळून घेतल्या जातं. बियर सारखं थंड करून प्यायलात, तर हिच्या प्रेमात पडल!

फळांची दारू:
ही घरगुती दारू आहे. मडक्याला खालून एक बारीक छिद्र करून, त्यात नासकी मोसंबी, केळी, पपई, संत्री, पेरू कुस्करून टाकतात. त्यात ४-५ मूठ गूळ/साखर. जमिनीत खड्डा खणून, त्यात आधी एक वाटी ठेवतात. त्यावरती हे मडक. वरून कापडाने झाकून, मडक्याची मान वर ठेऊन बाकी भाग मातीने झाकून टाकतात. १५-२० दिवसात तुम्ही घरगुती दारू तयार! खाली वाटीत जमलेलं द्रव्य मजबूत नशा देतं. Distillation करून घेतल्यास जास्ती चांगलं. कडवट चव, आणि नासका वास असतो. ही दारू शॉट मध्ये घ्यावी. ३० मी.ली. च्या प्रमाणात, एका झटक्यात पोटात. तिसऱ्या शॉट मध्ये माणूस भिर्मीटला पाहिजे!

आता तुम्ही म्हणाल हे सगळं वाचून तुम्हाला काय मिळणार?
तेच जे मला हे लिहून मिळालं, काही नाही. नेमकं ह्या दारू मध्ये कोणी अभिरुची निर्माण केली न्हवती. हात भट्टी पिणं सुसंस्कृत सवय नाही अशी समज आहे. म्हणून बरे-की-वाईट मध्ये आपणच आपले जुळवून घेतो.
नेहमीच काय तेच ती cabernet sauvignon च्या मार्गी जायचं? आज मी पण झिंगलो, आनंदाने झुलत निघालोय!

तुम्हाला अजून देशी दारूंची माहिती असल्यास झरूर कळवा! मला चाखून बघायला नक्कीच आवडेल!आपला भिर्मीटलेला,
माचाफुको. 

0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates