शलौम शाब - ९

02 February 2012 वेळ: Thursday, February 02, 2012
थल्या थंडीची सवय पडली होती. तापमान ४ डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊन आलं, तरी ही थंडी बोचरी वाटत नाही. इथे इतक्या दूर बसून सगळं काही ओळखीचं वाटू लागलं आहे. प्रत्येक जागेची एक खुबी असते. एकदा काय तुम्ही नव्या ठिकाणी आलात, की इथली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नवीन. कुठलीही वस्तू पहिल्यांदा बघतांना मजाच वाटते. नजर इकडे तिकडे पडत असते, येईल त्या बऱ्या-वाईट अनुभवाची परवा न करता ते सगळे गाठीशी ठेवतो. काही दिवसांनी मी पुन्हा मुंबईत असीन, तिकडे अगदी सराईत मुंबईकर असल्या सारखा फिरीन. इराण्याच्या दुकानातल्या त्या सुंदर जुन्या खुर्च्याचं नवल नसेल मला, ना स्टेशनवर तुंबलेल्या गर्दीची भीती. आज काठमांडू पण मला ओळखीचे वाटू लागलंय. ह्या शहराची जादू आता माझ्यावरून उतरते आहे. आपण कितीही दूर गेलो तरी आपल्या विचारांची आणि स्वभावाची वाही नेहमी आपल्या सोबत असते. हेच विचार आणि हाच स्वभाव आपल्याला तिथे पण दिसून येतो. का नाही मग सगळं ओळखीचं वाटणार? मग ह्या वहीचे नवीन पान उघडणे नवीन विचारांची नोंद करून बघितले पाहिजे.

आज एखादा नेपाळी सिनेमा बघावा म्हंटलं, पण इथे नेपाळी सिनेमा पेक्षा शाहरुखच्या रा-वन ची चलती होती. विषय मिटवून भारतापुर शहर बघायला निघालो. इथून एक तासाचं अंतर आहे. ह्या शहराला खूप इतिहास आहे. वास्तुकला बघण्यासारखी आहे. इथले रस्ते बघून मला शाळेत एका धड्यातल्या चित्रातले stone cobbled road आठवले. सकाळची कामं उरकून बायका स्वेटर विणत होत्या, काही धान्य निवडत. पुरुष मात्र कॅरम खेळण्यात रमले होते. एका ठिकाणी थांका पेन्टिंग स्कूल होती. काही लहान मुलं एका घोळक्यात त्यांच्या मास्तरांचे निरीक्षण करत होते. काही मोठी मंडळी मात्र स्वतः होऊन चित्र घडवत होते. त्यात एक सगळ्यांपेक्षा जास्त अनुभव असलेला विद्यार्थी एक अत्यंत कोरीव थांका रंगवत होता. तो इतरांसारखे कागदावर रंगवत न्हवता. ह्या चित्रांमध्ये symmetry खूप ठिकाणी दिसून येत होती.  तिथल्या एका मास्तरने मला माहिती सांगितली. ह्या चित्रांचा वापर गौतम बुद्धांची शिकवण येत्या पिढी-दार पिढीला शिकवण्यासाठी केल्या जातो. जसे आपल्या शाळेत विज्ञान शिकवणाऱ्या बाई periodic table चा हे मोठा चार्ट घेऊन येत, तसं असावं हे. शिकवणीचे चित्रिकरण करण्याची हे सगळ्यात सुलभ आणि सरल पद्धत. हे सुती कापडावर अथवा सिल्कवर रंगवल्या जातं. ह्यात वापरलेले रंग पाल्या पासून किंवा रंगीत दगडांची भुकटी करून त्यात गोंद मिसळून बनवल्या जातात. इथे एक मुलगा सोन्याच्या छोट्याशा तुकड्याला उगाळून बनवलेल्या सोनेरी रंगाने त्याच्या चित्र रंगवत होता. आज ह्या चित्रांना commercial scale वर पण मागणी आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी ६ ते ७ वर्ष ह्या मुलं नेमाने येऊन इथे शिकतात. तुम्हाला जर काही थांका चित्र बघायची असतील तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयला जरूर भेट द्या.दरबार चौकात पर्यटकांची प्रचंड गर्दी लोटली होती. तिथल्याच एका छोट्याशा घर वजा उपहारगृहात जेवण मागवलं. हे एक तिबेटी उपहारगृह होतं. फ्राईड मोमो मागवले. समोर पाटी "टोंगबा - हॉट बिअर" ची पाटी वाचली. ठरलं तर मग, हॉट बियर हा काय प्रकार आहे तपासून बघायचा. थोड्यावेळात माझ्यासमोर एका मोठ्या अल्युमिनियमच्या पेल्यात अल्युमिनियमचा straw टाकला होता. वरून झाकणी. त्याने एक मोठा थर्मास भरून गरम पाणी आणले. पेल्याची झाकणी उघडली, त्यात आंबवलेली नाचणी होती. त्यात गरम पाणी ओतलं. अल्युमिनियमची नळी खालून चपटी केली होती, त्या मुळे नाचणी वर येत नसे. चवीला तुरट अशी टोंगबा  त्या उपहारगृहाच्या मालकाला कडून मग हिला बनवण्याची पद्धत माहिती करून घेतली. आधी नाचणी आणि "मार्छा" (हा काय प्रकार असतो मला माहिती नाही, पण हा तितकाच जरुरी घटक आहे.) आधी शिजवून एका भांड्यात हवा बंद करून ठेवल्या जाते. ६ महिने आंबवलेल्या ह्या नाचणी मधे गरम पाणी मिळवून टोंगबा पेश केली जाते. टोंगबा मधे ६-७ % अल्कोहोल असते. एकदा चवीची सवय पडली, की रुचकर लागते. राक्षी बनवण्याची पण पद्धत सारखीच आहे, फक्त राक्षी बनवतांना तांदूळ देखील वापरता येतात. तांदळाची राक्षी एक महिन्यात आंबते, नाचणीची सहा महिन्यात. थर्मास मधे ५-६ वेळा ग्लास भरता येईल इतके पाणी होतं. इथल्या थंडी करता ही बियर खरंच एक उत्तम पेय आहे. सोबत फ्राईड मोमो होतेच. बढिया वाफाळलेल्या मोमो बरोबर टोंगबाने मजा आणली.


इकडे तिकडे फिरून भटकून आलो. मला इथून लगेच निघायची इच्छा न्हवती. एका ठिकाणी एक toy-maker दिसला. तो काही घोडे बनवत होता. मी सहज त्याला विचारलं, की मी त्याला मदत करू शकतो का म्हणून. त्याने सगळ्यात सोप्पं काम मला दिलं, खिळे ठोकून सगळे तुकडे एकत्र जोडायचे. बसल्या बसल्या सगळ्या घोड्यांचे अव्यय जोडून झाले. घोड्यांची फौज उभी झाली होती. गप्पा मारता मारता सगळे घोडे उभे झाले. घराच्या व्हरांड्यात बसून खेळणी बनवणाऱ्या ह्या toy-maker चा आणि त्याच्या बायकोचा फोटो काढून तिथून निघालो.


परत येतांना सहज मनात विचार आला, ह्या सर्व ठिकाणी हिंडून फिरून अनुभव घेतांना मला स्वतःला अनेक तडजोडी करायला लागायच्या. इथल्या प्रत्येक अनुभवाचा आस्वाद घेण्याकरता आधी आजू-बाजूच्या परिसरात मिसळून जाणे महत्वाचे वाटते. पण कदाचीत असं तर नाही, की ह्या adjusting स्वभावामुळे मी आपला स्वतः भोवती स्वतःच्या कम्फर्ट झोन बनवून त्यातच संपूर्ण नेपाळ बघ्तोये. हे काहीतरी वेगळं होतं. असं तर नाही म्हणून आज सकाळ पासून मला ह्या इलाक्याच्या अनोळखीपणा ओसरून गेल्या सारखा वाटत होता. कदाचीत हे एका विशष्ट साचेबद्ध विचारसरणी मुळे असावे. खरंतर विचारांच्या तारेला वाटेल तो आकार देता येऊ शकतो, नाही का? आपलं उगाच हिच ती पूर्व दिशा समजून आपण आपल्याच वर्तुळातल्या पूर्व दिशे कडून सूर्य उगवायची वाट बघतोये असं वाटतं.

 

 0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates