कट्टा - तानसेन

26 February 2012 वेळ: Sunday, February 26, 2012

मुंबईत जसे सगळे मित्र नाक्यावर भेटतात, तसं पुण्यात कट्ट्यावर. एकंदर माहोल तुमच्या लक्षात आलाच असेल. इकडे सगळ्यांची एक खास ओळख असते. संध्याकाळची सहा ते दहा ह्या वेळी एखाद्या हॉस्टेलवर राहणाऱ्यासाठी आयुष्यातली अत्यंत भकास वेळ. मग तिला थोडं रंगीन करायला सगळे कुठेतरी एकत्र जमून "ignorance is bliss" मधे वेळ काटून नेणार. दररोज संध्याकाळी प्रत्येकाचा नवीन विषय असतो. कोणाची लफडी, कोणाचा वचपा, कोणाच्या फोका....आमच्या कट्ट्यावर पण असे बहाद्दर असणारच. (आता सगळे मार्गी लागलेत.)

सुरवात तानसेन पासून करावी म्हणतो. आमचा तानसेन हा कट्ट्यावरचा राज-गायक होता. (ह्याचा अर्थ असा नाही की तो सगळ्यांपेक्षा चांगलं गायचा.) कही वर्षांपूर्वी विजय मल्ल्याला competition द्यायला मीच एक आमची कंपनी काढली होती. आमच्या कंपनीचं पण नाव "यु.बी" होतं. फरक इतकाच की इथे यु.बी चा अर्थ "उदास बंधू" असा होत. तानसेन आमच्या कंपनीचा "brand ambassador" होता. त्या मागे कारणही तितकंच तगडं होतं. त्याला नेहमी होलसेल मधे टेंशन असायचं. पैसे, धंदा, गायन, घर हे सगळे टेंशन हह्याला स्वस्तात मिळायचे. इतक्या टेन्शन्स पोसणाऱ्याला मग गाणे पण दुखी सुचायचे.

तसं पाहता तानसेन जिद्दी होता. शहरात आलेल्या प्रत्येक audition मधे हजेरी लावायचा. ३-४ round पार करायचा अन् मग सायेब अडकायचे. अगदी पिंपरी-चिंचवड आयडॉल मधे पण आजकाल वशिलेबाजी चालते. तिकडे तर आमचा दोस्त उपांत्य फेरीत जाऊन आला. पण हा साला कधी खच्ची नाही झाला. त्याच्याकडे एक डायरी असायची, त्यात तो आवडलेले गाणे-कविता लिहून ठेवत. कुठे जरा मोकळी हवा आणि परिसर दिसला की तानसेन रियाज करे. "मैने तेरे लिये ही जग छोडा, तू मुझको छोड चली....." ह्यात बीट सुटला म्हणून काय झालं, ह्याचा सूर मात्र जाम उंच लागायचा. दिल चाहता है - मधलं तन्हाई गाणं तर तो जे रंगवून गायचा, एकदम दिल खुष व्हायचं. पण आमच्या तानसेनचा ज्यूक-बॉक्स थोडा लिमिटेड होता. मग आपलं रोज cassette ची आधी A-side वाजायची, अन् मग B-side.

एकदा आम्ही सगळे निलकंठेश्वरला जायचं ठरवलं. पावसाळी हवा होती, त्यात तानसेन ची यारी. थोडं वर गेलो नाहीतर तानसेनला गाणं गायचा मूड आला. आम्ही सगळे आजू-बाजूच्या दगडांवर टेकलो. तानसेन मात्र उभा राहून perform करत होता. आता एका पाठोपाठ ४ गाणे आले होते. आम्हाला वर पोह्चायची घाई लागली होती, पण रियाजमधे टांग अडवणार कोण? तोच खाली शेतातून एक हाक आली..."ओ, बास करा आता!" तानसेनचा लगेच pack-up झाला. हा खरं तर अपमान होता आमच्या तानसेनचा, पण सध्या तो आमच्या पथ्यी पडला होता.

मग एक दिवस  चर्चा खूप रंगली, आजकाल गाण्यांच्या चालीला महत्व आहे की बोल? त्या वेळी हिमेश रेशमियाचे गाणे मोकाट सुटलेले. सगळ्यांचे म्हणणे पडले, की आजकाल गाण्यांमध्ये बोल नसले, अन् रापचिक चाल असली तरी गाणे चालतील. विषय खूप टोका पर्यंत गेला. तानसेनने २-४ दिवसात लगेच एक स्वतःचं गाणं पेश केलं मग!

"पैसा तेरी जेब में कम है तो क्या हुआ?
लेले मेरी जान तू एक.... वडा-पाव" 

त्याला एकदम बँजो स्टायल संगीत पण वाजवलं आम्ही. गाणं लगेच डोक्यात बसलं. तानसेनही खुष!
सुरवातीला खूप उत्साह दाखवला, पण सालं नंतर सगळं ढेपाळलं. आता तानसेन आपली नौकरी करतो, घरच्यांनी लग्न लावून दिलं. गेल्या वर्षी एक मुलगा पण झाला. अजून देखील तानसेनचा अधून मधून फोन येतो. सगळ्यांची आठवण काढतो. गाण्याची आठवण मात्र दोघांपैकी कोणीच काढत नाही. 

0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates